Sunday 21 June 2015

नको असला बाप

Father's Day 

माझं आणि माझ्या वडिलांचं फारसं कधी पटत नव्हतं. पटत नव्हतं याचा अर्थ त्यांचा माझ्यावर अथवा माझा त्यांच्यावर जीव नव्हता असे नव्हे. पण त्यांना वाटायचं ' आपलं कार्टं खुप नाठाळ आहे. ' आणि मला वाटायचं ' आपला बाप नको इतका कडक आहे. ' त्यामुळे
आमचं जे काही हातपाय आपटणं असेल ते आई जवळ. बाबांच्या नजरेसमोर आम्ही उभे रहायचो नाही. जरा काही झालं कि लगेच कानाखाली. आणि कानाखाली सुद्धा साधी -सुधी नव्हे जाळ निघणं, धुर निघणं , चांदणं दिसणं , आवाज बंद होणं, कानाची दडी बसणं सारं काही एकाच वेळी व्हायचं. वाटायचं ' नको असला बाप.'

पण हे तेव्हा वाटायचं. आज बाबाची किंमत कळतेय. कधी कधी वाटतं ' आपला बाप कडक होता म्हणुनच आपल्यासारखा नाठाळ मार्गी लागला. नाहीतर कुठे असलो असतो कुणास ठाऊक ? '

तेव्हा बाबांची भीती वाटायची खरी पण आज लक्षात येतंय कि ' बाबांचं आपल्यावर खूप प्रेम होतं. त्यांची शिस्त, त्यांची मारहाण आपल्यावरील रागापोटी नव्हती तर आपण मार्गी लागावी म्हणून होती. '

आज बाबा नाहीत माझ्याजवळ. पाच वर्षापुर्वी गेले. हवे असताना , ध्यानीमनी नसताना. खुप रडलो तेव्हा मी. आयुष्यात पहिल्यांदा ' हंबरडा फोडणं ' या वाक्प्रचाराचा अर्थ मला कळला. तेव्हाच कशाला पुढे कितीतरी महिने मी रडत होतो. आधी अवती भवतीच्या माणसांना दिसायचं ………… नंतर माझं रडु फक्त माझ्या पुरतं असायचं.

माझे वडील माझ्याशी जे वागले त्यातुन ' आपण आपल्या मुलांशी कधीही असं वागायचं नाही. ' असा धडा मी घेतला. त्यामुळेच मी माझ्या मुलांशी कधीच कठोरपणे वागत नाही. ते लहान असताना वर्ष दोन वर्षातुन चार दोन फटके मारले असतीलही. पण ते मोठे झाल्यापासुन मी पावलोपावली त्यांना समजून घेतो……बाप कमी मित्र अधिक होतो.

पण तरीही माझ्या मुलांना माझ्याविषयी एक आदरयुक्त भीती आहे. यातला आदर योग्यच आहे पण भीती नको होती. त्यांच्या मनात माझ्याविषयी जी काही भीती आहे ती का आहे महित नाही. पण आहे एवढ खरं.

तुमचे वडील जेव्हा तुमचा कान धरतात, तुमच्या कानाखाली मारतात, चार मित्रांसमोर तुमचा पाणउतारा करतात, मार्क कमी पडले तर तुम्हाला नको तसे बोलतात तेव्हा तुम्हालाही तुमची वडिलांचा फार राग येत असेल नाही.

मलाही त्या वयात असंच वाटायचं. फार राग यायचा. किती चुकीचं वागताहेत हे माझ्याशी असं वाटायचं.

त्या वयात कळायचंच नाही चुकतंय कोण ते. कळायचं नाही म्हणण्यापेक्षा आपणच बरोबर आहोत असं वाटायचं. आपल्याला सारं कळतं. कळत नाही ते आपल्या आई बाबांना. ' आपल्या वयात तेही असेच वागले असतील. आपल्यासारख्याच चुका केल्या असतील. आपण जसा आज मार खातो ना त्यांचा तसा त्यांनीही मार खाल्ला असेल आपल्या आजोबांचा. पण आज आपल्याला शहाणपण शिकवताहेत.'  असं ठाम मत होतं तेव्हा माझं.

