Friendship , friends in college
मी परवा पुणेकर आणि नगरकर यांच्यातला स्वभाव विशेष स्पष्ट करणारा एक छोटासा लेख लिहिला होता. आणि मी स्वतः नगरचा असुनही नगरकरांवर काहीशी टीका केली होती. पण माझा लेख खोटा ठरेल असा माझा पाहुणचार माझ्या नगरच्या दोन मित्रांनी केला. त्यातला पहिला भगवान नगरे आणि दुसरा प्रकाश आंधळे. या दोघांना मी कॉलेज लाईफनंतर केवळ दुसऱ्यांदा भेटत होतो. आणि हे कॉलेज लाईफनंतरच लाईफ थोडं थिडकं नव्हे अठ्ठावीस युगे विटेवर उभा राहिलेल्या विठोबाच्या अठ्ठावीस युगांसारखं तब्बल अठ्ठावीस वर्षाचं आहे होतं .
खरंतर संध्याकाळी मी आणि माझा नगरमध्ये असलेला डॉक्टर चुलत भाऊ एन्जॉय करणार होतो. ( आता इथेही संध्याकाळची ' एन्जॉय ' म्हणजे काय ? हे वाचकांनी समजून घ्यावे.) मी त्याला सहा वाजता भेटणार होतो. मी माझी नगरमधली इतर काम आटोपली. त्याक्षणी एक वाजले होते. म्हणजे मला नगरमध्ये चक्क पाच तास टाईमपास करायचा होता.
मी परवा पुणेकर आणि नगरकर यांच्यातला स्वभाव विशेष स्पष्ट करणारा एक छोटासा लेख लिहिला होता. आणि मी स्वतः नगरचा असुनही नगरकरांवर काहीशी टीका केली होती. पण माझा लेख खोटा ठरेल असा माझा पाहुणचार माझ्या नगरच्या दोन मित्रांनी केला. त्यातला पहिला भगवान नगरे आणि दुसरा प्रकाश आंधळे. या दोघांना मी कॉलेज लाईफनंतर केवळ दुसऱ्यांदा भेटत होतो. आणि हे कॉलेज लाईफनंतरच लाईफ थोडं थिडकं नव्हे अठ्ठावीस युगे विटेवर उभा राहिलेल्या विठोबाच्या अठ्ठावीस युगांसारखं तब्बल अठ्ठावीस वर्षाचं आहे होतं .
खरंतर संध्याकाळी मी आणि माझा नगरमध्ये असलेला डॉक्टर चुलत भाऊ एन्जॉय करणार होतो. ( आता इथेही संध्याकाळची ' एन्जॉय ' म्हणजे काय ? हे वाचकांनी समजून घ्यावे.) मी त्याला सहा वाजता भेटणार होतो. मी माझी नगरमधली इतर काम आटोपली. त्याक्षणी एक वाजले होते. म्हणजे मला नगरमध्ये चक्क पाच तास टाईमपास करायचा होता.
गावी शेतावर मला घर बांधायचं होतं. नगरमध्ये कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये माझे बरेच मित्र होते. एखाद्याला भेटावं आणि त्याच्याकडून प्लॅन काढून घ्यावा. आपलं कामहि होईल आणि तास दोन तास वेळही जाईल या हेतूने मी प्रकाशला फोन केला. तर बाबा बिझी. म्हणजे फोन लागला. तो त्यानं उचललाही. माझ्याशी बोललाही. पण , ' तीन चार पर्यंत फ्री होईन .' असं त्यानं सांगितलं. खरंतर पाच पर्यंत फ्री होणार नाही हे मला त्याच्या बोलण्यातून लक्षात आलं होतं. मी त्याच्या भेटीची आशा सोडली. कारण यापूर्वीही दोन तीन वेळा नगरमध्ये आल्यानंतर मी प्रकाशला फोन केला होता. पण त्याची भेट होऊ शकली नव्हती.
मग मी रत्नाकरला फोन लावला. तर हा बाबा पुण्यात. मी त्याला माझं काम सांगितलं तर त्यानं भगवानला भेटायची सूचना केली.
मी रत्नाकरचं फोन डिस्कनेक्ट केला आणि भगवानला फोन लावला. खरंतर नावामुळे का असेना ' भगवान ' सर्वात जास्त बिझी असायला हवा होता. पण ऑफिसवर लोकांचं पेमेंट चाललंय आणि दहा मिनिटात ते झालं कि मी मोकळाच आहे असं सांगत त्यानं मला त्याच्या ऑफिसचा ठावठिकाणा सांगुन ऑफिसवर यायची विनंती केली.
