Wednesday, 8 July 2020

'साहेबांना काँग्रेस संपवायची आहे'

cartoon by vijay shendge

सरकार पडेपर्यंत, 'सरकार पडणार' अशी बातमी येणार. त्यानंतर बैठका होणार. आणि त्यानंतर 'सरकारला कोणताही धोका नाही. आमच्यात योग्य समन्वय आहे.' अशा प्रकारची प्रमुख नेत्यांची विधाने येणार. हे असंच
सुरूच राहणार. परंतु हे सरकार वर्षभराचा कालावधी पूर्ण करणार नाही, याविषयी जनतेला खात्री आहे. मग जेव्हा सरकार पडेल तेव्हा काय होईल? माझ्या अंदाजाप्रमाणे राष्ट्रपती राजवट लागू होईल. नंतर योग्यवेळी मध्यावधी निवडणूक होतील. काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढतील. आणि आपण कुठे जायचं? असा शिवसेनेसमोर प्रश्न उभा राहील.

कालच्या पोस्टवर 'भाजप राष्टवादी एकत्र आले तर आम्ही कधीही भाजपला मत देणार नाही.' अथवा 'आम्ही कधीही राष्ट्रवादीला मतदान करणार नाही' असा एक मतप्रवाह समोर आला. पण तुमच्या मनात काय आहे? याचा विचार न करता राष्ट्रवादी भाजपसोबत जाऊ शकते. उरलेला चार सव्वाचार वर्षाचा कालावधी पूर्ण करू शकते. कारण एकच, शरद पवारांच्या मनात काँग्रेसविषयी प्रचंड राग आहे. आणि त्यांना काँग्रेस संपवायची आहे. 

१९७८ साली वसंतदादांचं सरकार पाडून पवारांनी सरकार बनवलं. स्वतः मुख्यमंत्री झाले. परंतु इंदिरा गांधी यांनी कोणत्याही कारणाशिवाय पवारांचं सरकार नेस्तनाबूत केलं. राष्ट्रपती राजवट आणली. आणि राज्यात मध्यावधी निवडणूक लागू केल्या. इंदिरा काँग्रेसने बहुमत मिळवलं. शरद पवारांच्या पक्षाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. आणि सहा वर्षे विरोधात बसावं लागलं. 

८४ ला इंदिरा गांधी स्वर्गवासी झाल्या. आणि शरद पवारांनी त्यांचा पक्ष काँग्रेसच्या तलावात विसर्जित केला. काँग्रेसवासी झाले. ९१ ला राजीव गांधी यांची हत्या झाली. निवडणूक झाली. काँग्रेसला २४४ जागा मिळाल्या. महाराष्ट्रात ३८ जागा मिळाल्या होत्या. पवारांना वाटलं आपण पंतप्रधान होणार. परंतु सोनियांनी सूत्रे हलवली. नरसिंह राव पंतप्रधान झाले. आणि शरद पवारांना संरक्षणमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं. पण हातात चाव्या ठेवण्याची सवय असलेल्या शरद पवारांचं मन केंद्रात रमेना. १९९३ ला मुंबईत बॉम्ब हल्ले झाले. सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात आलं. आणि ती संधी साधून शरद पवारांनी संरक्षण मंत्रिपदावरून पळ काढला. महाराष्ट्रात आले. मुख्यमंत्री झाले. 

९१ ला राजीव गांधी यांच्या मृत्यूच्या सहानुभूतीची लाट होती. तरीही काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळू शकलं नाही. १९९६ ला भाजपने काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकल्या. १९९८ ला पुन्हा निवडणूक झाल्या आणि भाजपने पुन्हा एकदा काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळवल्या. विरोधकांनी अवघ्या ११ महिन्यात अटलजींचे सरकार पाडलं आणि १९९९ ला पुन्हा लोकसभेच्या निवडणूक झाल्या. आणि काँग्रेसची १४१ वरून ११४ वर घसरण झाली. तरीही महाराष्ट्रात काँग्रेसला ३३ जागा मिळाल्या. त्याचवेळी काँग्रेसला निवडणुकीत गतवैभव प्राप्त करायचं असेल तर यापुढे सोनिया गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करावे असे वारे काँग्रेसमध्ये वाहू लागले. 

सोनिया गांधी जर रिंगणात उतरल्या तर आपण कधीही पंतप्रधान होऊ शकणार नाही याची जाणीव असलेल्या शरद पवार यांनी काही प्याद्यांना हाताशी धरून त्या विचार प्रवाहाला विरोध केला. काँग्रेस कार्यकारिणीने पवारांना काँग्रेसमधून हाकलून दिले. १९७८ ला इंदिरा गांधी यांनी, आणि १९९९ सोनिया गांधी यांनी शरद पवारांना तुम्ही पायपुसणे आहात हे दाखवून दिले होते. त्याचा पवारांच्या मनात प्रचंड राग आहे. शरद पवार हे डूख धरणारे नेते आहेत. सहाजिकच काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. काँग्रेस संपवायची असा विडा उचलला. आता जर भाजप बरोबर जाऊन सत्ता स्थापन केली. कुठलाही दगाफटका न करता उरलेला कार्यकाळ पूर्ण केला तर महाराष्ट्रापुरते काँग्रेस संपवण्याचे शरद पवारांचे स्वप्न पूर्ण होईल. आणि केवळ त्यासाठी ते भाजपच्या वळचणीला जातील असे वाटते. 

No comments:

Post a Comment