Friday, 17 June 2016

Mrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २

Marathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem

 कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्टीकरण का देतो असा प्रश्न पडत असेल ? हे आम्हाला काय एवढे अज्ञानी समजतात कि काय ? असंही वाटत असेल. पण तुम्ही सारे अत्यंत सुज्ञ  आणि रसिक जाणकार आहात याची मला जाणीव आहे. तरीही
मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्टीकरण देतो ते माझ्या कवितेतल्या भावना तुमच्या पर्यंत जशाच्या तशा पोहचाव्यात म्हणून.

आणि खरं सांगू . अनेकांना कविता आवडत नाही हे मला माहित आहे. कवीला नेमकं काय म्हणायचं असत हे रसिकांना कळाल तर त्यांच्या मनात कवितेविषयी गोडी निर्माण होईल असं मला वाटलं म्हणून माझा हा सारा अट्टहास. आधीच्या पोस्टमध्ये मी म्हटल्याप्रमाणे. कविता लिहिणं फार अवघड असत. तसंच ती वाचनही अवघडच असत. रूढ अर्थानं वाचण नाही म्हणायचं मला तिचा ताल , तिचा ठेका पकडून कविता वाचण खरंच अवघड असत.

मुलं शाळेत होती तेव्हा मी त्यांचा नियमित अभ्यास घ्यायचो. कविता शिकविताना शाळेतल्या शिक्षकांनी ती कविता कशी समजावून दिली आहे ते आवर्जून विचारायचो तेव्हा लक्षात यायचं बऱ्याच भाषा शिक्षकांनाही कविता नीट स्पष्ट करून , समजावून सांगता येत नाही. काही वेळा तर चक्क चुकीचं स्पष्टीकरण दिलेलं असत. त्यांच्या शाळेतल्या काळे सरांचं नाव मात्र मुलं नेहमी घ्यायची. ' काळे सर मराठी खूप छान शिकवतात.' असं म्हणायची. मी त्यांना अनेकदा भेटलो होतो आणि त्यांचा साहित्याचा व्यासंग अनुभवला होता. ते कविता छान शिकवत असतील या विषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नव्हती.

आता आधीच्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे -

  ' मनोमनी मी कितीदा केली
    पंढरीची वारी. '

यात ' मनोमनीच ' का ? -

त्या ओळी -

' तुझ्याचसाठी कितीदा केली
  पंढरीची वारी. '

अशा का नाहीत ?  तर या कवितेचा नायक तरुण आहे.प्रेमात पडण्याचं त्याचं वय आहे. तो प्रत्यक्ष वारीला जाणार नाही. वारीत जाऊन वारकरी होण्याचं त्याचं वय सुद्धा नाही. पण तिच्यासाठी त्यानं मनातल्या मनात पंढरीच्या पांडुरंगाला साकडं घातलं आहे. म्हणून ' मनोमनी '. आता किती शिक्षक हे असं स्पष्टीकरण देतील ?     

रसिकांनी  एवढा सूक्ष्म विचार करावा अशी लेखकाची अपेक्षा कधीच नसते. रसिकांना कविता आवडली आणि त्यानं ' वाह वा ' केली तरी लेखकाला पुरेसं असत.

हि कविता लिहिताना तिचा शेवट -

तुझ्यासोबती गिरवीन मी गे
संसाराचे धडे
हातामध्ये हात जराशी
हळूच दे ना गडे

असा करायचा होता. आता असा शेवट का मनात आला तेही सांगतो. कविता लिहिताना बायको समोर बसली होती. कवितेची सुरवात तिला ऐकवली होती. तिच्या नजरेत संशय नसला तरी मिस्किलपणा होता. ' या वयात ! अजुनही ! ' असंच तिची नजर म्हणत असावी. मी तिला म्हणालोही, " प्रेमाला वय वैगेरे काही नसतं गं . आणि मंगेश पाडगावकरांनी त्यांची ' प्रेम म्हणजे , प्रेम म्हणजे .........प्रेम असत.'  हि कविता काही वयाच्या विशीत लिहिलेली नाही. " तिच्या अस्तित्वाची छाया असेल कदाचित. पण कवितेचा शेवट तसा करायचा ठरवलं होतं .

