collector , peoples in India
आमच्याकडे आम्ही इनमिन चौघे असलो तरी दाराबाहेर बरेच जोडे असतात. रात्री झोपण्यापूर्वी दार लावताना ते जोडे एक तर मुलं आत घेतात अथवा बायको. मी त्या जोडयांना हात लावायचा नाही असं आमच्याकडे एक अलिखित नियम आहे. हा नियम मुलांनीच केला आहे. कारण त्यांच्या बूट , चपला मी हातात घेणे त्यांना रुचत नाही.
पंकजा मुंडे यांच्या चपला एका पुरुष कर्मचार्याने हातात घेतल्यामुळे सोशल मिडीयावर बराच गदारोळ माजला होता. पंकजा मुंडे यांच्या ताफ्यात स्त्री कार्यकर्त्या नसतील का ? नक्कीच असतील. पण ती स्त्री त्यांच्या चपला हातात घेण्यासाठी पुढे सरसावली नसेल . कारण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीसमोर कमीपणा घेणे सहजासहजी मान्य करत नाही.
मागे मी ' बाईची चप्पल ' हा लेख लिहिला होता आणि रसिकांना तो मनापासून आवडला होता . त्यावर काही उलटसुलट प्रतिक्रियाही उमटल्या होत्या.
परवाही असेच घडले.
मी एका सरकारी कार्यालयासमोर उभा होतो. एक पिवळ्या दिव्याची गाडी तहसीलदार कचेरीसमोर उभी राहिली. कचेरीसमोर कसली अगदी कचेरीच्या पोर्चमध्ये. गाडीतून रिकाम्या हाताने एक तहसीलदारीनबाई उतरल्या. कार्यालयाच्या दिशेने टेचात निघाल्या. त्यांच्या मागोमाग त्यांची पर्स हातात धरून पडेल चेहऱ्याने पण अदबीने निघालेला सरकारी कर्मचारी. तो शिपाई होता कि कारकून कि त्यांचा खाजगी सल्लागार हे नाही सांगता यायचं मला. कोणी का असेना पण तो पुरुष होता हे मात्र नक्की. तो प्रसंग पाहून माझ्यातला पुरुषी अहंकार जागा झाला म्हणून मी हे लिहितोय असं नाही.
मला प्रश्न पडला घरी हा माणूस पाण्याचा तांब्या तरी भरून घेत असेल का ? वेळ आल्यावर आपल्या बायकोची पर्स घेत असेल का ? माझ्या अनुभवावरून सांगतो नक्कीच नसेल घेत. वेळ काळ पाहून त्यानं बायकोची पर्स तयारी दाखवली तरी बायको त्याला आपली पर्स घेऊ देत नसेल. काही दिवसांपूर्वी मी आणि माझी बायको काहीतरी खरेदीसाठी गेलो होतो. येताना दोघांच्या हातात हातभरून पिशव्या. त्यात तिला तिची पर्स सांभाळता येईना. मी तिला तिची पर्स घेण्याची तयारी दाखवली तर ती झटक्यान म्हणाली , " श्शी S S S S S ! शोभत तुम्हाला ते."
" अग , नेहमी कुठे घेतो मी. आज वेळ आली म्हणून. "
" माझी पर्स तुम्ही घेतलेली मला नाही आवडत. असू द्यात माझी पर्स मला फार जड नाही."
बायकोचंच कशाला आईचा सुध्दा किस्सा इथे सांगता येईल. पूर्वी मी आणि आई मोटर सायकलवर गावी जायचो. दोन एक बॅगा सोबत असायच्या. मी एखादी बॅग गळ्यात अथवा हँडलला अडकवतो म्हटलं तर आई अजिबात तयार व्हायची नाही.
" तुझी तू गाडी चालव नीट. मी घेते दोन्ही बॅगा. " म्हणत दोन्ही जुनाट झालेल्या शरीराच्या दोन्ही खांद्यावर दोन्ही बॅगा टाकून गाडीला गच्च धरून बसायची.
हे सगळं आठवलं आणि वाटलं मग हा कसा एखाद्या बाईची पर्स उचलतो ? हि पर्स त्याने घ्यायची आणि बाईंच्या टेबलावर नेऊन ठेवायची असं वळण कसं पडलं असेल ? पर्स त्याने स्वतःहून उचलली असेल कि बाईंनी त्याला उचलायला सांगितली असेल ? त्याने स्वतःहून उचलली असेल तर त्याला कमीपणा कसा वाटला नाही ? अथवा त्याने न सांगता उचलली असेल तर बाईंनी त्याला का आडवले नाही ?
काही असो पण बाईंनी स्वतः पर्स घेतली असती तर त्याला ती पर्स उचलण्याची वेळ आली नसती एवढे मात्र नक्की. पण बऱ्याच शासकीय अधिकाऱ्यांना आपल्या अधिकाराचा टेंभा मिरवण्यात धन्यता वाटत असते. या बाईंनी तरी मागे का रहावे ? आणि मलाही बाईंच्या हावभावात अधिकाराची मिजासच जास्त दिसत होती.
पोर्चमध्ये उतरल्यानंतर डाव्या बाजूला आठ दहा पावलांवर बाईचं कार्यालय. आजूबाजूला सुनावणीसाठी जमलेल्या आयाबायांची , बायाबाप्यांची गर्दी. सगळेच तडातडा उभे राहिले. बाईंसाठी वाट देऊन बाईंच्या कार्यालयाच्या दाराशी घोंगावू लागले. एखाद्याने पालापाचोळ्यावरून बेदरकारपणे चालत जावं........ तशा बाई गर्दीतून पुढे सरकल्या. कुणाचीही दखल न घेता. हसलं तर चेहऱ्यावरती घडी पडेल म्हणुन चेहरा कोराकरीत ठेऊन पुढे गेल्या. आपल्या आसनावर विराजमान झाल्या. सारी गर्दी हे पहात होती. पण एका बाईच्या नजरेत विखार होता. तहसीलदारीन बाई तिच्या अंगावरून पुढे गेल्या तशी ती बाई बाजूला पचकन थुंकली आणि शेजारणीच्या कानाला लागत म्हणाली, " बघ कशी चाललीय सटवी ? "
माझ्याप्रमाणे तिलाही बहुदा त्या कर्मचाऱ्याने घेतलेली तहसीलदारीनबाईंची पर्सच खटकली असावी.
कुणी कुणाची पर्स उचलावी अथवा उचलू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एकीकडे आपण स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारत असताना हे चित्रही भयावहच आहे ना.

No comments:
Post a Comment