Friday, 19 June 2015

मृत्यूची चाहुल

 हा लेख तसा खुप जुना आहे. माझ्याच रे घना या ब्लॉगवर मी तो चार वर्षापूर्वी टाकला होता. खूप लाईक आणि बऱ्याच प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. 
इहलोकीची आपली यात्रा कधी संपणार आहे हे माणसाला कधीच कळत नाही. पण हे विधान खरे आहे का ? माझ्या मते मृत्यू नेमका कधी येणार हे कुणालाच कळत नाही. पण मृत्यू येण्या आधी काही क्षण त्याची चाहूल माणसाला नक्की लागत असावी. कशावरून ते स्पष्ट करणारा हा  घटनेवर आधारित लेख. 

मेल्यानंतर स्वर्ग दिसतो कि नाही माहित नाही. जिवंतपणी ते आपल्याला कळत नाही. वैकुंठवासी झालेल्यांना ते कळतही असेल. पण त्यांचा अनुभव ते पुन्हा आपल्यात येवून कथन करू शकत नाहीत.
मेल्यानंतर स्वर्ग दिसत असो अथवा नसो पण मृत्युपूर्वी मरणाची चाहूल लागते हे नक्की.
३१ ऑगस्टला माझ्या वडिलांना देवाज्ञा झाली. वय वर्ष ६७. अंगकाठी मजबूत. सगळे दात शाबूत. चष्मा सुद्धा नाही. कधी कुठला आजार नाही. पुण्यापासून १२० किलोमीटर लांब असणारी आमची शेती. तिथ जावून एकट्यानं शेती पहायचे. जाताना येतानाचा प्रवास दुचाकीवर. सहाजिकच ते असे अचानक आम्हाला सोडून जातील अशी शंकासुद्धा कधी मनात आली नव्हती.
माझं वय चाळीशीच. वडील आजतागायत त्यांच्या प्रापर्टीविषयी चकार शब्दानं माझ्याशी कधी काही बोलले नाहीत. पण १५ ऑगस्टला त्यांच्या माझ्यात शेवटचं संभाषण झालेलं. पाठचा भाऊही तिथच होता. आपल्या मोठ्या मुलाशी आपलं हे शेवटचं संभाषण आहे, याची त्यांना जाणीव झाली होती कि काय कुणास ठावूक. पण कधी नव्हे ते मला म्हणाले, ” हे बघ विजय, माझ्या प्रापर्टीची मी तुम्हा तिघा भावांमध्ये अशी अशी वाटणी करायची ठरवली आहे. काही तक्रार असेल तर आत्ताच सांगा.”
” एवढ्यात हा सगळा विचार करायची काही गरज आहे का ?” मी सहजपणे बोललो.   
” तसं नाही रे हे सारं मी गेल्या चार वर्षापूर्वीच ठरवलंय. तुम्हाला कधी तरी सांगायलाच हवं ना ! ”
झालं. हेच माझं वडिलांशी झालेलं शेवटचं संभाषण. आपली इहलोकीची यात्रा संपत आल्याचं कळल्यासारखं ते माझ्याशी बोलून गेले.
वडील गेल्यानंतरच्या दहा दिवसात दहा तोंडांनी खूप काही ऐकायला मिळालं. त्यातून काढलेलं हे अनुमान –
मेल्यानंतर स्वर्ग दिसतो कि नाही माहित पण मरणापूर्वी मृत्यू नक्कीच दिसत असावा. 
शेवटच्या आठ पंधरा दिवसात वडिलांनी त्यांच्या सगळ्या मित्रांच्या अगदी आवर्जून भेटी घेतल्या.
कॅरम हा त्यांचा आवडता खेळ. असं असूनही मागील आठ दहा वर्षात त्यांनी कॅरमला स्पर्शही केला नव्हता. पण त्यांची प्राणज्योत मालवली मंगळ्वारी. त्या आधी दोन दिवस म्हणजे रविवारी ते कॅरम हाउस मध्ये गेले. तिथं त्यांना नेमका त्यांचा एक खूप जुना आणि जवळचा मित्र सवंगडी म्हणून लाभला. त्याच्याशी गेम खेळले…………..जिंकले सुद्धा.
त्यांचा मित्र म्हणाला, ” तात्या चला, आणखी एक गेम खेळू.”
त्यावर वडील म्हणाले, ” नाही, हा अखेरचा गेम.”
ते कुठल्या अर्थानं म्हणाले ते माहित नाही. पण मला वाटलं ते एवढच………..त्यांना त्यांचा मृत्यू दिसला असावा.
आणखी एक प्रसंग सांगितला तर तुम्हाला नक्की पटेल माझं म्हणणं.
वडिलांची प्राणज्योत मालवली. अंत्यविधी कुठे करायचा अशी विचारणा माझ्या पाठच्या बंधूंनी केली.
” इथच करू या.” मी.
” नाही भाऊ. त्यांचं सगळं लहानपण गावी गेलं, त्या मातीत ते लहानाचे मोठे झाले. त्याच मातीच्या कुशीत देह ठेवावा असंच त्यांना वाटत असणार.”
” हे बघ संजय, तुझा म्हणणं योग्य आहे. गावी त्यांचा जमीन – जुमला आहे, शेतीवाडी आहे हे मान्य. पण गावाहून अंगावरच्या कपड्यानिशी येऊन इथंही त्यांनी त्यांचं जग उभं केलंय. यातही त्यांचा जीव गुंतला असेल.”
” नाही भाऊ, मला नाही पटत हे. ”
फार मंथन करण्याची ते वेळी नव्हती आणि तशी माझी मनस्थितीही नव्हती. सहाजिकच, ” तुला योग्य वाटेल तसं कर असं म्हणून मी मोकळा झालो.”
त्याला योग्य वाटणाराच निर्णय त्यानं घेतला असता. पण ………
पुढच्या दहा एक मिनिटात भावाचा मोबाईल वाजला. पलीकडे माझा चुलतभाऊ होता. तो म्हणाला, ” तात्यांचा अंत्यविधी कुठं करायचा ते तुम्ही ठरवा. पण आठ दहा दिवसापूर्वी तात्या माझ्याकडं आले होते तेव्हा मला म्हणाले होते कि, बबन उद्या जर माझं काही बरं वाईट झालं तर पोरांना सांग माझे सगळे अंतिम विधी इथं पुण्यातच करा. गावी नको.”
बस्स !!!
हि घटना त्यांच्या मृत्युच्या आठ दिवस आधीची.
आता तरी पटतंय ना मी काय म्हणतोय ते ?
मेल्यानंतर माणसाला स्वर्ग दिसो अथवा न दिसो पण मृत्यूआधी माणसाला त्याच्या मरणाची चाहूल नक्कीच लागत असावी. फक्त, ” माझं मरण आठ दिवसांवर आलाय किंवा मी आठ दिवसांनी तुम्हा साऱ्यांना सोडून जाणार आहे. ” एवढ्या स्पष्ट शब्दात आपलं मरण व्यक्त करण्याची कुवत परमेश्वरानं आपल्याला दिली नसावी.

2 comments:

  1. Khar ahe vijayji mi ya vishyacha abhyas karte tyamule mi tumcha matashi sahmat ahe.

    ReplyDelete
    Replies
    1. सुवर्णाजी आज खूप वर्षानंतर तुमचा अभिप्राय मिळाला. यापुढे नियमित आपण माझ्या ब्लॉगला नियमित भेट द्याल हि अपेक्षा.

      Delete