कोणत्याही कलाकाराला त्याच्या हातुन चांगली कलाकृती जन्माला येतो तेव्हा सर्वाधिक आनंद होतो. भले मग तो कलाकार चित्रकार असो, शिल्पकार असो, अथवा लेखक असो अथवा आणखी कुणी. पण आपली निर्मिती चांगली कि सुमार हे ठरविण्याचा अधिकार त्या कलाकाराला नसतोच. तो अधिकार असतो रसिकांचा. त्यासाठीच मी नव्यानं लिहिलेली ' मातीचीच वात ' हि कविता रसिक वाचकांसमोर सादर करतोय.
आजकाल प्रत्येकाला आपल्याला नौकरी असावी असे वाटते. दहावी पास झालेल्या तरुणाची अपेक्षासुद्धा हीच. कशी का असेना पण नौकरी असावी. पगार किती का असेना पण नौकरी असावी.
मी मात्र तीन वर्षापुर्वी खुर्चीतली नौकरी आणि भरभक्कम पगार सोडुन गावी गेलो. तेही अजून १४ - १५ वर्षाची कारकीर्द बाकी असताना. नुसता गावी गेलो असे नव्हे तर कुटुंबापासून काही आठवडेच नव्हे तर काही वेळा महिनोंमहिने दूर राहिलो. ज्या हाताला कधी चिखल लागला नव्हता ते हात मातीत रमले. दुष्काळाच्या झळा सोसल्या.
पण आता सहा - सात लाखाचा ऊस शेतात उभा आहे. गेली तीन आठवडे गावीच होतो. त्यामुळेच लिखाण झाले नाही. निम्मा ऊस तुटून गेलाय……… निम्मा राहिलाय. दोनचार दिवसात त्यालाही तोड येईल. पुन्हा गावी जायचं आहे.
पण परवा गावाहुन परतलो. जेवण करून गच्चीत गेलो होतो. झगमगाटात बुडालेलं शहर न्याहळत होतो. आणि चांदण्यात शेतात पाणी देणारा माझा अवतार मला आठवत होता.
अलिकडे प्रत्येकाला कमीत कमी कष्टात अधिकाधिक सुख हवं असतं. पण माझी मात्र पडेल ते कष्ट स्विकारायची तयारी असते. मला कष्टाचं दुखः मुळीच नाही. पण कष्टानंतर यश पदरात पडावं हि अपेक्षा असते. तीन वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर आता अपेक्षित यश सामोरं आलंय असं वाटतंय. अजून खुप काही करायचं. आज आठ एकर क्षेत्र बागायती असलं तरी आणखी सहा एकर जिरायीत क्षेत्रात पाणी पोहचविण्यासाठी पाईप लाईन करायची आहे. पपईची लागवड करायची इच्छा आहे. केळी करायचं मनात आहे. डाळींबाची लागवड करायचा बेत आहे. पण मनुष्यबळ हाताशी नाही. माझा बहुतांश भाग बागायती असल्यामुळे मजूर मिळत नाही. एकटा काय काय करणार ? पण थकणार नाही. या मातीशी अखंड झुंजी घेण्याचं बळ परमेश्वरानं द्यावं हीच इच्छा.
गच्चीवरल्या निवांतपणात अनेक विचार मनात घोळत होते. माझेच कष्ट मला आठवले आणि -
ऊन झाले आल्या धारा,
तरी राबतो शेतात;
माझा संसाराचा दिवा,
त्याला मातीचीच वात.
या ओळींनी मनात आकार घेतला. पुढच्या अर्ध्या तासात संपुर्ण कवितेने कागदावर झेप घेतली ती हि कविता. या कवितेतल्या मातीची वात, भुकेल्या कुबेराची नड भागवणारी माती, मातीच्या कुशीत देवाचा नैवेद्य असणे. या कल्पना मी कुठून चोरलेल्या नाहीत. त्या नवीन आणि युनिक आहेत असे मला वाटते. वाचकांनी आपले मत कळवावे ही नम्र विनंती. -
मातीचीच वात
मी हो राबतो शेतात,
माझा पिकवितो मळा;
माती अंगारा धुपारा,
माती भस्म माझ्या गळा.
