माझ्या घराभोवती खूप चिमण्या आहेत. त्यावर एकदा लिहायचे आहे. पण परवाचा किस्सा सांगतो. ……….
चार दिवसापूर्वी गावी गेलो होतो. कांद्याचं रोप टाकायचं होतं. गावी मी एकटाच असतो. झोपेतून उठलो कि अंथरून पांघरून आवरणे. पाणी तापायला ठेवणे. पाणी तापेपर्यंत दात घासणे, दाढी करणे होते. असे माझे नियोजन असते. दाढी करताना आरसा मी दरवाजावर ठेवलेला असतो. आंघोळ झाल्या नंतर पुन्हा केस विंचरायचे असतात. म्हणुन मी दरवाजावरचा आरसा तसाच ठेवलेला असतो. सगळे उरकून मी सात पर्यंत शेतात पोहचतो.
मी अंघोळ उरकली. घरात आलो. केसबिस केले. चहा घेत खाटेवर बसलो होतो. मोबाईल जवळच होता. बाहेर चिमण्यांची चिवचिव चालली होतो. आणि एक चिमणी चक्क आरश्या समोर येऊन बसली. कितीतरी वेळ. मी मांजराच्या पिलाला आरशातल्या स्वतःच्या प्रतिमेशी खेळताना अनेकदा पाहिले आहे. आरशातली प्रतिमा म्हणजे आपला प्रतिस्पर्धी असे समजून ते पिलू त्या आरशातल्या प्रतिमेला पंजा मारत असताना अनेकांनी पाहिले असेल. कावळ्याला सुद्धा मी आपल्या आरशातल्या प्रतिमेला स्वतःचा वैरी समजून टोचा मारताना पाहिले आहे. पण अशा रितीने आरशासमोर बसलेली चिमणी मी पहिल्यांदाच पहात होतो. आणि विशेष म्हणजे ती त्या प्रतिमेला आपली वैरी समजत नव्हती. आरशावर टोचा मारत नव्हती तर वेगवेगळ्या कोनातून ती
स्वतःला आरशात निरखत होती.
माझ्या मनात आले. ' बाईच्या जातीला एवढा आरशाचा सोस का असतो ? "
फोटो आणि लेखन दोन्ही उत्तम . फोटो तर एखाद्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफरने काढावा एवढा सुरेख काढलाय .
ReplyDeleteMastch
ReplyDeleteमस्त! मलाही आरसा अत्यंत प्रिय आहे.
ReplyDeleteआभार आंबट - गोड.
Delete