Friday 6 March 2015

कशाला हवी गोहत्या बंदी ?

 महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्या बंदीचा निर्णय घेतला. अनेक हिंदू धर्मियांना त्यामुळे आनंद झाला. पण खरंच गोहत्या बंदीची गरज होती का ? गोहत्येमुळे आमच्या भावना दुखावल्या जातात असे म्हणणाऱ्या हिंदूंना ग्रामीण भागातल्या भाकड जनावरांची काय अवस्था असते ते माहित आहे का ?
भाकड कशाला एखादं दुभतं जनावर अथवा कामातला बैल अचानक मरण पावतो तेव्हा तो शेतकरी त्या मेलेल्या जनावराला कशा रितीने ओढया वघळीला अथवा ओसाड माळावर नेऊन टाकतो ते पाहिलं आहे का ? तिथं कोल्ही - कुत्री त्या मेलेल्या जनावराचे कसे लचके तोडतात पाहिलं आहे का ? कावळे - गिधाडं त्या मेलेल्या जनावरावर कसे ताव मारतात हे पाहिलं आहे का ? मी ते जवळून पाहिलं आहे.

बरं हि ग्रामीण भागातली मंडळी मेलेली जनावरे आडबाजुला टाकतानाही निटशी काळजी घेत नाहीत. हि जनावरे टाकताना त्याचा त्रास स्वतःला होणार नाही याची काळजी ते घेतात. पण दुसऱ्याचा विचार करत नाहीत. माझ्या शेताच्या कडेने ओढा आहे. मी आठ दिवस गावी तर आठ दिवस पुण्यात असतो. मी शेतावर नाही असे पाहुन हि मंडळी मेलेली जनावरे माझ्या शेताच्या कडेला आणून टाकतात. त्या मृत जनावरांचे अवशेष तिथे काही महिने पडून रहातात. त्यामुळे ओढयाच पाणी दुषित होतं. इतर जनावरे तेच दुषित पाणी पितात. मलाही जाता येता त्याचा त्रास होतो तो वेगळाच. खरंच सांगतो मला माझ्या त्रासाचे काही वाटत नाही पण त्या गोमातेच्या विटंबनेचे काय ? हिंदुत्ववादयांनी गोमातेची हि विटंबना कधी पहिली आहे का ?  कुत्री त्या मेलेल्या जनावरांच्या शरीराचे अवशेष तोडून आणतात. त्या त्या भागावरचे मांस संपल्यानंतर उरलेली हाडे तशीच शेतात टाकुन देतात. एक दिवस मी लोकांना सांगितले कि माझ्या शेताच्या कडेचा ओढा म्हणजे काही जनावरांचा मसणवटा नाही. यापुढे आपापली जनावरे ज्याने त्याने आपापल्या शेताच्या हद्दीत टाकावीत. पण ऐकेल तो माणूस कसला ?      

बैल गाडा शर्यतीवर बंदी घालावी हि मागणी कुणाची ? तर एसी गाड्यांमधून फिरणाऱ्या तथाकथित प्राणिमित्रांची. हि मंडळी शहरातल्या डांबरी सडकांवरून फिरणार. बैलाच्या मुखात किती दात असतात हे यांना माहित नसतं. बैल दाताला लागतो म्हणजे काय होतं हे यांना कळत नाही. ती मंडळी स्वतःला प्राणी मित्र म्हणवणार. प्राणी आणि शेतकरी यांचे संबंध किती जिव्हाळ्याचे असतात हे ज्यांना जाणून घ्यायचं असेल त्यांनी माझे बैल आणि मी तसेच दिवाळी माझ्या बैलाची हे लेख नक्की पहावेत. मला माझ्या गावाकडील कुत्र्याविषयी लिहायचं आहे. ते वाचल्यानंतर वाचकांना प्राणी आणि शेतकरी हे संबंध कसे असतात ते कळेल.   

बरं. गोहत्या बंदीची मागणी कुणाची ? शेतकऱ्याची का ? नाही. ती मागणी आहे इथं सिमेंटच्या सावलीला बसलेल्या तथा कथित हिंदुत्ववाद्यांची. अशी मागणी करताना त्यांना काहीच फरक पडत नाही. या मंडळीकडे दहा वीस भाकड जनावरे यांना सांभाळण्यासाठी द्यायला हवीत. म्हणजे मग त्यांना शेतकऱ्यांची मानसिकता कळेल. आपले आई वडील वृद्धाश्रमात ठेवायचे आणि आणि मुक्या प्राण्यांचा कैवार घ्यायचा. मजा आहे. 

