Tuesday, 12 March 2019

#मिशन_मोदी : खिचडी सरकार म्हणजे स्थिरता नव्हे

narendr modi, ajit pawar, sharad pwar, nda, upa,
अवघ्या पंधरा दिवसापूर्वीची घटना. पुण्यात एक पुरस्कार प्रदान समारंभ होता. शरद पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मी कार्यक्रम स्थळी पोहचलो तर चार सहा खंदे कार्यकर्ते तिथे हजर होते. म्हणाले,"आज कार्यक्रम रद्द झालेला आहे. पवारसाहेब येऊ शकणार नाहीत कार्यक्रमाला."

म्हटलं,"का ?"


तेव्हा नुकताच भारताने पाकीस्तानवर एअर स्ट्राईक केला होता. त्याचा सन्दर्भ देत कार्यकर्ते म्हणाले, काल एवढी मोठी घटना घडली. साहेब एवढे अनुभवी. एकेकाळी संरक्षण मंत्रालय सांभाळलेले. त्यामुळे सल्ल्यासाठी साहेबांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतलं आहे. त्यामुळे कार्यक्रम उद्या होईल."

आता साहेबांच्या सल्ल्याची गरज पडावी एवढा काही आपल्याकडे बुद्धिवंतांचा दुष्काळ पडलेला नाही. पण पवारांच्या पीएने यांना तसे सांगितले असणार. आणि ते समाजाला तेच सांगणार. याला म्हणतात उदात्तीकरण करणं.

असो. दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे गेलो. कार्यक्रम  सुरु झाला. आणि प्रत्येक वक्ता," साहेब, तुमच्या इतका अनुभवी नेता देशात दुसरा नाही. तुमच्या अनुभवाची देशाला गरज आहे. त्यामुळे यावेळी तुम्हीच पंतप्रधान व्हायला हवे. आम्ही नव्हे तर संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे." असे सांगत होता. मी मनातल्या मनात म्हणालो यांचे दहा खासदार निवडून येणार नाहीत यांचे. महाराष्ट्राच्या पलीकडे यांची धाव नाही. मग पंतप्रधान कशाच्या बळावर होणार? खरंतर पवारांची सद्दी कधीच संपली होती.सुंभ केव्हाच जळाला होता. पण पीळ अजूनही शिल्लक आहे असं दाखविण्याचा शरद पवार जाणीवपूर्वक प्रयत्न करत होते. मी निवडणूक लढवणार असं म्हणणाऱ्या पवारांना अवघ्या १५ दिवसात ज्या रीतीने माघार घ्यावी लागली आहे ती पाहिली तर हा माणूस पंतप्रधान झाला असता तर कसे निर्णय घेतले असते असा फार मोठा प्रश्न पडतो.

परंतु मतदार संघातला जनतेचा रोष पाहून पवारांनी माघार घेतली हे जितके खरे तितकेच पवारांचे घरातसुद्धा काही चालत नाही हेही खरे आहे. अजित पवारांचा पार्थसाठी हट्ट. पवार उभे राहिले आणि त्याचवेळी पार्थला उमेदवारी दिली तर त्याचा फटका पार्थलाच बसणार हि शक्यता. त्यासाठी घरात धुसफूस झाली असणार आणि म्हणून मग शरद पवारांनी माघार घ्यायचा निर्णय घेतला असणार. परंतु पत्रकारांचे विधान काय तर, "शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत आत्तापर्यंत दाखवलेली स्वतःबद्दलची अनिश्चितता कायम ठेवली. "

माझा प्रश्न एवढाच असे नेते देशाचे पंतप्रधान झाले तर देश अनिश्चिततेच्या केवढ्या मोठ्या खाईत लोटला जाईल. ज्या नेत्याचा अंमल आपल्या घरात चालत नाही त्याचा हुकूम देशाने कसा मानला असता. आता तरी विरोधकांचे समर्थन करणाऱ्या मंडळींनी डोळे उघडावेत. आणि इतक्या बेभरोशी लोकांना सत्तेपासून  शक्य तेवढे दूर ठेवावे. सत्तेत कोण येणार भाजप, काँग्रेस कि तिसरी आघाडी हे महत्वाचे नाही. देशाला गरज आहे ती स्थिर सरकारची. आणि खिचडी सरकार म्हणजे स्थिरता नव्हे.

No comments:

Post a Comment