Wednesday, 3 June 2015

भिक, दान आणि सन्मान

आपल्या देशात प्रत्येकजण भिकारी आहे. उद्योजकही याला अपवाद नाहीत. त्यांना करात सुट हवी असते, सामान्यांना अनेक प्रकारच्या सवलती हव्या असतात. ' कोणीही कोणतेही काम करण्याची गरज नाही. यापुढे शासन प्रत्येकाला महिन्याला पंचवीस हजार देणार आहे. तसेच वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य यासारख्या सुविधा प्रत्येकाला पूर्णपणे मोफत देण्यात येतील.
 '  जर असा फतवा उद्या शासनाने काढला तर आमच्या देशातल्या ९९ टक्के जनतेला आनंदाच्या उकळ्या फुटतील आणि खाऊन पिऊन खाटेवर बसुन प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला ते पंचवीस हजार रुपयाची वाट पहातील.

दिल्लीच उदाहरण घ्या ना. भारताची राजधानी. सुशिक्षितांच प्रमाण मोठं. पण तरीही केवळ ' बिजली हाफ, पाणी माफ '  या एका घोषणेवर दिल्लीची सत्ता केजरीवालांच्या घशात घटली ना. रस्त्यावरचे भिकारीही असेच करतात. आपण त्यांच्या कटोरयात रुपया टाकताच ' भगवान तेरा भला करेगा ' असा घसघशीत आशिर्वाद देऊन मोकळे होतात. ' दिल्लीकरांनी तेच केलं. पाणी फुकटात मिळतंय असं दिसताच ' भगवान तेरा भला करे ' असं म्हणत सत्ता केज्रीवालांच्या घशात घातली.

हे सर्व लिहिण्याला कारण झालं. काय झालं. परवा मी पुना स्टेशनला ट्रेनमधून उतरलो. बससाठी बसस्थानकाकडे निघालो. वेळ सकाळची. कमी गर्दीची. रस्त्याच्या कडेला एक मोपेड उभी होती. तिशीचा एक तरुण तिच्यावर बसलेला होता. त्याच्यापासुन वीसएक फुटावर मी उभा होतो. ( इथे कासराभर अंतरावर असं लिहिणार होतो पण आपण ग्रामीण घटनेवर लिहित नाही हे लक्षात आले. )

त्याच्या पाठीमागून एक वयस्कर बाई आली. पंचाहत्तरच्या आसपास वय असावं. केसं पंढरीफेक. गोरा पण सुरकुतलेला चेहरा. बीन पोकची पाठ. हातात खताच्या गोणपाटाची पिशवी. पिशवीत काय आहे ते कळत नव्हतं. ती म्हातारीही खांद्यावर पिशवी घेऊन मुकाट चालेली. रस्त्यावरच्या शांततेवर आणखी एक लेप चढवत निघालेली. त्या तरुणानं तिला हाक मारली. पण तिचं लक्ष गेलं नाही. बहुदा ऐकायला कमी येत असावं.

मी पुन्हा आवाज दिला तेव्हा म्हातारीचं लक्ष गेलं. तिनं वळून त्या तरुणाकडे पाहिलं. चेहरा निर्विकार.

" आजी , पेपर आहेत का ? " ती काही बोलली कि नाही माहित नाही. मला मात्र काही एकू आलं नाही. पण तिनं तिची खांद्यावरची पिशवी खाली घेतली.

" लोकमत दया. " म्हातारीनं पेपर तरुणाच्या हातात दिला. त्यानं पन्नासची नोट म्हातारीच्या पुढे केली.

" सुट्टे नाहीत. " असं म्हातारी म्हणाली. पण तो तरून सुट्ट्या पैशाची वाट बघत थांबलाच नव्हता.

तरीही " राहू द्या. " असं खुणवत तो तरुण निघुन गेला.

आजीबाईंनी नोट कपाळाला लाऊन. कनवटीला लावली. आणि निघून गेल्या. माझ्या मनात मात्र विचारांचा झिम्मा. काय म्हणायचं याला ? भिक कि दान ? दान कि द्या ? कि बक्षिसी या वयातही कष्ट करत असल्याबद्दल ?

पेपर विकत होती म्हणजे म्हातारीची अक्षरांशी चांगली ओळख होती. तिच्या राहणीमानावरून ती चांगल्या घरची वाटत होती. पण ती पेपर विकत होती म्हणजे तिला पैशांची गरज होती. म्हणजेच एकतर तिला मुले अथवा अन्य नातेवाईक नसावेत. अथवा असले तरी त्यांनी तिला वाऱ्यावर सोडून दिलेले असावे.

काही असलं तरी हात वेंगाडून पैसे मागणाऱ्या भिकारांपेक्षा म्हातारी स्वाभिमानी होती. ती स्वकष्टाने पैसे
मिळवत होती.

त्या तरुणाची कृती म्हणजे आजीबाईंच्या कष्टाला सलाम होता. पण आजीबाईंनी त्या पैशाला एकदाही नकार दिला नाही हे मला फारसं रुचलं नाही. त्यांनी ते पैसे नाकारले असते तर मला त्यांच्यातला स्वाभिमान दिसला असता. आणि माझा उर अभिमानाने भरून गेला असता.

पण आम्हा भारतीयांना फुकट काही मिळालं तर हवच असतं. त्याला आजीबाई तरी अपवाद कशा असाव्यात ?            

    

                            

2 comments:

 1. pune mhana ki rav.
  puna stiation nahi, pune station mhana.

  ReplyDelete
  Replies
  1. सल्ल्याबद्दल आभार बापू जी. यापुढे काळजी घेईन.

   Delete