Love Poem, Sad Poem ( एका प्रियकराचे विरह गीत )
ती दिसते. ती त्याला हवी हवीशी परीच वाटू लागते. तो हरखून जातो. आयुष्य म्हणजे सुखाचा पेला वाटू लागतं त्याला. ते सुख पिताना त्याची ओंजळही अपुरी पडते त्याला. जेवढं सुख ओठाशी लागतं, त्याची प्रेमाची तहान भागवतं त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक सुख त्याच्या ओंजळीतून ओसंडून वहातं. पण
त्याला फिकीर नसते त्या ओसंडून वाहणाऱ्या सुखाची. तो त्याच्याच सुखात मश्गुल..........त्याच्याच आनंदात हरवून गेलेला.
दोन तीन दिवस ती दिसतंच नाही त्याला. कुठे गेलेली असते कुणास ठाऊक ? तो अगदी वेडेपिसा होतो. कधी नव्हे ते बेधडक तिच्या घरी जातो. कळतं ते एवढंच कि, " ती गावी गेलीय. येईल एक दोन दिवसात."
पण त्याचं समाधान तेवढ्यानं होणार थोडंच ?
कुठं गेली असेल ? का गेली असेल ? अशी कशी गेली अचानक आपल्याला न सांगता ? आपण इथं कॉलेजात वाट पाहू.............. भिरभिर नजरेने तिला शोधात राहू ............... ती दिसली नाही तर आपला जीव भित्र पाखरू होईल .......................कोमेजून जाईल ..............हे लक्षात कसं आलं नाही तिच्या ? कि तिच्या नजरेत आपण कोणीच नाही तिचे ? त्याच्या मेंदूत प्रश्नांचं नुसतं मोहळ उठलेलं.
तो रोज वाट पहायचा तिची. दिवसामागून दिवस गेले आणि काही दिवसांनी ती दिसली त्याला. वर्गात तिच्या नेहमीच्या जागेवर बसलेली. कुठल्याशा अनामिक सुखात हरवून गेलेली. अंगावर नवा कोरा ड्रेस............मोकळे सोडलेले केस........... केसात दरवळणारा मोगरा................. हातात हिरव्या बांगड्या.........कपाळावर हळदी कुंकवाचा अभिषेक.
" किती छान दिसतेय आज !" त्याला मनातल्या मनात पुन्हा पालवी फुटलेली.
कधी एकदा तास संपतो आणि आपल्या मनात उठलेलं प्रश्नांचं मोहळ तिच्यावर भिरकावून देतो असं झालेलं त्याला.
तास संपतो आणि ती मैत्रिणींच्या घोळक्यात हरवून जाते. तो वाट पहात रहातो ती एकटी भेटण्याची. आणि कुणीतरी कानात गरम शिसं ओतावं तसे कुठूनतरी त्याच्या कानावर शब्द पडतात - " अरे, काल लग्न झालंय तिचं. "
तो सैरभैर. उन्मळून पडलेला. मनाच्या खोल तळातून रडलेला. पण त्याचा आक्रोश ऐकू मात्र कुणालाच जात नव्हता.
दुखः ओसरलेलं नसतं. ते ओसरतही नसतं कधी............फार फार तर त्या दुखाचा कढ कमी होतो. पण आतून ते जाळतच रहातं त्याला.
सगळ्या मैत्रीणीना पार्टी दिल्यानंतर ती दिसते त्याला.........एकटी. आणि मग तो पुन्हा बरसतो........ दोन्ही डोळ्यातून भरून येतो...........धार होऊन कोसळत रहातो.
ती छातीशी धरते त्याला, " अरे वेडा बाबा, रडतोस काय असा ?"
तो पाणावलेल्या डोळ्यांनी पहात रहातो तिला. ती त्याच्या केसातून हात फिरवते आणि म्हणते," अरे असं काय करतोस. डोळे पूस आधी. आणि सांग मला असं एवढ रडायला झालंय काय तुला ?"
तो कसे बसे डोळे पुसतो. मनातले सारे कढ गिळून टाकतो आणि तिला विचारतो, " तू लग्न केलयस ? "
" म्हणजे काय ? माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र नाही पाहिलंस का तू ?"
" नाही गं ! आजपर्यंत मी तुझ्या गळ्याकड कधीच नाही पाहिलं. मी पहात राहिलो ते फक्त तुझे डोळे.........हरवून गेलो ते फक्त तुझ्या डोळ्यात."
" चल वेडाच आहेस." असं म्हणत ती त्याला कुशीत घेते. तोही लहान होऊन हरवून जातो तिच्या मायेच्या पंखात. ती त्याची समजूत काढत राहते आणि त्याचं दुखः आता बरचसं निवळलं आहे हे पाहून त्याला दूर करून तिच्या स्वप्नांच्या दुनियेकडे निघून जाते.
तो मात्र पहात रहातो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आणि त्याच्या मनात आकार घेतात -
मोडून घरटे चिमणी गेली ............
या ओळी
मोडून घरटे चिमणी गेली , चिमण्याच्या तव गालावरती
गालावरती असवे आली , मोडून घरटे चिमणी गेली
फकीर झालाचिमणा आणि ,
नवा मांडते डाव चिमणी
झुरतो येथे मनात चिमणा ,
आणिक चिमणी हसते गाली
चिमण्याच्या तव गालावरती , गालावरती असवे आली ,
मोडून घरटे चिमणी गेली, ...........
पुन्हा जमविल्या त्याने काड्या ,
चढला इमला चढल्या माड्या
इमल्याच्या त्या वरून पुन्हा
चिमणी घेऊन वरात गेली
चिमण्याच्या तव गालावरती , गालावरती असवे आली ,
मोडून घरटे चिमणी गेली, ...........
त्याने सोडले दाणापाणी,
हताश झाली तेव्हा चिमणी
भेटू पुढल्या जन्मी तेव्हा
चिमणी अखेर बोलून गेली ,
चिमण्याच्या तव गालावरती , आनंदाने असवे आली ,
मोडून घरटे चिमणी गेली, ...........
No comments:
Post a Comment