मुळातच गोहत्या बंदीची मागणी करताना गोहत्येशी मुस्लिम समाजाचा संबंध जोडला जातो. गोहत्या मुस्लिम समाज करतो. हिंदुंना गाय प्रिय असल्यामुळे मुस्लीन समाज मुद्दाम आणि जाणीवपुर्वक गाईचे मांस खातो. असा समज समाजात आहे. गोहत्येशी मुस्लिम समाजातील कुरेशींचा मोठ्या प्रमाणात संबंध आहे. पण तो त्यांचा व्यवसाय म्हणुन. पण दक्षिणेकडचे काही हिंदू समाज गो मांस भक्षण करतात. ख्रिश्चन समाजातही काही मंडळी गो मांस भक्षण करतात. ते त्याला बीफ म्हणतात. त्यांना गो मांस किती रुचतं हा प्रश्न वेगळा आहे. पण कोंबडी , बकरी , डुक्कर यांच्या मांसापेक्षा ते मांस त्यांना आर्थिक द्रुष्ट्या परवडत एवढा मात्र खरं.

त्यामुळेच ' गोहत्या बंदी '  हि मागणी योग्य नाहीच. एकीकडे माणसासाठी इच्छामरणाचा कायदा हवा अशी अपेक्षा करायची आणि दुसरीकडे मरणाच्या दारी पोहचलेल्या जनावरांच्या हत्येला विरोध करायचा. हा असला दुटप्पीपणा माणूसच करू शकतो.

बरं गोहत्या बंदी केल्याने काय साध्य होईल ?

भाजपाचा हा निर्णय मला मुळीच रुचलेला नाही. इतर अनेक महत्वाच्या प्रश्नांना बाजूला ठेऊन एका वर्गाला खुष करण्याचा हा प्रयत्न समाजाच्या द्फोल्यात धूळफेक करणारा आहे. यामुळे काय झाले केवळ एका बिनकामी वर्गाच्या भावना गोंजारल्याचे समाधान मिळाले . पण गोहत्या बंदी केल्याने किती प्रश्न निर्माण होणार आहेत ? याचा कधी कोणी विचार केलाय ? गोहत्या बंदीची मागणी करणाऱ्या मंडळींनी पुढील प्रश्नांची उत्तरे दयावित -

१ ) एका जनावराला एका दिवसाला कमीत कमी ५० रुपयांचा चारा लागतो. म्हणजे महिन्याकाठी दीडहजार रुपयांचा चारा लागतो. अर्धी चतकोर खाऊन पोट भरणाऱ्या शेतकऱ्याने अशी भाकड जनावरे कशी पोसायची ?

२ ) देशभरात साधारणता दीड लाखाहून अधिक भाकड जनावरे आहेत. अशा जनावरांच्या चारापाण्याची व्यवस्था कुणी करायची ?

३ ) देशातले जवळ जवळ पाचशेहून अधिक कत्तलखाने बंद पडतील त्यांचं काय करायचं ?

४ ) प्रत्येक कत्तलखान्यावर ५० कुटुंबांचा संसार चालतो असे गृहीत धरले तर उदयापासून २५००० हून अधिक         कुटुंबांनी पोट कसे भरायचे ?

५ ) प्रत्येक कुटुंबात सरासरी चार व्यक्ती आहेत असे गृहीत धरले तर एक लाख माणसांनी उपाशी मरायचे का ?

६ ) बरं यात केवळ मुस्लिम समाजच सहभागी आहे असे नाही. तर हिंदू समाजातल्या काही जाती या व्यवसायात नाहीत का ?

त्यामुळेच गोहत्या बंदीची मागणी चुकीची आहे. मान्य आहे,  आम्ही ( अगदी मीसुद्धा ) गाईला देवता मानतो. ती आम्हाला पुजनीय. पण ती जनावरे मरणाची याचना करत असताना त्यांना दावणीला बांधुन ठेवणे चुकीचेच नाही का ?

भावना आणि श्रद्धा महत्वाची आहेच पण इतर मुद्यांचा विचार होणेही गरजेचे आहे.







                  

20 comments:

