खोटी स्तुती करण्यात अनेकांना धन्यता वाटते. बऱ्याच जणांना तर उणिवा दाखविलेल्या मुळीच आवडत नाही. टाळीच हवी असते अनेकांना. त्यातही एकमेकांच्या पोस्ट, कविता उचलून धरणाऱ्या टोळ्या असतात. मी मात्र या कशात मोडत नाही. उगाच खोटी स्तुती करणे मला नाही जमत. परखड बोलणे हा माझा स्वभाव. पण नाही रुचत ते अनेकांना. मग वेळप्रसंग पाहून मी सुध्दा कागदाची फुले उधळतो. गंध नसतोच त्या फुलांना. पण
त्या शब्दांचे रंग पाहून अनेकांना भूल पडते. त्यांच्या मनाला आनंद वाटतो.
परंतु खरेच चांगले पुस्तक, चांगली कविता माझ्या वाचण्यात येते तेव्हा मला शब्दांची उधळण करताना हात आखडता घेण्याची गरज वाटत नाही.
संदीप तापकीर यांनी त्यांचे अपरिचित दुर्गांची सफर हे पुस्तक दिले. मी ते अगदी बारकाव्याने वाचले. त्यावर परिक्षणात्मक लेख लिहिला. आजच्या आजच्या दैनिक प्रभातमध्ये तो प्रकाशित झाला. छत्रपतींच्या नावाचा जयघोष करणारे आणि ट्रेक म्हणून गडांवर जाणारे यांच्यापैकी दहा वीस टक्के मंडळी सुध्दा हे पुस्तक विकत घेणार नाहीत. परंतु सर्व शिवप्रेमींनी आणि दुर्गप्रेमींनी संग्रही ठेवावे असे हे पुस्तक.
याच संदर्भात काही ओळी मनात आल्या. अर्थात या ओळी त्या कवितेचा पाया आहेत. पूर्ण कविता कधी आकार घेईल माहित नाही.....पण आकाराला आलेल्या दोन ओळी अशा....
कागदाची मी फुले उधळली नाही कधीही
वाटले जेव्हा मनाला गंध मी उधळीत आलो.
No comments:
Post a Comment