
दुपारी एका व्हॉट्स अप ग्रुपवर एकाने, "चांगल्या प्रतीचे आंबे कुठे मिळतील?" अशी विचारणा केली होती. खाणे, पिणे, फिरणे, मौज, मजा याचा शौक असलेलेच खूप. "चला पार्टी करू या. " तरुणांपासून, ज्येष्ठांपर्यंत आणि वृद्धांमध्येही अगदी पावला पावलाला सापडतील. परंतु "चला पुस्तकं प्रदर्शनाला जाऊ" असे म्हणणारे कुठे भेटतील का?
राजकीय पोस्टवर उड्या घेणारे, साहित्यिक, सामाजिक पोस्टकडे दुर्लक्ष का करतात? रडणाऱ्या मुलासमोर मोबाईल ठेवणारे प्रत्येक घरात भेटतील परंतु त्यांच्या समोर वाजवणारे, बडबड गीतांचे, छोट्यांच्या गोष्टीचे पुस्तकं ठेवणारे कुठे तरी भेटतील का?
जुनी पिढी फार व्यासंगी होती. अनेक कलांमध्ये पारंगत होती. तसे आजच्या पिढीला काय येते? किती येते? एक पिढी होती जी दिवाळीचा आकाश दिवा स्वतः बनवायची. आजची पिढी रस्त्यावर टांगलेल्या आकाश दिव्यातून अधकाधिक महागडा आकाश दिवा निवडण्याचे काम तेवढे करेल.


हे लिहायला तसच कारण घडलं. पंधरा दिवसांपूर्वी चिकलवाड काकांची भेट झाली. ८३ वर्षांचे हे गृहस्थ. लाकडांमध्ये उत्तम कोरीव काम करतात. अलिकडे अशी काम करणारी मंडळी दिसत नाहीत अशी खंत व्यक्त करतात. मी त्यांच्या चरणाशी अर्पण केलेल्या माझ्या तमोहरा कादंबरीवर आठ दिवसात मत व्यक्त करतात. त्यांचा अभिप्राय नंतर सांगेन. परंतु या वयात त्यांचा दिनक्रम अनुकरण करावा असा आहे. ते व्यायाम करत नाहीत. शतपावली करीत नाहीत. मिर्नींग वॉकला जात नाहीत. सकाळी उठतात. अंघोळ करतात. नाश्ता करतात. आणि ८ वाजता त्यांचे लाकडी शिल्पे घडविण्याचे काम सुरू करतात. दुपारी दीड पर्यंत तेच काम. त्यानंतर उठतात. जेवण करतात. आणि तीन वाजता चित्र काढायला सुरुवात करतात. सहापर्यंत तेवढेच काम. मग संध्याकाळी चहा पाणी, थोडा टिव्ही, जेवण आणि झोपणे. अशी शिस्त अलिकडे कोणाला उरली आहे. बायको आठला उठते, नवरा नऊ वाजता उठतो तर मुलं त्यांच्या मनाला येईल तेव्हा उठतात आणि हवी तेव्हा झोपतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणे अत्यंत कठीण. परंतु अशा व्यक्तिमत्त्वांचे अनुकरण केले तरी जगण्याला आकार येईल.
No comments:
Post a Comment