" तुला वेळ नाही मिळाला वाटत माझे फोटो बघायला."
प्रिय नाही.......
........आणि
..........तुझीही नाही.
........आणि
..........तुझीही नाही.
असं मायना हरवलेलं एका ओळीच पत्र आलं कि
आपण समजायचं समोरचं माणूस रागावलय म्हणून. आपण मात्र रागावू नये अशा वेळी. रुसलेल्या गालावरती एक पापा द्यावा. रुसलेला चंद्र आपल्या ओंजळीत घ्यावा......आणि म्हणावं, " किती छान दिसतेस तू अशीही. "
त्या इवल्याशा स्पर्शानं अळवाच्या पानावरचा थेंब घरंगळून जावा इतक्या सहजपणे तिच्या चेहऱ्यावरचं रुसव्याचं मळभ दूर होतं आणि पौर्णिमेचा चंद्र दिसावा तसा तिचा चेहरा उजळून निघतो. राग विरघळून जातो विरून जाणाऱ्या गारेसारखा. रागावलेल्या गालावरती हसू फुलतं. ती बिलगते आपल्याला वेल होऊन. आपण तिला कवेत घ्यावं आणि म्हणावं, " किती छान दिसतेस तू अशीही. "
आपण तिला असं कवेत घेतलं कि ती अल्लड होते अधिर होते सारं सारं विसरून जाते फक्त आपली आणि आपली होते. ती अशी आपली आपली झाली कि तिचा मुखचंद्रमा आपण आपल्या बोटांवरती अलगद पेलावा आणि तिला ऐकवाव्यात या ओळी -
एक मात्र लक्षात ठेव
छान दिसतेस अशी तू
गालात हसतेस जेव्हा
अशी सुद्धा छान दिसतेस
ठसक्यात रुसतेस जेव्हा
एक मात्र लक्षात ठेव
रुसवा खूप ताणु नये
दोघांमधल्या एकांतात
त्याला कधीच आणु नये
Mast.
ReplyDeleteआभार मित्रा.
DeleteApratim sir.
ReplyDeleteआभार प्रियाजी. एकाच वेळी दोन पोस्टला अभिप्राय नोंदविणारे रसिक अभावानेच भेटतात. पुन्हा एकदा आभार.
Delete