Saturday, 30 August 2014

Song for kids : पावसा रे पावसा

मला खात्री आहे आपल्या हि बालकविता आणि त्याचं झालेलं बालगीत निश्चित आवडेल. बऱ्याचदा संगीतकार संपूर्ण गाण्याचा गीतात समावेश करत नाहीत. इथंही तेच झालंय त्यामुळेच. मी इथं संपूर्ण मुळ कविताही दिली आहे. सर्वात शेवटी गाण्याचा व्हीडीओही आहे. गाणं डाऊन लोड करण्यास माझी मुळीच हरकत नाही. पण या गीताचा व्यावसायिक वापर करावयाचा असल्यास माझी परवानगी घेणे बंधनकारक आहे.


शाळा सुरु होते ना होते तोच मुलांना शाळा नकोशी वाटू लागते. मग ती शाळेला बुट्टी मारण्यासाठी एक ना अनेक हजार बहाणे शोधू लागतात. ' सांग सांग  भोलानाथ ' हे गाणं सर्वपरिचित आहेच.  मंगेश पाडगावकर यांच्यासारख्या दिग्गज कविचं हे गीत. शाळेभोवती तळे साचणे, आई झोपल्या नंतर डब्यातला लाडू चोरणे,  आठवड्यातून तीनदा रविवार येण्याची अपेक्षा करणे या साऱ्याच कल्पना बाल मनाचं अचुक प्रतिनिधित्व करतात. परंतु ' पावसा रे पावसा ' हे गीत लिहिताना माझ्या डोळ्यासमोर ' सांग सांग  भोलानाथ ' नव्हतं. अत्यंत नव्यांना मला हि बाल कविता सुचली. पुढे ' रे घना , या माझ्या कवितांच्या आणि गीतांच्या कार्यक्रमात त्या बालकवितेचं बालगीत झालं आणि ते सर्वात जास्त भाव खाऊन गेलं.

शाळेला बुट्टी मारण्यासाठी मुलांना काहीही कारणं चालतात. त्यातच आभाळ दाटून आलेलं असेल तर मग काही सांगायलाच नको. हा ‘ पाऊस ‘  म्हणजे त्यांना जीवाभावाचा सोबती वाटू लागतो.

या कवितेतल्या मुलालाही शाळेत जायचं नाहीये. पण घरी रहाण्यासाठी आईला कारण काय सांगाव ? हा फार मोठा प्रश्न त्याच्यासमोर पडलाय. हि कविता लिहिताना नाही म्हणलं तरी  ' सांग सांग  भोलानाथ ' या गाण्याचं स्मरण मला झालंच. पण त्या गाण्यातल्या मुलाचा संवाद नंदिबैलाशी होता आणि माझ्या गाण्यातल्या मुलाचा संवाद प्रत्यक्ष पावसाशी आहे त्यामुळेच अधिक विचार न करता माझ्या गाण्यात कल्पनांचं नाविन्य आलंय. अभ्यासातले गणितासारखे विषय राक्ष वाटल्यामुळे ढगाआड लपण्याची कल्पना, पावसाची पापी घेण्याची कल्पना , पावसाला खिसाभरून गरम भजी देण्याची कल्पना. या मला सर्वाधिक आवडलेल्या कल्पना.

या गाण्यातल्या मुलाला मात्र भोलानाथाशी संवाद साधणारा आणि शाळेला बुट्टी मारण्यासाठी आईला पोटात दुखतय असं कारण सांगणारा त्याचा मित्र आठवतोय त्यामुळेच सहाजिकच ' पोटात दुखतय ‘ असं कारण सांगून आईला काही पटणार नाही याची त्याला जाणीव आहे. म्हणूनच तो पावसाला कशी विंनती करतोय ते पहा -


" पावसा रे पावसा "

पावसा रे पावसा लवकर ये
तुझ्या कुशीमध्ये मला आणि घे …………….!! धृ !!

शाळेची कटकट नको वाटते
रोज रोज हातावर झडी बसते
  रिमझिम छडी तुझी हातावर दे, पावसा रे पावसा,…….!! १ !!

रोज रोज अभ्यास करू मी किती
डोळ्यापुढे पुस्तक धरू मी किती
रिमझिम गाणे मला तुझे म्हणू दे, पावसा रे पावसा,…!! २ !!

खोल खोल असतात भूगोलाची मुले
गणिताला असतात चार चार सुळे
ढगामध्ये मला तुझ्या जरा लपू दे, पावसा रे पावसा,…!! 3 !!

शाळेमध्ये ये एकदा, गुरुजी होऊन
शाळाच आख्खी जाऊ दे वाहून
गोड मग मला तुझा पापा घेऊ दे, पावसा रे पावसा…….!! ४ !!

बोट धरून माझ्या तुला माझ्या घरी मी नेईन
गरम भाजी अन शिराही देईन
खिसा भरून मग तुझ्या मला गार गारा दे, पावसा रे पावसा……..!! ५ !!

 


4 comments:

 1. तुमची कविताच खुप छान आहे. सहाजिकच गाणंही सुरेख झालंय

  ReplyDelete
 2. अनामिक मित्रांनो प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. पण प्रतिक्रिया देताना आपण Anonymous या पर्याया ऐवजी Name / URL हा तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय आपणास केवळ आपले नाव टाकूनही प्रतिक्रिया देता येईल. या पर्यायासाठीही login करण्याची गरज पडत नाही.

  ReplyDelete
 3. अनघा कुलकर्णी3 September 2014 at 20:08

  गाणं खुपच छान झालंय आणि मी डाऊन लोडही करून घेतलंय. नव्या कवितेच्या अपेक्षेने मी रोजंच तुमचा ब्लॉग पहाते.

  ReplyDelete
 4. अनघा प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. तुमच्यासारख्या रसिक वाचकांच्या प्रतिसादामुळे खुप हुरूप येतो . पण इच्छा असूनही दररोज लिहिणं शक्य होत नाही.

  ReplyDelete