नगरच्या गल्ली बोळातून फिरून मी त्यानं सांगितल्या प्रमाणे सावेडी नाक्यावर पोहचलो. तिथून पुढची खुण सापडत नव्हती. त्याला फोन केला तर म्हणाला , " थांब तिथंच. मी येतो तुला घ्यायला." पाच एक मिनिटात भगवान तिथं पोहचला. त्याच्या बरोबर त्याचा पार्टनर. एका हॉटेलात शिरलो. कॉफी घेतली. मी त्याला माझा काम सांगितलं. हॉटेलातून उठून आम्ही त्याच्या ऑफिसवर गेलो. त्यानं काही रेडीमेड प्लॅन दाखवले. त्यातला एक मी घेतला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मुला फुलांची चौकशी झाली. ( इथं फुलं हा शब्द बायको आणि इतर अवांतर बाबींबद्दल आहे. आता अवांतरला ज्याने त्याने यथाबुद्धी प्रतिशब्द वापरावा. )
भगवान म्हणाले , " विजु , नाईंटी, नाईंटी ? " काय ते सुज्ञ आणि जाणकार वाचकांच्या लक्षात आलं असेल. भगवंतांना खरंतर मदिराक्षी घेणार का ? सोमरस प्राशन करणार का ? असे काही विचारायचे असावे. पण विज्ञान युगाची भाषा त्यांनी आत्मसात केल्यामुळे, " नाईंटी, नाईंटी ?" असे विचारताच आम्ही फारसे आढेवेढे न घेता होकार भरला. ( या होकार भरण्यात पेग भरण्याची अदा आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे.) त्याच्या गाडीतून बारला गेलो. आणि भर मध्यान्ही मदिरा प्रष्णास सुरवात केली. ( खरंतर इथं भर मध्यान्ही म्हणण्याचे काही कारण नाही. कारण एक तर दुपारचे दोन वाजले होते. आणि वर्षाॠतूतील ढगाळ , अल्हाददायक हवामानामुळे भर दुपारच्या उन्हाची दाहकता अजिबात जाणवत नव्हती. )
गप्पांच्या नादात नाईंटी, नाईंटीचा एक पेग संपवायलाही आम्हाला ( देवाशप्पथ ) पाच सव्वापाच वाजले. मध्ये मिलिद देशपांडेला फोन झाला , गोट्याला फोन झाला , राजू ढमालेला फोन झाला, अनेकांची ख्याली खुशाली विचारून झाली. मी घड्याळाकडे बघितलं. पुढचा अर्धा पाऊन तास कसाही जाणार होता. आम्ही उठायच्या बेतात होतो आणि अगदी अनपेक्षितरित्या प्रकाशचा फोन आला. " कुठं आहेस विजु ? "
काय सांगणार ? आत शिरताना मी बारचं नाव पाहिलं नव्हतं आणि नगरचा नकाशा मला अजिबात तोंडपाठ नव्हता. मी फोन भगवानला दिला.त्यांचं काय बोलणं झालं कुणास ठाऊक. पण भगवाननं मला गाडीत घेतलं. आणि आम्ही अहमदनगर क्लबवर पोहचलो. क्लबच्या गेटबाहेरील पार्किंगला गाडी पार्क करून आम्ही गाडीजवळ थांबलो तर लगेच सेक्युरिटीनं " कोण हवंय ? " म्हणत आम्हाला हटकलं. आम्ही प्रकाशचं नाव सांगितलं तरी " त्यांना फोन केलंय का ? " अशी विचारणा केली. आम्ही , " नाही . " म्हणालो असतो तर कदाचित त्या बाबानं आम्हाला तिथुन हाकलून दिलं असत.
मग हा क्लब कसा आहे. नगर शहरातल्या फक्त बड्या असामीच या क्लबच्या सभासद कशा आहेत. या क्लबची मेंबरशीप कशी सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर आहे. इथली मेंबरशीप मिळण किती कठीण आहे. मेंबरशिपची फी किती लाख आहे ( माणशी सहा लाख रुपये ) इत्त्यादी , इत्यादी माहिती मला भगवाननं पुरवली.आणि प्रकाश दिसण्याआधी त्याचं मोठेपण मला दिसू लागलं.
पाच दहा मिनिटात प्रकाश तिथे हजर झाला. त्याला पाहिल्याबरोबर सुरक्षारक्षकानं सलाम ठोकला. त्याचा आदर करत प्रकाश आमच्या दिशेने झेपावला आणि त्यानं माझी कडकडून गळाभेट घेतली. त्याचं मोठेपण मला कुठंच दिसला नाही. दिसला तो फक्त माझा मित्र. हाय , हॅलो झालं. प्रकाशनं आम्हा दोघांना त्याच्या गाडीत घेतलं. नगर शहरात ठिकठिकाणी सुरु असलेल्या त्याच्या साईट त्यानं आम्हाला दाखवल्या. ' माधव बाग ' हि त्याच्या अनेक स्किमांपैकी अडीचशे फ्लॅटची एक स्किम. नव्वद टक्के फ्लॅट बुक झालेले. अनेकांना ताबे दिलेले. उत्तम अंतर्गत डांबरी रस्ते, दुतर्फा झाडी , विजेचे खांब, त्यावर विजेचे ( चालू असलेले ) दिवे. चार चार सोसायट्यांना एकत्रित अशी करून दिलेली बाग. आणि हे सगळं दाखवताना बढेजाव नाही. बिल्डर म्हणून भगवान आणि प्रकाश दोघेही चांगलेच नावारूपाला आले होते. प्रकाश म्हणजे नगरमधला ' डिएसके ' च. पण दोघेही अनिम मुरकुटे आमच्यापेक्षाही मोठा आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही या व्यवसायात पाय धेवू शकलो हे सांगायला विसरले नाहीत.
सगळं फिरून आम्ही पुन्हा क्लबवर आलो. प्रकाशनं क्लबही फिरून दाखवला. तिथला स्विमिंग टँक, तिथलं लॉन टेनिसचे कोर्ट, तिथली पार्क सगळं काही. मस्त वाटलं. आम्ही आमचे फोटो काढले. सव्वासहा वाजले होते. माझी वेळ संपली होती. मला माझ्या भावाकडे जायचं होतं. प्रकाशनं तिथल्या बारकडे पाहिलं. अजून बंद होता. सातला सुरु व्हायचा होता. प्रकाशला पहातच सर्व्हिस करणारे तीन चार जण त्याच्याकडे आले. त्याला मनोमन सलाम ठोकला. प्रकाशनं त्यांना बार लवकर उघडण्याची विनंती केली. मी माझी अडचण सांगताच प्रकाशनं तुझ्या भावालाच इकडे बोलव. असं सांगितलं. मलाही तेच हवं होतं. भाऊ पुन्हा भेटू शकला असता. पण भगवान दुपारी दोनपासून माझ्यासोबत होता. आणि ध्यानीमनी नसताना हाती आलेल्या प्रकाशला मला सोडायचं नव्हतं पुन्हा अशी मैफिल कधी जुळणार होती कोणास ठाऊक. आजचा दिवस आमचा होता.
मी भावाला इकडे येण्याविषयी सांगितलं. प्रकाशनंही ते मान्य केलं. आणि मग अगदी पडेल आवाजात बायको कशी चिडली आहे, तिचा काम मी किती दिवसापासुन कानामागे टाकलं आहे आणि आणि आज जर ते काम केलं नाही तर बायको कशी चिडेल त्यात आणखी पिऊन घरी गेलो तर कसा सगळा रंगाचा बेरंग होईल आणि त्यामुळेच त्याला घरी जाऊन येणं कसं गरजेचं आहे हे सांगितलं. आणि अर्ध्या पाऊन तासात येतो म्हणाला. आम्ही त्याचं अवघड जागचं दुखणं ओळखत त्याला परवानगी दिली.
साडेसातला प्रकाश परतला. आम्ही पेग भरले. मैफिल जमली. माझ्या कविता आणि आमच्या घरगुती गप्पा यात आम्ही पेग मोजलेच नाहीत. उठलो तेव्हा रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते. मी हात हलवून प्रकाशच निरोप घेत होतो आणि माणसाच्या मोठेपणापेक्षा मैत्री किती मोठी असते हे पहात होतो. भगवान तर जवळ जवळ बायका - पोरं ( इथं पोरांचं ठीक आहे. एका व्यक्तीला दोन किंवा त्यापेक्षा अधिक मुले असू शकतात. पण बायका हा शब्द वाक्यात वापरताना अनेकदा ' बायका ' असा वापरला जातो. त्या शब्दाचा अनेकवचनी न घेता एकवचनीच घ्यायचा असतो. हे वाचकांनी लक्षात घ्यावे. ), घर - दार नसल्यासारखा गेली दहा तासापासून माझ्यासोबत होता. पण माणसाच्या व्यावसायिक मोठेपणापेक्षा मैत्रीमोठी ठरली होती. पण मैत्रीला हा मोठेपणा लाभला होता मैत्रीसाठी सारं काही विसरणाऱ्या भगवानमुळे आणि आपल्या मोठेपणाचा बढेजाव न मिरवता मैत्रीसाठी मित्र होणाऱ्या प्रकाशमुळे.
No comments:
Post a Comment