Monday, 24 November 2014

Shivsena, BJP : संजय राउतांची गच्छन्ति

( तळाच चित्रं आवर्जून पहा ) 
उद्धव ठाकरेंनी सामनाचं संपादकपद संजय राउतांना देऊन जणु शिवसेनेचं शिवधनुष्यचं संजय राउतांच्या हाती दिलं होतं. पुढे ते शिवसेनेचे प्रवक्ते झाले. आणि मग असे काही तीर सोडत राहिले कि विचारता सोय नाही. धनुष्यातून बाण सोडताना त्यांनी कुठलंही भान बाळगलं नाही. त्यामुळे 
युती धारातीर्थी पडली. स्वबळावर सत्तेचं स्वप्न पहाणाऱ्या शिवसेनेला केवळ ६३ आमदारांवर समाधान मानावं लागलं. खरंतर उद्धव ठाकरेंच्या अत्यंत निकटचे आणि शिवसेनेचे हितचिंतक म्हणुन त्यांनी उद्धव ठाकरेंची समजूत काढायला हवी होती. युतीमध्ये समेट घडवून आणायला हवा होता. सत्तेत सहभागी व्हायला हवं होतं. परंतु ते पक्षाला आणि उद्धव ठाकरेंना नेहमीच उलट दिशेला घेऊन गेले. उद्धव ठाकरेंना नेहमीच मोठी स्वप्नं दाखवत राहिले. उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार हि वल्गना तर त्यांनी इतक्या वेळा केली कि महाराष्ट्रातल्या जनतेलाही भ्रम झाला. आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री व्हायला हवेत असं जनतेला वाटायला लागलं. अगदी माध्यमांच्या सर्व्हेत मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत उद्धव ठाकरे कायम आघाडीवर राहले. पण राज्य चालवणं हे टाळ्यांसाठी दोन - चार वाक्य फेकण्य एवढ सोपं नाही. हे जनतेला कसं कळणार. पण संजय राउत नेहमीच उद्धव ठाकरेंच्या कानाशी गुणगुणत राहिल्यामुळे उद्धव ठाकरेंनाही आपण मुख्यमंत्री झाल्याची स्वप्न पडू लागली. पण जेव्हा वास्तव समोर आलं तेव्हा पायाखालची वाळु सरकली होती. त्यांचा भ्रम निरास झाला होता. अशा वेळी मुख्यमंत्रीपद नाहीतर नाही उपमुख्यमंत्रीपद आणि आणखी दहाबारा चांगली मंत्रीपदं पदरात पडून घेण्याची स्वप्न ते उद्धव ठाकरेंना दाखवत राहिले. 


संजय राउत असं का  वागत असावेत याचा विचार करायला हवा. त्यांना पक्षात उद्धव ठाकरेंच्या खालोखाल आपला दबदबा निर्माण करायचा होता. खरंतर उद्धव ठाकरेंपेक्षा संजय राउतांच्या बोलण्याची शैली बाळासाहेबांशी अधिक मिळती जुळती होती. आपण उद्धव ठाकरेंपेक्षा अधिक प्रभावी आणि नेमकं बोलतो हे त्यांना माहित होतं. खरंतर त्यांनी उद्धव ठाकरेंनाच मागे खेचण्याचा प्रयत्न केला असता. पण सेनापती आणि शिपाई हा फरक आडवा येत होता. मागे राणे, भुजबळ यांच्या सारख्या आघाडीच्या शिपायांनी तसा प्रयत्न केल्याचे त्यांना स्मरत होते. आणि त्यात त्या शिपायांची सैन्यातून हकालपट्टी झाल्याचेही माहित होते. त्यामुळेच असले विचार ते नेहमीच कानामागे टाकत आले. 

पण उद्धव ठाकरेंच्या समोर आपली कॉलर ताठ रहावी म्हणुन ते एखादाच तीर सोडायचे. तो तीर अचूक असायचा. प्रतिस्पर्ध्याच्या वर्मी लागायचा. हे करताना बाळासाहेबांच्यानंतर त्यांच्या मार्मिकतेची शैली आपल्यात असल्याची जाणीव ते इतरांना करून देत होते. संजय राउतांच्या मुखी खरोखरच बाळासाहेबांची शैली आहे. पण बाळासाहेब हे बाळासाहेब होते. त्यांचं बोलणं त्यांच्या पदाला, व्यक्तिमत्वाला आणि कर्तुत्वाला साजेसं होतं. पण संजय राउतांनी बोलताना थोडं तारतम्य राखायला हवं. कारण आघाडीचे असले तरी ते सैनिकच होते सेनापती नव्हते. 

