( प्रत्येक कवीने लेखकाने हा लेख वाचायलाच हवा.)
जेष्ठ कवी उद्धव कानडे यांच्या समग्र कवितांचा आढावा घेणारा. त्यातील निवडक कवितांचा समावेश असलेला 'समतेचा ध्वज ' हा ग्रंथ खुद्द त्यांनीच मला दिला. वेळ काढून तो मी वाचला. जमेल तसा समजून घेतला. भारावून गेलो आणि आज पोस्ट लिहायला बसलो. कवी उद्धव कानडे मला गुरुतुल्य. त्यांच्या कवितेवर मी पामराने काय लिहावं. पण जे भारावलेपण आहे ते मला लिहिते करते आहे.
तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलगे
यांनी या ग्रंथाचं संपादन केलं आहे. जेष्ठ साहित्यिक विश्वास वसेकर यांची प्रस्तावना या ग्रंथाला लाभली आहे. वसेकर त्यांच्या प्रस्तावनेत म्हणतात - ' कविता हि इतकी सोपी गोष्ट झाली आहे कि. आडवं आडवं लिहिलं ते गद्य आणि उभं, उभं लिहिलं ती कविता. त्यामुळे नुसतं कविता वाचणाऱ्यानेच नव्हे तर कविता लिहिणाऱ्यानेसुद्धा कविता म्हणजे काय हे समजून घेण्याची आवश्यकता आहे.विश्वास वसेकरांचं निरीक्षण अगदी योग्य आहे. अलीकडे उठसुठ कोणीही कविता लिहितो. पदरमोड करतो. काव्यसंग्रह काढतो. आज सकाळीच व्हॅट्सऍपवर फिरत फिरत एका प्रकाशन संस्थेची जाहिरात आली. त्याने म्हटले होते कि आता ९९९९ रुपयामध्ये करा तुमचे पुस्तक प्रकाशित. आजच फोन करा. अशा रीतीने साहित्यप्रकाशित करून देणारे अनेक प्रकाशक बाजारात दुकान मांडून बसले आहेत. त्यांना काय? ढेकळं छापा म्हटलं तरी ते छापतील. पण विश्वास वसेकर म्हणतात त्यानुसार कविता म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर समतेचा ध्वज हा ग्रंथ प्रत्येकाच्या संग्रही असायलाच हवा.
हा ग्रंथ संग्रही असायलाच हवा असं मी जे म्हणतो आहे त्याला आणखी एक कारण आहे. कोणत्याही कवीच्या सगळ्याच कविता उत्तम असतात असे नव्हे. कुसुमाग्रज, माधव ज्युलियन, बाभ बोरकर हे सुद्धा त्याला अपवाद नाहीत. कवी उद्धव कानडे यांच्या आजवर वीसच्या आसपास साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत. त्यात 'केशरमाती', 'मानवदरा', 'हृदयरंग', 'अस्वस्थायन' आणि 'आम्ही घामाचे धनी' असे पाच कवितासंग्रह आहेत. यातील 'हृद्यरंग' वगळता इतर चार कवितासंग्रहातील निवडक कविता 'समतेचा ध्वज' या संपादित ग्रंथात एकत्रितपणे वाचायला मिळता.
साधं सोपं पण साजेसं मुखपृष्ठ. मलपृष्ठावर असलेली कुसुमाग्रज, नारायण सुर्वे, प्रा. रा. ग. जाधव, डॉ. निर्मलकुमार फडकुले, प्रा. राम शेवाळकर, डॉ. नागनाथ कोतापल्ले अशा मान्यवरांची अवतरणे उद्धव कानडे यांच्या कवितेविषयी खूप काही सांगून जातात. ती अवतरणे वाचली तरी हा ग्रंथ आपल्या संग्रही असायलाच हवा असे प्रत्येक कवीला वाटेल.
पुस्तकाचे नाव : समतेचा ग्रंथ
प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन
पृष्ठे : २४४
मूल्य : २५० रुपये
No comments:
Post a Comment