ऊन झाले आल्या धारा,
तरी राबतो शेतात;
माझा संसाराचा दिवा,
त्याला मातीचीच वात.
ऊन झाले आल्या धारा,
माझ्या मातीच्या वातीचा,
साऱ्या जगात उजेड;
भुकेलेल्या कुबेराची,
माती भागविते नड.
माझ्या मातीच्या वातीचा,
माझ्या घामाचा हो थेंब,
इथे जिरतो मातीत;
खुद्द देवाचा निवद,
माझ्या मातीच्या कुशीत.
माझ्या घामाचा हो थेंब,
माझा मातीशीहो झिम्मा,
माझा दैवाशी झगडा;
नको दुष्काळाच्या झळा,
दार मेघाचे उघडा.
माझा मातीशीहो झिम्मा,
माझ्या मातीच्या वातीचा,
ReplyDeleteसाऱ्या जगात उजेड;भुकेलेल्या कुबेराची,माती भागविते नड.
ya oli jivhari lagalya...!! kupach chhan sir...!!
आभार समिधाजी. शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल मिडिया खूप बोलते पण हा वास्तववाद त्यात नसतो हि वस्तुस्थिती आहे.
Deleteमी शेतकरी नसलो तरी त्याच्या काबाडकष्टांची आणि त्याच्यावर कोसळणा-या संकटांची मला कल्पना आहे. त्या दृष्टीकोनातून मी तुमचा हा लेख आणि कविता वाचली. कुणाच्याही मनाला भिडणारी अशी भावना तुम्ही त्यात समर्थपणे व्यक्त केली आहे.
ReplyDeleteमंगेश नाबर
मंगेशजी. अभिप्रायाबद्दल आभार. आज पहिल्यांदाच तुमचं नाव मला कळतंय. अन्यथा आजवर Mannab हो कसलं नाव असा प्रश्न पडायचा.
Deleteप्रत्यक्ष शेतकरी नसुनही शेतकऱ्यांच्या काबाडकष्टाची आणि त्याच्यावर कोसळणाऱ्या आपणास कल्पना आहे हे पाहुन खूप बरे वाटले. पण शासनाने शेतकऱ्यांना आडतीतून सवलत देताच बंदच शस्त्र उपसणाऱ्या व्यापाऱ्यांना आणि इतरांना त्याची किती जाणीव आहे कुणास ठाऊक ?
वा वा..अस्सल ग्रामीण जीवनाशी नातं सांगणारी कविता....ना धों महानोर किंवा बहिणाबाईंच्या जातकुळीतली.....
ReplyDelete’प्रस्थापितांच्या’ भाऊगर्दीत कदाचित ही हरवून जाईलही....पण तिनेही कधी एक वात पेटवून उजेडाला निमंत्रण दिले होते.....हेही तितकेच खरे! :-)
धन्यवाद. आपण ज्या थोरांच्या पंगतीला मला बसवू पहात आहात एवढा थोर मी नाही. पण कवितेवर आणि शब्दांवर मनापासून प्रेम करतो. अशाच संपर्कात रहा.
Deleteजुन्याच कवींची पुस्तके प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांना तुमच्यासारखे अप्रतिम कवी सापडत नाहीत का ?
ReplyDeleteसोनाली अभिप्रायाबद्दल धन्यवाद. प्रकाशक माझ्यापर्यंत पोहचतील न पोहचतील. पण तुमच्यासारख्या रसिकांचे कौतुक हेही पुढच्या वाटचालीस पुरेसे पाठबळ देते.
Deleteविजयजी कविता खुपच छान आहे
ReplyDeleteमाझ्यापण भुतकाळात घेवून गेली मस्त परत रानातच आहे अस
वाटले
आभार रमेशजी, तुम्ही असा अथवा आपले अन्य ग्रामीण सवंगडी. आपल्याला मातीचा विसर पडू नये हिच अपेक्षा.
Delete