Saturday 2 July 2016

Marathi Poem : तू तरी पावसा असा


Marathi Poem, Marathi Kawita

( मला खात्री आहे तुम्हाला कविता मनापासून आवडेल. वाचून तर पहा. आणि हो ! प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. )

मी दोन एक वर्षापासून ब्लॉग लिहितोय. त्यातून माझा असा एक वाचक आकाराला आलाय. ते नियमितपणे माझं लेखन वाचतात. प्रतिक्रिया देतात. काही चुकलं माकलं तर सांगतात. कधी एखादी प्रेम कविता लिहा असं हक्कानं सांगतात.  तर कधी एखाद्या राजकीय लेखावरून माझ्याशी दोन हात करतात.

परवा
फेसबुकवरच्या एका वाचकानं अशीच ' पावसावरती कविता लिहा ' असा सांगावा दिला. ' काय लिहावं ? ' हा प्रश्न नव्हता. कारण ' पाऊस ' आणि ' प्रेम ' याविषयावर लिहिताना कोणत्याही कवीला , लेखकाला फार आनंद होतो. मी पावसावर कविता लिहिली नाही असा पावसाळा मला आठवत नाही. कधी खूप पडला म्हणून लिहितो तर कधी पडला नाही म्हणून लिहितो. गेल्यावर्षी अशीच पावसाची वाट पाहून सप्टेबर महिन्यात मनासारखा पाऊस पडला तेव्हा आनंदातीशयानं ' या माउली या ' हि कविता लिहिली होती. तर २०१४ ला विठोबाने थेंब व्हावे हि अपेक्षा व्यक्त करताना , ' होई आता थेंब ' हि कविता लिहिली होती. कधीतरी तिच्याशिवाय पावसाळी भटकंतीला गेल्याला प्रियकराला पाऊस भेटत नाही म्हणून ' ती सोबत नव्हती म्हणुनी , पाऊस आला नाही ' असं म्हणत त्या प्रियकराची मानसिकता रेखाटण्याचा प्रयत्न केला. तर कधी ' आला सखा माझा , वेडा होऊन पाऊस ' , असं म्हणत आपल्या प्रियकराची वाट पहाणाऱ्या आणि पावसालाच आपला प्रियकर समजणाऱ्या प्रेयसीची मानसिकता व्यक्त केली आहे.

आठ दहा दिवसापूर्वी गावी एक बरा पाऊस झाला. त्यावरच तूर आणि बाजरी पेरली. पण पुढच्या चार दिवसांत पुन्हा पाऊस नाही. शेवटी वाट पाहून गावाहून पुण्यात परतलो.  प्रवासात अशाच ,

' सोड सोड वीट हरी
  रूप पावसाचे धरी
  भेगाळल्या मातीची रे
 आता तरी किव करी . '

या ओळी मनात अंकुरल्या. पण पुढे त्यांना नीट पाणी घातलं नाही म्हणून त्या ओळींची कविता झाली नाही.

आता त्या मित्राने ' पावसावर कविता लिहा ' असे म्हटल्यावर काय लिहायचे असा प्रश्न पडला. विचार करता करता वाटलं , दुसऱ्यावर राग धरायचा, दुसऱ्याची फसवणूक करून आपला खिसा भरायचा हा माणसाचा गुण तर पावसाला लागला नाही ना ! असा प्रश्न मन खाऊ लागला. कारण निसर्गाचा विचार कुणी करतच नाही हो. शहरात तर ओढे नाले बुजले गेलेच , झाडे तोडली गेलीच , सिमेंटची जंगले उभी राहिलीच. पण गावाकडच्या ज्या माणसाला , शेतकऱ्याला पावसाची खरी गरज असतो तो तरी निसर्गाचा नीट सांभाळ करतो का हो ? अजिबात नाही. तोही कधी सरपणासाठी , तर कधी रानाला वसवा होतोय म्हणून तर कधी जास्तीचे रान लागवडीखाली आणावे म्हणून झाडे तोडत चाललाय.स्वतःच्या पोळीवर तूप पडाव म्हणून बोअर घेत जमिनीची चाळणी करत चाललाय. 

आहे ती आपली जमिन नीट कसत नाही पण ओढ्या वघळी बुजवून सरकारी जमिन घशात घालू लागलाय. खरंतर या जमिनी , हि इस्टेट तो सोबत घेऊन जाणार नाही हे त्याला माहित आहे. पण दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावण्याची त्याला खोड लागलीय. आजवर तो फक्त माणसाच्याच ताटातलं हिसकावून घ्यायचा. पण आता माणसाबरोबरच निसर्गाच्याही मानेवरून सुरी फिरवू लागलाय.

२०१३ चा अपवाद वगळता गेली चार पाच वर्ष पाऊस नेहमीच रडकुंडीला आणतोय. तरी माणसं सुधारत नाहीत. पण पावसानं असं माणसासारखा वागू नये. दुसऱ्याला दुखः देत आपला स्वार्थ साधू नये. या सगळ्या विचारातून हि कविता आकाराला आली.         

तू तरी पावसा असा

तू तरी पावसा असा
माणसासारखा वागू नकोस
आमच्यासारखं आपल्यापुरतं
मुळीसुद्धा जगू नकोस

माणसं ठेवतात आपापल्या
तिजोऱ्यात भरून धन
त्यातलं सोबत सांग गड्या
घेऊन जातात कितीजण

तू तरी करशील काय
ढगामध्ये साठवून पाणी
त्याची काय होणार आहेत
खळखळणारी गोल नाणी.


नाणी तरी काय गड्या 
ताटात घेऊन खाता येतात
तांब्यात भरून काय कुठे
पाणी म्हणून पिता येतात

सुकल्या नद्या, आटले नाले
धरणे सुद्धा कोरडी ठक्क
तुझ्यावरती काय आमचा
थोडासुद्धा नाही हक्क

मान्य आहे केल्या आहेत
लाख लाख आम्ही चुका
पुरे झाला तुझा आता
तोंड दाबून मार मुका

शपथ घेतो यापुढे
झाडे आम्ही तोडणार नाही.
निसर्गाचे नियम खरंच
जरासुद्धा मोडणार नाही.

तू फक्त एक कर
सैरावैरा धाऊन ये
ओढे , नाले , धरणेसुद्धा
काठोकाठ भरून दे.

2 comments:

  1. chan ahe kawita. .aplya hatun itke warsha ghadlelya chukanna suddha bolke karanari. .hoil sagle nit halu halu. .pan adhi todleli hirwal punha anawi lagel. .

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल आभार संकेतजी.

      Delete