पण मित्रांनो लक्षात ठेवा. आपला मुलगा आज ज्या चुका करतोय त्याच चुका कधी काळी आपणही केल्या आहेत याची पूर्ण जाणीव असते आपल्या वडिलांना. त्या चुका केल्या म्हणूनच आज आपण खूप मागे राहिलोत नाही हे कळालेलं असतं. त्या चुका आपण केल्या नसत्या तर फार पुढे गेलो असतोत आपण हे माहित झालेलं असतं त्यांना. आपण ज्या चुका केल्या त्याच आपल्या मुलाने करू नयेत यासाठी जीव तुटत असतो त्यांचा. त्यांची सारी धडपड आपल्या प्रगतीसाठी. कानाखाली जाळ काढणं आपल्या उज्वल भवितव्यासाठी.   
माझा बाबा हे जग सोडुन जाण्यापूर्वी मी एक कविता लिहिली. ' बाबा ' विषयी. त्यांला वाचून दाखवायची राहिली. पण तुम्ही वाचा , ' तुमच्या मनात तुमच्या बाबा विषयी राग असला तर दूर होईल. अढी असेल तर मोडून जाईल. तुमच्या मनातही बाबा विषयी एक गाणं आकार घेईल. ' 
' आई महान कि बाबा थोर ' या वादात नाही पडायचं मला. पण आपल्याला नऊ महिने पोटात वाढविणाऱ्या आईचे या जगात खुप गोडवे गायले जातात. पण आयुष्यभर मुलांच्या भवितव्याचा विचार करणारया, त्यासाठी कष्ट उपसणाऱ्या, त्यासाठीच नको त्या खस्ता सोसणाऱ्या बाबाविषयी कोणीच काही बोलत नाही. 
म्हणुनच आजच्या बाबादिनी ( Fathers Day ) जगातल्या तमाम बाबांना हि कविता अर्पण.  

बाबा ……. 

मरण यातना सोसताना 
आई जन्म देत असते 
आपलं पहात पहात 
वेदना विसरून हसत असते. 

बाबा मात्रं हसत हसत 
दिवस रात्रं खपत असतो 
शिस्त लावत आपल्यामधला 
हिरवा अंकुर जपत असतो 

त्याला कसलंच भान नसतं 
फक्त कष्ट करत असतो 
चिमटा घेत पोटाला 
बँकेत पैसे भरत असतो 

तुमचा शब्द तो कधी 
खाली पडू देत नाही 
तुमची हौस भागवताना 
पैशाकडे पहात नाही 

तुम्ही म्हणजे त्याची स्वप्न 
तुम्ही म्हणजे त्याचं आभाळ 
तुमच्यासाठी गिळत असतो 
नामुष्कीची अवघी लाळ 

तुमच्याकडून तसं त्याला 
काहीसुद्धा नको असतं 
तुमचं यश पाहून फक्त 
त्याचं पोट भरत असतं 

तुम्ही जेव्हा मान टाकता 
तेव्हा बाबा खचत असतो 
आधार देता देता तरी 
मन मारून हसत असतो. 

त्याच्या वेदना आज कधी 
कुणालाही कळणार नाही 
आज त्याला मागितल्या तर 
मुळीसुद्धा मिळणार नाहीत 

एक दिवस तुम्हीसुद्धा 
कधीतरी बाबा व्हाल
त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या 
स्वप्नांचं आभाळ पहाल 

तेव्हा म्हणाल' " आपला बाबा 
खरंच कधी चुकत नव्हता. 
आपल्यासाठी आयुष्यभर 
रक्तसुद्धा ओकत होता. " 

तेव्हा सांगतो मित्रांनो 
फक्त फक्त एक करा 
थरथरणारा हात त्याचा 
तुमच्या हातात घट्ट धरा 
…………   
थरथरणारा हात त्याचा 
तुमच्या हातात घट्ट धरा. 

                                    कवि - विजय शेंडगे,पुणे 




                 

                 

    


                       

3 comments:

  1. हृदयस्पर्शी लेख.अलगद डोळ्यात पाणी आलं..

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या मनस्वी अभिप्रायाबद्दल आभार. पण आपण आपले नाव का नाही कळविलेत ?

      Delete