पण टिव्हीवरच्या जाहिराती संपल्या. तिनं परत तिच्या सिरीयलमध्ये मन गुंतवलं आणि वेगळ्याच शेवटासह कविता पूर्ण झाली ती अशी -


 तुझ्याचसाठी......

हातामध्ये हात जराशी
हळूच दे ना गडे
तुझ्याचसाठी घालीत आलो
चांदण्यांचे सडे

तुझ्याचसाठी झालो मी गे
रिमझिमणाऱ्या धारा
तुझ्याचसाठी हळूच झालो
भिरभिरणारा वारा
तुझ्याविना गे जातील माझ्या
आयुष्याला तडे
हातामध्ये हात जराशी
हळूच दे ना गडे   

तुझ्याचसाठी कितीदा गेलो
मी गे सागरतीरी
तुझ्याचसाठी रात्र पेलली
मी पापण्यांवरी
तुझ्या विना गे क्षणाक्षणाला
श्वास माझा अडे
हातामध्ये हात जराशी
हळूच दे ना गडे

तुझ्याचसाठी कितीदा गेलो
देवाच्या मी द्वारी
मनोमनी मी कितीदा केली
पंढरीची वारी
तुझ्याचसाठी देवाला मी
बोल सुनविले खडे
हातामध्ये हात जराशी
हळूच दे ना गडे

किती जनाची तमा करावी
भय कुणाचे किती धरावे
मनापासुनी मला वाटते
विरहाचे हे मेघ विरावे
पुरे पुरे ना नकोस घेऊ
अजून आढेवेढे
हातामध्ये हात जराशी
हळूच दे ना गडे.



         

6 comments:

  1. सुंदर कविता...म्हणजे हा नायक अगदीच काही गरीब बिचारा आणी तिच्या प्रेमात लाचार नाही वाटते. तर तिच्या साठी जे जे केलं ते निर्भीडपणे तिला सांगतो आहे.
    तुझ्याचसाठी रात्र पेलली मी पापण्यांवरी ... या ओळी विशेष आवडल्या.
    पण ’तुझ्याचसाठी’ या शब्दाचा अतिरेक झाल्या सारखे वाटते..मनोमन सारखे मधे मधे दुसरेही शब्द योजता आले असते. :-)

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून आभार. आज बऱ्याच दिवसांनी आपला अभिपेअत मिळाला. खरंतर मी आपल्या अभिप्रायाची आणि आपल्या लिखाणाची मनापासून वाट पहात असतो. आपला अभिप्राय हीच आपल्या अस्तित्वाची खुण.

      आपल्याला जरी ' तुझ्यासाठी ' या शब्दाचा अतिरेकी वापर झाला आहे वाटत असेल तरी ते सगळं इतकं उस्फुर्त होतं कि उलट ' मनोमनी मी कितीदा केली ......' या ओळीत ' तुझ्याचसाठी ' शब्द आला नाही म्हणून मला चुकल्यासारखे वाटत होते.

      Delete
  2. प्रकाश माने20 June 2016 at 20:35

    इतकी सुरेख प्रेम कविता अभावानेच वाचायला मिळते. खूप सुंदर.

    ReplyDelete
    Replies
    1. आपण हे माझ्यावरील प्रेमापोटी लिहिताय असं वाटतंय. पण याहीपेक्षा सुंदर प्रेम कविता लिहिणारे अनेकजण आहेत प्रकाशजी. असो आपल्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.

      Delete
  3. सायली लिमये21 June 2016 at 14:06

    खूपच सुरेख.

    ReplyDelete