Monday 12 October 2015

जॉईनिंग लेटर


झालं काय ! आमच्या मोठ्या चिरंजीवांचं कॅम्पसमध्येच सिलेक्शन झालं होतं. त्यामुळे परीक्षा झाली आणि तिसऱ्याच दिवशी ते जॉईन झाले.

महिनाभर ठीक गेला. पण
नंतर आपण जॉईन झालोय यापेक्षा आपल्या ग्रुपमधल्या अमक्या आमक्याला अजुन जॉईनिंग लेटर आलं नाही. आणि अमक्या तमक्याचं  कॅम्पसमध्ये सिलेक्शनच झालं नाही. या असल्या चिंता त्याला भेडसावू लागल्या. आणि मग स्वतः पहिल्याच पायरीवर उभं असताना इतरांना धीर देण्याचं काम तो करू लागला. रात्री सात साडेसातला दमून भागून घरी आल्यानंतर मित्रांना भेटू लागला. फ्रेशर्ससाठी जॉब प्रोव्हाइड करणारे पोर्टल शोधू लागला.

मला फार बरं वाटत होत. तो काही असला नसला तरी एक चांगला मित्र नक्कीच होता.

असे चांगले मित्र भेटायलाही नशीब लागतं. आमचं दुर्दैव असं कि आम्हाला आमच्या आयुष्यात असे मित्र कधी भेटलेच नाहीत. भेटले नाहीत कि आमच्याजवळ टिकले नाहीत ? भेटले नाहीत हेच अधिक खरं. कारण आम्ही तर आमच्या मित्रांमध्ये कायमच आकंठ बुडालेलो होतो. पण आमचे मित्र मात्र काठावर उभं राहून आमच्या नाका तोंडात कसं पाणी जातंय याची गंमत पहात होते. या संदर्भात आमचे मित्र ( काठावरचे नव्हे ) राजेश मंडलिक यांची मदत  ही पोस्ट नक्कीच वाचायला. मी राजेश मांडलिक यांना काठावरचा मानत नाही कारण ते स्वतःच डोक्यावर पृथ्वी घेऊन उभ्या असलेल्या शेष नागाच्या भूमिकेत आहेत. पायापुरत न पहाता जगाचा विचार करताहेत.  विषयाला फार मोठा फाटा झाला हा. पण गरजेचं होतं. 

तर आमचे चिरंजीव एक चांगले मित्र असल्यामुळे सुशीलच सिलेक्शन झालंय हे कळताच त्याचा चेहरा आनंदानं फुलून येतो. तीन महिन्यांनी का असेना पण पुजाच जॉईनिंग लेटर आलंय हे सांगताना त्यालाच भरती येते. साध्या सुध्या आणि सतत वडीलांच्या उबेखाली वावरणाऱ्या केतनच जॉईनिंग लेटर आल्याचं कळताच यालाच स्पुरण चढत. आणि तो त्याच्यासाठी काय काय खरेदी करायचं याचं नियोजनही करून टाकतो.

तर यातल्या केतनचा विषय महत्वाचा. केतनला आठ तारखेला जॉईन व्हायला सांगितलं होतं. जॉईनिंग केतनच आणि काऊंट डाऊन करत होतं आमचं घर. केतनला हे आणलं का ? ते आणलं का ? कुठून आणलं ? कोणत्या ब्रँडच आणलं ? कितीला बसलं ? असले प्रश्न विचारून आम्ही आदेशाला भांडावून सोडायचो.

" बाबा या वर्षी दिवाळी आपण आपल्या पैशात साजरी करणार म्हणुन तो भलताच खुष आहे. " आदेश सांगत होता.     


आठ तारखेला आम्ही आदेशला विचारलं , " झाला का रे केतन जॉईन ? "

" आज नाही तो कालच जॉईन झाला. "

" अरे काल कसा काय ? त्याची जॉईनिंग डेट तर आजची होती ना ? "

" हो बाबा , पण त्याचे वडील म्हणाले आठ तारीख चांगली नाही. त्या दिवशी तु आपल्या घराचा उंबरा ओलांडून   नव्या पर्वाला सुरवात करन फलदायी नाही. तेव्हा तु आदल्या दिवशीच घरातुन निघ रात्री कुठेही मुक्काम कर. आणि उद्या तिकडच्या तिकडेच जॉईन कर. असं म्हणत त्याच्या वडिलांनी त्याला कालच घराबाहेर काढलंय. "
 मनात आलं, " नशीब चांगला दिवस एकच दिवस आधी होता. महिनाभर आधी असता तर ? "

खरंतर याच लेखात मला श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयावर लिहायचं. पण लेख फार लांबला असता. अथवा केतनवर अन्याय झाला असता. अथवा कशालाच योग्य न्याय मिळाला नसता म्हणुन. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावर पुढच्या भागात.    


  

2 comments:

  1. सुहास कुलकर्णी11 December 2015 at 21:15

    तुमच्या मुलाचा स्वभाव हे तुमचे संस्कार.

    ReplyDelete
    Replies
    1. तसे म्हणायला हरकत नाही. पण प्रत्येक आई बाबा आपल्या मुलावर चांगलेच संस्कार करत असतात हे लक्षात घ्यायलाच हवे.

      Delete