आज रात्री बारा वाजून गेल्या बरोबर अंधाराच्या पलीकडे कुठेतरी नव्या वर्षाचा सुर्य उगवत असेल. तुमच्यासाठी, माझ्यासाठी प्रत्येकासाठी तो नव चैतन्य घेऊन निघाला असेल. मी कुठल्या गुत्त्यावर
नाही घरीच आहे. घड्याळात बारा वाजण्याची वाट पहात आहे. टिव्हीवर माझा आवडता सिनेमा ' लगे रहो मुन्नाभाई ' लागलाय. सिनेमा पहाता पहाताच नव्या वर्षासाठी कशी पोस्ट करावी याचा विचार करतोय.
पावणेबारा वाजलेत. मी उठलो. पीसी सुरु केला. डोक्यात विचार चालू आहेत. सूर्यास्त आणि सूर्योदय यांचा मेळ साधण्याचा विचार आहे. बारा वाजले. फटाक्यांच्या आतषबाजीचे आवाज येऊ लागलेत. आणि माझ्या मनातलं विचारांचं काहूर थांबलंय. मी ठरवलंय आपण नव्या वर्षाचं स्वागत करण्यापेक्षा मावळत्या वर्षाला निरोप देऊ. कारण सरत्याची आठवण कोणीच ठेवत नाही. त्याविषयी कोणीच काही लिहित नाही. काळाच्या ओघात जिवाभावाच्या माणसाचा विसर पडावा तसा सरत्या वर्षांचा विसर पडतो. म्हणून मला नव्या वर्षाचं स्वागत करण्यापेक्षाही मावळत्या वर्षाचे आभार मानणं, सरत्या वर्षाचे ऋण व्यक्त करणं अधिक गरजेचं वाटलं आणि त्यातुनच आकाराला आली. ' हे मावळत्या सूर्या …. ' हि कविता.
हे मावळत्या सूर्या आमच्या आधी
तुच ठोठावलंस उगवत्या सूर्याचं दार,
नव्या वर्षाचं स्वागत करूच रे आम्ही
पण आधी तुझे आभार.
तुही खेळावंलस अंगाखांद्यावर वर्षभर
तुही झेललेस ना आमचे शब्द,
जे चांगलं झालं ते सारं तुझ्यामुळे
जे जे अघटीत ते सारं, आमचं रे प्रारब्ध.
हे मावळत्या वर्षा दिनदर्शिका जाईल अडगळीत
पण तू जात नसतोस कधीच काळाआड,
नव्या वर्षांच्या अंगणात खेळताना
आम्हाला आठवतील तू केलेले लाड.
तूच दिलेस आमच्या स्वप्नांना पंख
तुच दिलास आमच्या जगण्याला श्वास,
प्रत्येक दिवसाला पडद्याआड ढकलताना
तूच जागवलीस नव्या वर्षाची आस.
तुला निरोप देताना वेदनेची
रेषासुद्धा नसेल चेहऱ्यावर,
तुच तर आजवर ठेवलेस सुर्य
अंधाराच्या पहाऱ्यावर.
हि अखंड कविता. चित्रात पहिली तीन कडवीच आहेत. कारण चित्रात संपुर्ण कविता टाकायला गेल्यास अक्षरे खूप लहान करावी लागत होती.
पोस्ट लिहिता लिहिता नव्या वर्षासाठी काही ओळी सुचल्यात. पहा रुचताहेत का ?
आम्ही झेपावतो आहोत तुझ्या दिशेने
पण तू बळ दयायला हवस,
कधी ठेचकाळो, धडपडलो तर
उचलुन घ्यायला हवसं.
आमच्या मनातल्या काळोखाला
तूच दाखव प्रकाशाचे किरण,
आम्ही करू प्रयत्नांची पराकाष्ठा
भविष्याचे दूत यायला हवेत शरण
बंद मुठीतसुद्धा अंधार नको
डोळे दिपवणारा प्रकाश हवा,
अंधाराच्या गर्भात जन्मू दे
हवा हवासा सुर्य नवा.
' काळाच्या ओघात जिवाभावाच्या माणसाचा विसर पडावा तसा सरत्या वर्षांचा विसर पडतो. म्हणून मला नव्या वर्षाचं स्वागत करण्यापेक्षाही मावळत्या वर्षाचे आभार मानणं, सरत्या वर्षाचे ऋण व्यक्त करणं अधिक गरजेचं वाटलं. ' आपला हा विचार खूप आवडला.
ReplyDeleteआभार स्वप्ना.
Delete' तुला निरोप देताना वेदनेची
ReplyDeleteरेषासुद्धा नसेल चेहऱ्यावर,
तुच तर आजवर ठेवलेस सुर्य
अंधाराच्या पहाऱ्यावर.'
खूप छान ओळी.
आभार दिपाली.
Delete