Sunday 22 November 2015

कटयार

दिवाळी नंतर आज लिहितोय. कारण गेल्या अनेक दिवसात माझं मानसिक स्वास्थ ठिक नव्हतं. म्हणुन लेखणी म्यान केली होती. आणि वाचन डोळ्याआड केलं होतं. पण
आज कुणीतरी ठसठसणाऱ्या खोकल्यावर सुंठेचा काढा दयावा आणि खोकल्यानं पळ काढावा तसं झालं होतं.

खरंतर लिहिणं वाचणं हि माझी गरज आहे. वाचलं म्हणजे श्वास घेतल्यासारखं वाटतं आणि लिहिलं कि श्वास सोडल्यासारखं. पण माझी अथवा बऱ्याचश्या लेखकांची हि श्वसनाची क्रिया झाडांसारखी असते. कार्बनडायऑक्साईड घ्यावा आणि ऑक्सिजन सोडावा तशी.  ( मी स्वतःला फार मोठा लेखक वगैरे समजत नाही पण लोक म्हणतात छान लिहिता तुम्ही )

माझा मुड असा एकेकी बदलण्याला कारणही तसच घडलं. बापाने पोरांना सिनेमाला नेले असे चित्र घरोघरी पहायला मिळते. माझे वडील चित्रपटांशी फटकून वागणारे तरीही त्यांनी आम्हाला पिंपरीच्या विशाल टॉकीज मध्ये दाखवलेला ' एकटा जीव सदाशिव ' हा सिनेमा मला आजही आठवतोय. तेही आईसह आम्हा तीन भावडांना सायकलवर नेऊन. 

पण पोरं बापाला घेऊन सिनेमाला गेली आहेत असे चित्र विरळाच. मी मात्र याबाबतीत थोडा नशीबवान आहे. नव्याचे नऊ दिवस असताना आम्ही नवरा बायकोनं एक दोन चित्रपट पहायले असतील. पण त्यानंतर आम्ही जे चित्रपटांवर बहिष्कार टाकला , तो टाकला. आमरण उपोषणाला बसलेल्याला जसे, मोसंबीचा रस देऊन उपवास सोडायला लावतात तसे , सचिन अथवा नानाने आम्हाला हाताला धरून न्यावे आणि एखादा हलका फुलका सिनेमा दाखवावा अशी काही आमची अपेक्षा नव्हती. पण नव्या संसारात सिनेमाची हौस खिशाला झेपत नव्हती.

अशा रितीने आम्ही सिनेमांवर टाकलेला बहिष्कार आम्हाला मोडीत काढायला लावला तो आमच्या मोठ्या चिरंजीवाने. ' प्रकाश बाबा आमटे ' त्याने पहायला आणि तिकिटे घेऊन घरी आला. म्हणाला , " बाबा , तुम्ही आणि आई उद्या सिनेमाला जा. " आणि आम्हीही नव्याची नवलाई असल्यासारखे जोडीने सिनेमाला गेलो.       
दोनचार दिवसापुर्वी आमचे थोरले चिरंजीव म्हणाले , " बाबा , शनिवारी आपण सिनेमाला जाऊ. " 

" कोणत्या ? " 


" का रे ? तुला कुणी जोडीदार नाही का ? " 

" तसं काही नाही. तुम्हाला आवडेल."

मी मनात म्हणालो , " एका संगीत नाटकावर बेतलेला हा सिनेमा बोअर असणार. पण पोरगं नेतय ना कौतुकानं मग जाऊ.     

आणि मग बापाबरोबर पोरांना जेवढया कौतुकानं सिनेमाला जावं तेवढयाच कौतुकानं मी त्याच्या बरोबर सिनेमाला गेलो. सिनेमा पाहिला. आणि दिलखुष. पॉपकॉर्न, आईस्क्रीम, चिटोज असलं काही मागितलं नाही.

मराठी सिनेमा कात टाकतोय हे म्हणणं खुप सोपं आहे. पण सिनेमा कात टाकतोय म्हणजे काय करतोय हे पहायचं असेल तर ,"  कटयार काळजात घुसली " हा सिनेमा पहायलाच हवा.

सिनेमाविषयी नंतर लिहीन. पण मी आजवर पाहिलेल्या सिनेमात हा सर्वोत्तम सिनेमा होता एवढ नक्कीच सांगेन. अगदी ' प्रकाश बाबा आमटे ' अथवा ' बाहुबली ' पेक्षाही उत्तम.   पहायला नसेल तर नक्की पहा.

           

2 comments:

  1. प्रमोद कानडे11 December 2015 at 21:07

    लेख नेहमीप्रमाणेच छान पण समिक्षेची अपेक्षासुध्दा होती.

    ReplyDelete
    Replies
    1. आभार प्रमोदजी. वेळे अभावी राहून गेलं. पण रसिकांचा प्रतिसाद आणि इफ्फी मध्ये झालेल्या चित्रपटाची मी पामर काय समीक्षा करणार.

      Delete