Tuesday, 4 June 2019

पानापानात आढळणारी चंदनाची फुलेफुले

महिना होऊन गेला असेल. मी आणि गझलकार बबन धुमाळ FC रोडवरील वैशालीत बसलो होतो. दुपारचे दोन वाजले होते. पोटाचे कानेकोपरे काहीतरी चटपटीत हवं म्हणून याचना करत होते. आमी नुकतेच स्थानापन्न झालो होतो. मेनूकार्ड उघडण्याच्या तयारीत होतो. तर समोर जेष्ठ कवी मभा चव्हाण उभे. त्यांच्या सोबत एक स्त्री. क्षणभर मी ओळखलेच नाही. कारण प्रत्यक्ष परिचय नव्हता. फेसबुकवर चेहरा पाहिलेला. मभांना नमस्कार केला आणि त्या स्त्रीकडे वळून म्हणालो, " तुम्ही चंदना सोमाणी का? " त्या म्हणाल्या,"हो." आणि मभांकडे निर्देश करत म्हणाल्या,"आणि हे माझे बाबा."

मभांचा आणि माझा चांगला परिचय आहे. आणि त्यांच्या अत्यंत दर्जेदार कवितेमुळे मला त्यांच्याविषयी मनापासून आदर आहे. पुढे चंदनाच म्हणाल्या,
" बरं झालं सर तुम्ही भेटलात. तुम्हाला काव्यसंग्रह द्यायचा होता. तो वाचा आणि त्यावर लिहा काहीतरी. "

कमीतकमी पंधरा दिवस लागतील असे सांगून भक्तिभावाने मी तो काव्यसंग्रह हाती घेतला. पण दोन आठवडे मी तो उघडू सुद्धा शकलो नाही. हाती घेतल्यानंतर वाचण्यात आठ दिवस गेले. लिहायला तीनचार दिवस लागले. अशा रितीने आज जवळ महिना गेला आणि आज मी माझं मनोगत व्यक्त करतो आहे.

*********************************************************************************

' चंदन आणि चंदना' या नावातच काव्य आहे. आणि असे नाव धारण करणाऱ्या व्यक्तिमत्वाची कविता अधिक काव्यमय असणं साहजिक आहे. त्यात ते व्यक्तिमत्व स्त्री असेल तर स्त्रीची माया, ममता, प्रेम, हळुवारता, कोमलता शब्दात उतरणं अनिवार्य आहे. त्यामुळेच चंदना सोमाणी यांचा 'चंदनाची फुले' हा काव्यसंग्रह सहज मोहात पाडतो. आपल्याही नकळत आपण त्यांच्या गझलेच्या, कवितेच्या प्रेमात पडतो. शब्दांवर नितांत प्रेम असणारी या कवयत्री. त्यामुळेच मनोगत व्यक्त करताना त्यांना भाराभर शब्दांची गरज पडत नाही. 'मी फक्त लिहिते' या एका कवितेतूनच त्या त्यांचं मनोगत व्यक्त करतात. पण त्या फक्त लिहीत नाहीत मनातले भाव कागदावर उतरवतात आणि म्हणूनच त्याच्या गझलेला, कवितेला एक अस्सलतेचा सुगंध आहे.

चंदना सोमाणी यांची गझल जीवनवादी आहे, मानवतावादी आहे. आयुष्याला, आयुष्यात येणाऱ्या संकटाला भिडण्याचा, दोन हात करण्याचा निर्धार त्यांच्या गझलेतून, कवितेतून दिसून येतो. चंदनाची फुले या पहिल्याच आणि संग्रहाचे शीर्षक धारण केलेल्या गझलेत कवयत्रीचे नाव तिने इतके बेमालूमपणे गुंफले आहे कवयत्री आणि तिची कविता, गझल या दोन वेगळ्या बाबी नसल्या जाणीव प्रकर्षाने होते. या गझलेत चंदनाची फुले हा रदीफ कवयत्रीने वापरला आहे. आणि प्रत्येक शेरात तो इतका चपखल बसला आहे. जसे एखाद्या सुंदरीच्या केसात चाफ्याचे फुल असावे.

या गझलेतील प्रत्येक शेर अभ्यासावा असा आहे. उदा.

