Sunday 12 July 2015

पंढरीची वारी आणि वाघाच्या मिशा

( या सगळ्यात वाघाच्या मिशा कुठे आहेत हे तुम्ही नक्की ओळखाल . )

काही वर्षापुर्वी मी ' त्याची मिशी……. त्याची डाय  ' हि हास्य कविता या सदरात मोडणारी कविता लिहिली होती. तेव्हा ती मी माझ्या ' रे घना ' या ब्लॉगवर प्रकाशित केली होती. याही
ब्लॉगवर ती सवडीने प्रकाशित करीनच. कारण त्या ब्लॉगवर लिहिणं आता मी थांबवलं आहे. त्यानंतर मी काही फोटो काढले होते. ते फोटो टाकून ' अशाही मिशा ' या शिर्षकाचा लेख मी लिहिला होता. त्यातच ती कविता टाकली होती.

आज अनेक वर्षानंतर मला त्या लेखाची आणि त्या कवितेची आठवण झाली. त्याला कारणही तसंच घडलं.


आम्ही जिथं रहातो तिथे माझे बंधु व भाजपाचे नेते संजय शेंडगे वारकऱ्यांना दर वर्षी पिठलं - भाकरीचं वाटप करतात. काल सकाळी वारी कासारवाडीत पोहोचली. आम्ही तिघे भाऊ आणि आमची बहीण नगरसेविका आशाताई शेंडगे तिचे पती तानाजी धायगुडे आमच्या शाळेचे विद्यार्थी असे सर्वजण नियोजनासह रस्त्याच्याकडेला उभे होतो. वारकऱ्यांना भाजी भाकरीचे वाटप सुरु होते.





आणि एक गृहस्थ आमच्या समोर आले. पंचावन्न - छपन्नच्या आसपास वय. संत्र्या - मोसंब्यासारखा गोल रसरशीत चेहरा. हसरे डोळे. बोलण्यात मार्दव. आणि माणुसकी तर इतकी कि जणू काही आम्हा सगळ्यांना अंगाखांद्यावर खेळविण्यासाठी प्रत्यक्ष विठूच अवतरला आहे.
त्याहून विशेष म्हणजे हातात apple चा i pad. पांढरे शुभ्र धोतर. वर तेवढाच
पांढरा सदरा. आणि त्याहीवर टोपी. तीसुद्धा
पांढरी शुभ्रच. या सगळ्या पांढऱ्या
पेहरावात ओठावरच्या मिशा मात्र काळ्याभोर. तलवारीसारख्या बाकदार. मला खुप प्रसन्न वाटलं त्या गृहस्थांकडे पाहिल्यानंतर. आम्ही त्यांच्या बरोबर फोटो काढण्यास उस्तुक होतोच. पण त्याहून अधिक ते आमच्या बरोबर फोटो काढण्यास उस्तुक होते.

त्यांनी कितीतरी फोटो घेतले आमच्या सोबत. शाळेच्या मुलांसोबत. मी विचारलं , " कुठले  ? "

म्हणाले , " मुंबईतले. अगदी पेसिफिक सांगायचे तर ठाण्यातले."

" किती वर्षापासुन करताय वारी. " मी.

" हे दहाव्वं वर्ष. " त्यांनी उत्तर दिलं आणि मी गर्दीकडे वळालो.

त्यांना पहाणारा प्रत्येकजण त्यांच्या बरोबर फोटो काढून घेण्यासाठी पुढे येत होता. आणि ते कुठलेही आढेवेढे घेत नव्हते. प्रत्येकासोबत फोटो काढून घेत होते.




बंधु सांगत होते , " ते दरवर्षी आपल्या 

इथं असे बराच वेळ थांबतात. आपलं काम फार आवडतं त्यांना. नेहमीच्या पेहरावात म्हणजे सुटा - बुटात अथवा टाय - कोटात पाहिलंस तर ओळखणार नाहीस तू त्यांना."   


तासाभराने पाहिलं तर ते तिथंच एका हॉटेल मध्ये बसले होते. मी विचारलं , " अजून इथेच ? "

म्हणाले , " हो. हे चार्जिंग करत होतो.पुढे कुठे संधी मिळेल सांगता येत नाही. " आणि हातातलं i pad. मला दाखवलं. पण ते दाखविण्यामागची भावना बघा माझ्याकडे  i pad. आहे. तुमच्याकडे आहे का ? हि नव्हती तर एवढ चांगलं इनस्ट्रूमेंट पण चार्जिंग नसेल तर हवा नसलेल्या मर्चडीस सारखं. बिनकामाच.    


" हो , तेही खरंच. "
" शिवाय आत्ता काढलेले फोटो फेसबुकला अपलोड केले. " त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पहाण्यासारखी होती. "

थोड्या वेळाने त्यांनी आम्हा सगळ्यांची पुन्हा भेट

घेतली. पुन्हा काही फोटो घेतले.

त्या काळी बीएस्सीची पदवी घेतलेले हे गृहस्थ मधुराज इंटरप्राईजेस या फर्मचे ते सर्वेसर्वा. सेक्युरिटी इक्विपमेंटच त्यांचं स्वतःच उत्पादन. निघताना त्यांनी त्यांचं व्हिजिटिंग कार्ड हाती ठेवलं.

एवढा मोठा माणूस. पण वारीचा वारकरी झालेला. सर्वस्व विसरून विठूच्या चरणी लीन होण्यासाठी निघालेला.   





                      

2 comments: