Monday 2 November 2015

जय हो IGP - भाग दुसरा

पहिला भाग लिहिल्यानंतर जवळ जवळ सहा महिन्यानंतर हा दुसरा भाग लिहितोय. कारण एकतर इथं मला रोज पोस्ट करनं शक्य होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मनात अनेक विषय रोज आकारला येतात आणि त्याक्षणी IGP हा विषय मागे पडतो. शिवाय मागचे अनेक महिने मी महिन्याकाठी आठ दहा लेखांपेक्षा अधिक लेख पोस्ट करू शकलो नाही. पण
IGP हा अशा रितीने कानामागे टाकण्याचा विषय नाही. त्यामुळेच बाकी सगळे विषय मागे ठेऊन आज हा विषय ऐरणीवर घेतला.

IGP हि एखादी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना असावी असं वाटण्यासारखं ते वातावरण होतं. आणि मी त्या संघटनेच्या निमंत्रणावरून तिथे गेलो होतो.

पण IGP हे कोण्या दहशतवादी संघटनेच नाव नव्हतं तर इंदिरा गांधी पॉलीटेक्निक हे या आमच्या डिप्लोमा कॉलेजचं संक्षिप्त रूप होतं. या कॉलेजनं मला सिगारेट ओढायला शिकवलं.

या कॉलेजच्या निरोप सभारंभाच्या दिवशी मी आयुष्यात पहिल्यांदा बियर पिलो. वर्षभर बोंबलत फिरून अखेरच्या महिन्याभरात अभ्यास करून पास कसं व्हायचं ते इथच शिकलो, लेक्चर अटेंड न करता सेल्फ स्टडी करून पास कसं व्हायचं याची दिक्षा इथेच मिळाली.

आमच्यात सिव्हील - मॅकॅनिकल असं एक अदृश्य कुंपण असलं तरी, आम्ही त्याला न जुमानता परस्परांना भेटायचो. आणि म्हणूनच त्या दिवशीच्या स्नेह संमेलनाला सिव्हील - मॅकॅनिकल असं लेबल नव्हतं. यात कोणी सिव्हीलचं नव्हतं, कोणी मॅकॅनिकलचं नव्हतं. तर आयजीपीयन्स एवढीच आमची ओळख होती.

आत पोहचलो आणि एकेक मित्र अंगावर येत गेले. सुरेंद्र काकडे , मकरंद देशपांडे , आंधळीकर , समीर तुपे, कडू , राज्या खोसे, सातकर, ढमाल्या. कचऱ्या ( वाचकहो हे खरं खुर नाव आहे हो एकाचं.) कचरे हे त्याचं आडनाव. आम्ही त्याला प्रेमाने कचऱ्या म्हणायचो.पण साल्यांनं बापाकडं आपलं आडनाव बदलुन घ्या असा हट्ट कधी केला नाही. आणि मित्र आपल्याला कचऱ्या म्हणतात म्हणुन आयुष्याचा कचरासुद्धा होऊन दिला नाही.

तीस वर्षानंतरही अनेकांना माझी ' काल टिपूस नव्हता , आज वाहती नाले ' हि दुष्काळावर लिहिलेली कविता आठवत होती. तीस वर्षापुर्वी मला कविवर्य ऐवजी कवीवीर्य हि उपाधी बहाल करणारे अनेकजण त्याक्षणीही मला कविवीर्य म्हणुनच हाक मारत होते आणि एवढे टोणगे होऊनही यांनी सभ्यतेचे मुखवटे पांघरलेले नाहीत हे पाहून मला आनंद होत होता.

कॉलेजला असताना बहुतेकजण टुकार वाटत होते. राज्या खोसे, ढमाले, सातकर आणि इवल्याश्या ठेवणीचा राजु वर्मा त्या काळी गावात जाऊन हातभट्टी प्यायचे. राजु खोसे स्वतःला ऋृषी कपूर समजायचा आणि ओठवर मिसुरड़ं नसलेल्या चिकण्या चोपड्या राजु वर्माला डार्लिंग म्हणायचा.ढमाल्याचा आवाज एकदम टिपिकल. आजही तसाच. सात्याचं वळणदार अक्षर अजुनही लक्षात होतं. पण आता त्याच्या अक्षराला वळण राहिलंय कि नाही कुणास ठाऊक. कारण साला वह्या पुस्तकं बंद करून सरपंच झालाय.

सात्याच कशाला ! मला आयुष्यासमोर हार मानलेलं इथं कुणीच दिसलं नाही. सगळेच यशाचे शिरोमणी. कुणी बांधकाम व्यावसायिक , कुणी सरकारी कॉन्ट्रॅक्टर, कुणी साखरकारखान्याचे संचालक, कुणी इंडस्ट्रीयालिस्ट, कुणी मॅनेजर, कुणी सरकारी खात्यात, तर काही जण कुठल्या कुठल्या शहराचे नगर अभियंता. तेव्हा झाले होते काही जण फेल. काढले होते एकेका वर्षात दोन दोन वर्ष. पण आयुष्याच्या परीक्षेत सगळेच पास.


साला, सगळ्यांनी आयुष्याचा फुटबॉल केला होता. ज्याला जसा हवा तसा टोलावला होता. प्रत्येकाला हवा तेव्हा गोल केला होता.

त्या दिवशी त्या स्नेह्मेळाव्याला हजर राहिलो नसतो तर आयुष्यातल्या फार मोठया आनंदाला मुकलो असतो .
परवा तर मला त्यांनी Whatsapp ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेतलं आणि म्हणाले, " कविविर्य , ग्रुपवर एखादी कविता होऊन जाऊ दया. "

आता यांच्यावर कविता करायला या काय पऱ्या , अप्सरा आहेत का ? पण केली कविता अफलातून झालीय. टाकेन नंतर.

12 comments:

  1. tumhi belwandi - srigonda chya polytechnic college madhun diploma kela aahe ka?

    regards.
    Bapu.

    ReplyDelete
  2. Nice कविवर्य
    खूपच छान '

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद विलासराव जी.

      Delete
  3. विजय ....लेखाचे दोन्ही भाग खूप सुंदर
    --- सुनील मरळे

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद सुनिलराव जी.

      Delete
  4. सर नगराच्या G2G छान वर्णन केलंय परंतु मी नव्हतो परंतु पुण्यात झालेल्या G2G हजर होतो खरंच छान नियोजन केलं होतं.विजय सर आपले लेख आणि लेखन सुंदरच

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद मित्रा.

      Delete
  5. विलास महामुनी

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद विलासराव जी.

      Delete