आपलं घोडं कुठ आडतंय हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं. आपण सेनापती. पण हा साधा शिपाईच आपल्या पेक्षा अधिक त्वेषानं बाण सोडतोय. शत्रू पक्षाचं सैन्य आपल्यापेक्षा हाच अधिक घायाळ करतोय. युद्ध विराम झाल्याचं सुद्धा याला भान नाही. हा खांद्यावर मला घ्यायचा पण तीर स्वतः चालवायचा. आपण याच्या खांद्यावर असल्यामुळे विरोधकांच्या ( छे छे विरोधकांच्या नव्हे मित्र पक्षाच्या, जेष्ठ भावाच्या ) नजरेत आपण यायचो. त्यांना वाटायचं याच्या आडुन आपणच तीर चालवतोय.

उद्धव ठाकरेंच्या हे सारं लक्षात आलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. युतीचं तेज मावळलं होतं. भाजपाच्या जेष्ठ नेत्यांची मनं दुखावली गेली होती. चहुअंगावर जख्मा झाल्या होत्या. या जख्मा निव्वळ फुंकर घालून बऱ्या होण्यासारख्या नाहीत. त्यासाठी चांगल्या वैद्याची गरज आहे. मलमपट्टी करायला हवी. योग्य नाडी परिक्षण करायला हवं. नेमका लागू होईल असा, लवकर आराम पडेल असा दवापाणी करायला हवा. त्यासाठी इतरांना बाजूला सारून उद्धव ठाकरेंनीच पुढं यायला हवं. स्वतःच वैद्य व्हायला हवं.तरच युतीला,  शिवसेनेला भविष्य आहे. या भविष्यात भाजपाचं नाव घेतलं नाही. कारण स्वतःच भविष्य घडविण्याची ताकद भाजपात आहे. आणि तामिळनाडू, पश्चिम बंगाल प्रमाणे महाराष्ट्रातली एकहाती सत्ता शिवसेनेच्या हातात दयायला महाराष्ट्रातली जनता मूर्ख नाही. 






8 comments:

  1. मातोश्रीला जेंव्हा जाग येते ............ लय भारी निर्णय ..उशिरा सुचलेले शहाणपण , देर आये दुरुस्त आये. खासदार अरविंद सावंत, अरविंद भोसले, विजय शिवतारे, डॉ. अमोल कोल्हे हे छान वक्ते आहेत हे आपण पहिलेच आहेत.... डॉ. मनीषा कायंदे या काही परिचयाचा नाहीत... निदान संजय राउत यांचा पासून होणारे नुकसान तरी टळेल...संजय राउत, रामदास कदम आणि मिलिंद नार्वेकर या तिकडीने शिवसेनेचे अतोनात नुकसान केले आहे. या तिघांना दूर ठेवले असते तर विधानसभेला सेनेचे अजून १५/२० आमदार निवडून आले असते

    ReplyDelete
  2. Khar mhnje udhav thakreychyat pakshacha President honyachi layki nahi. Rahile rautanche the tar aadhich karayla pahije hota.

    ReplyDelete
  3. सुजित, अभिप्रायाबद्दल धन्यवाद. उद्धव ठाकरेंनी संजय राउतांच्या मुसक्या आवळल्या असल्या तरी त्यांनी त्यांनी इतरांसह स्वतःच्या तोंडालाही लगाम घालायला हवा. तरच काहीतरी मार्ग निघेल.

    ReplyDelete
  4. मित्रा, अभिप्रायाबद्दल धन्यवाद. सोनिया गांधी यांचीतरी ती लायकी आहे का ? पण घराणेशाही. त्याला कोण काय करणार. लोकांनीच हि घराणेशाही उलथून टाकली पाहिजे.

    ReplyDelete
  5. सायरा शेख27 November 2014 at 15:32

    आप बिलकुल सही है .

    ReplyDelete
  6. आभार सायरा. आप कई अरसेबाद मेरे ब्लॉगपर लौटी है. मतप्रदर्शन के लिए धन्यवाद.

    ReplyDelete
  7. शिवसेनेत समतोल विचारांची नेहमीच उपेक्षा केली जाते. तेव्हा आताच्या नेतृत्वाकडून काय अपेक्षा करावी ? हा एक अस्ताला जाणारा पक्ष उरला आहे.

    ReplyDelete
  8. मित्रा अभिप्रायाबद्दल आभार. अनेकदा विनंती करूनही काही रसिक वाचक नाव लिहित नाहीत. असो. आडमुठेपणा हा शिवसेनेचा अंगभूत गुण आहे. तो उद्धव ठाकरेंच्या मध्ये जसा आहे. तसाच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येसुद्धा आहे. आणि या विचारसरणीची माणसे जनतेचं काय कल्याण करणार ?

    ReplyDelete