Friday 7 March 2014

Story for kid's : दयाराम आणि सोन्याचं नाणं

एक गाव होतं. त्याचं नाव होतं रामपुरा. गावात प्रभू श्रीरामांच मंदिर होतं. एके दिवशी सकाळी सकाळी पुजाऱ्याला मंदिरासमोर एक सोन्याचं नाणं दिसलं. पुजारी कुतुहलानं त्या सोन्याच्या नाण्याजवळ गेला. तेव्हा पुजाऱ्याच्या लक्षात आलं कि त्या नाण्यावर काही संदेश लिहिलेला आहे.
त्या नाण्यावर लिहिलं होतं,' गावातील सर्वात दयाळू आणि पुण्यवान माणसासाठी प्रभू श्रीरामांनी पाठवलेली हि भेट आहे. इतर कुणी त्याला हात लावल्यास त्याचं रुपांतर लोखंडात होईल. "

झालं एका क्षणात ही बातमी आख्ख्या गावात पसरली. हातातलं काम सोडून गाव मंदिरासमोर लोटलं. मंदिरात येताना मंदिरा बाहेरील दिन दुबळ्यांकडे , गरिबांकडे कोणाचंच लक्ष गेलं नाही. तरीही प्रत्येकाला वाटत होतं कि मीच सर्वात दयाळू आणि पुण्यवान आहे. पण नाण्याला हात लावण्याचं धाडस कोणालाच होईना. कारण आपण हात लावला आणि सोन्याचं लोखंड झालं तर ? ही भिती प्रत्येकालाच सतावत होती. पण तरीही एकेक करून साऱ्यांनी नाण्याला हात लावला आणि प्रत्येक वेळी नाण्याचं लोखंड झालं. शेवटी ते तसंच लोखंडाच होऊन राहिलं.  

दयाराम हा एक गरीब शेतकरी होता. सोन्याच्या नाण्याची बातमी त्यालाही कळाली होती. पण त्यानं शेतातली करण्यासारखी कामं पूर्ण केली. मग मंदिरात आला. मंदिरात येताना सोबत आणलेलं अन्न मंदिराबाहेरील गोरगरिबांना वाटलं. काहींच्या हातात सुटे पैसे ठेवले. पायातल्या चपला काढल्या. श्रीरामांच दर्शन घेतलं. सारे आपापल्या पापपुण्याचा हिशोब करण्यात मग्न होते. दयारामकडे कुणाचंच लक्ष नव्हतं.

दर्शन आटोपल्यावर दयाराम गर्दीकडे निघाला. तेवढ्यात मंदिराच्या पुजाऱ्यानं दयारामला पाहिलं. नाण्याला स्पर्श करायचा गावातला तेवढाच एक माणूस राहिला होता. पुजाऱ्यान दयारामला गर्दीतून वाट करून दिली. गर्दीच्या मध्यभागी ते लोखंडाच नाणं पडलं होतं. दयाराम पुढे गेला त्यानं नाण्याला हात लावला आणि काय आश्चर्य इतका वेळ लोखंडाच होऊन राहिलेलं ते

नाणं पुन्हा सोन्याचं झालं. सारं गाव श्रीरामांच आणि दयारामचं दर्शन घेऊन माघारी गेलं.                  

No comments:

Post a Comment