पाकळी पाकळी शब्दवेडी कळी
सांडते शायरी चंदनाची फुले.

अथवा -

रानमाळावरी अमृताच्या सरी
याच वाटेवरी चंदनाची फुले. 

सुरुवातीला २५ ते २६ गझल आणि नंतर मुक्त छंदातील कविता असे या संग्रहाचे स्वरूप. सुरुवातीच्या गझल वाचताना आपण प्रत्येक गझलेगणिक संग्रहाशी एकरूप होत जातो. प्रत्येक गझलेगणित कवयत्रीविषयी मनातला आदर वाढत जातो. सगळ्याच गझल अत्यंत अविश्वसनीय आहेत. अत्यंत आशयगर्भ, नाविन्यपूर्ण आहेत.

ओळखीची माणसेही वागती 'खिल्जी ' प्रमाणे
पद्मिनी जोहर सुद्धा वाटतो आता नकोसा.

हा शेर पाहिल्यानंतर आपण अचंबित होतो. इतके ऐतिहासिक संदर्भ असलेला शेर फार क्वचित पहायला मिळतो. ओळखीची माणसे जर शत्रूप्रमाणे वागणार असतील तर आत्मबलिदान तरी का करायचं?

तिमाने, कृषक, पयोधर असे कितीतरी शब्द या काव्यसंग्रहात सहज आढळून येतात आणि त्यामुळेच कवयत्रींच्या संपदेविषयी मनात कुठेही शंका निर्माण होत नाही. चंदना सोमाणी यांच्या गझला वाचताना आपण त्यात अडकून पडतो. प्रयेक घोटाचा आस्वाद घेत चहा घ्यावा तसे या गझला वाचताना आपण पत्र्येक शेराचा स्वतंत्र आस्वाद घेतल्याशिवाय पुढे जाऊच शकत. तो शेर मनात खोल उतरत नाही तोवर आपल्याला पुढे जावेसे वाटत नाही. भ्रमाने कमलदलात गुंतून पडावे तसे रसिक चंदन सोमाणी यांच्या गझलेच्या प्रत्येक शेरात, प्रत्येक कवितेत अडकून पडतो.

शेतकरी आत्महत्या करतो. परंतु तो ज्या झाडाला गळफास घेतो त्या झाडाला शेतकऱ्याला गळफास घेताना पाहताना किती वेदना होत असतील याचा शेतकऱ्याच्या मनाला कधीच शिवला नसेल. पण कवयत्री इतकी हळवी आहे कि तिला ते संदर्भ तिच्या गझलेत घ्यावेसे वाटतात. आणि आणि अत्यंत उद्विग्न मनाने ती आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यालाच प्रश्न विचारू पाहते तेव्हा म्हणते  -

जिथे फास घेतोस कृषका, अरे त्या
तरुच्या मनांचा किती कोंडमारा.

शेतकरी दादा आत्महत्या करताना तूला तुझ्या बायका पोरांचा, आई वडिलांचा विचार नाहीच करावासा वाटत. मनावर पाषाण ठेवून तू आत्महत्या करतोस. अरे पण ज्या झाडाला तू गळफास घेतोस त्या झाडाला काय वाटत असेल ? त्याला किती वेदना होत असतील ? याचा कधी विचार करतोस का रे ?

गझलांचा दालन संपतं आणि आपण चंदना सोमाणी यांच्या मुक्त छंदातील गझलांच्या दालनात प्रवेशतो. चांगल्या कविता म्हणून विशेष नामोल्लेख करणे मला मुळीच गरजेचे वाटत नाही. कारण मुक्तछंदातील कविताही चांगल्या आहेत. परंतु सुरवातीला आभाळाला गवसणी घालणाऱ्या गझला वाचल्यानंतर त्यांच्या मुक्तछंदातील कविता मात्र काहीश्या निराश करतात. पण त्यामुळे चंदनाची फुले या काव्यसंग्रहाच्या गुणवत्ततेला फारशी बाधा पोहचत नाही. एकुणात संग्रही असावा असाच हा एक काव्यसंग्रह.

चांदणं सोमाणी यांच्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा.

विजय शेंडगे, पुणे  

No comments:

Post a comment