  1. तुम्ही चुकीचे बोलत आहात. तुम्ही हिंदू असल्यामुळे गाईचे उपयोग काय आहेत ते तुम्हाला माहितीच असतील. जसे गायीच्या दुधापासून ते गायीच्या गोमुत्रापर्यंत गाय उपयोगी आहे. आर्युवेदामधे गोमुत्राला महत्त्वाचे स्थान आहे. आधी मला सांगा की कत्तलखाना ही संकल्पना हिंदूस्थानमध्ये आणली कोणी? मुसलमानांनीच, होय की नाही? कत्तनखान्यामध्ये ज्या काही गाई व इतर जनावरे मारली जातात त्यांच्यावरच्या प्रत्येक घावाचे दुख: तुमच्यासारख्या स्वार्थी माणसांना कधीच कळणार नाही. त्याच गाईंचे दुध किती बालकांना दुध पोसू शकते? याचा कधी विचार केला आहे का? कत्तलखाने बंद करायलाच पाहिजेत ! याच्याशी मी सहमत आहे की महाराष्ट्र सरकारने अगदी योग्य निर्णय घेतला आहे. कत्तलखन्यामध्ये काम करून जे काही लोक आपले पोट भरतात ते एकप्रकारचे हिंसकच आहेत. माणसासारखीच इतर जनावरेसुदधा एकप्रकारचे जीवच आहेत. माणसाचा खूण केल्याने जी शिक्षा होते तीच शिक्षा निष्पाप प्राण्यांचा खून करणऱ्यांना झालीच पाहीजे. तुमच्या शेतात जे कोणी मेलेल्या जनावरांचे शव टाकतात त्यांची पोलिसात तक्रात का नाही केली? सध्याचे सरकार बदललेले आहे आणि ते लगेच कारवाई करते. जर पोलिसांनी शव पुरायची परवानगी दिली तर ते उत्तमच कारण जेव्हा शव जमीनीखली कुजते तेव्हा मातीतील सुक्ष्मजीव जैवरासायनिक क्रिया घडवून आणतात, ज्यामुळे झाडांना उत्तमप्रकारचे नैसर्गिक खत तयार होते जे झाडांच्या मुळावाटे शाषले जाते. कत्तलखाने तर बंद व्हायलाच पाहीजेत आणि कत्तलखान्यांच्या जागी दुध उत्पादन केंद्रे बनली पाहिजेत जेणेकरून कारागीर बेकार होणार नाहीत आणि 2500 हून अधिक कुटुंबे पोसली जातील .

    सकारात्मक दृृष्टिकोन ठेवा, सकारात्मक विचार येतील, मी तुमच्या या वेबपेजला भेट दिली म्हणून ठिक पण तुमच्या या माहितीमुळे किती लोकांचा गैरसमज झाला ते ताे परमेश्वरच जाणे.

    ReplyDelete
    Replies
    1. अक्षयजी. अभिप्रायाबद्दल आभार. माझा लेख केवळ भाकड आणि मरणासन्न अवस्थेत पोहचलेल्या जनावरांच्या संदर्भात आहे. ग्रामीण जीवन आपण किती जवळून पहिले आहे माहित नाही. पण आज कित्येक शेतकरी दोन बैल सांभाळणे शक्य नसते म्हणुन ते केवळ एक बैल बाळगतात व दुसर्या बैलासाठी शेजारच्या शेतकर्याशी सावड करतात. अशात आपण हि भाकड जनावरे पोसण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकली तर शेतकरी अधिक मेटाकुटीला येईल. आपण म्हणता तसे मृत जनावरे पुरायची ठरवली तर एक जनावर पुरण्यासाठी खड्डा घेणे व इतर बाबी यासाठी कमीत कमी २००० रुपये खर्च येईल. थोडाफार दुष्काळाच सवत आलं सरकारच्या तोंडाकडे पहाणार्या शेतकऱ्याला हा भर सोसणार नाही. असो तरीही आपण आपले मत मांडले हे काही कमी नाही. आज आपण माझ्या ब्लॉगला पहिल्यांदा भेट दिलीत. यापुढे नियमित भेट दयाल हि अपेक्षा.

      Delete
    2. पहिली गोष्ट सांगतो मी तुम्हाला ती म्हणजे मी ग्रामीण भागातच राहतो. आत्ता मला सांगा की ज्या शेतकऱ्यांना गुरे ढोरे पोसायला जमत नाहीत तर ते पाळतीलच कशाला? शेतकरी सुध्दा काय कमी नसतात. काही शेतकरी सरकारी मदतीतुन शेतीसाठी मिळालेला पैसा व्यसनासाठी उडवतात आणि जनावरांना पोसायला काही नाही म्हणून रडत बसतात. इथे चुक कोणची? सरकारची तर नाही कारण सरकारने पैश्यांच्या रुपात मदत पुरवण्याचे काम केले. जनावरांचा तर काही दोषच नाही. चुक आहे ती म्हणजे त्या शेतकऱ्यांची ज्यांनी सरकारी मदतीचा गैरवापर केला. जर असा गैरवापर थांबवला तर नक्कीच शेतकरी दोनच काय तर पाच पाच बैलांना पोसू शकतील. बरोबर की नाही? तुमची एक गोष्ट बरोबर आहे की जनावरांचे शव टाकायला खडडा मारण्याचा प्रश्न. त्याच्यावर मी विचार करतोच आहे. पण कत्तलखाने बंद करून त्याच ठिकाणी दुध उत्पादन केंद्रे बनवायच्या माझ्या कल्पने बददल तुम्हाला काय वाटते? जे कामगार कत्तलखान्यात वाईट काम करत होते तेच कामगार दुध उत्पादन केंद्रात चांगली कामे करणार व परिवाराचे पोट उत्तमप्रकारे भरू शकणार. बरोबर की नाही?

      Delete
    3. अक्षयजी, अभिप्रायाबद्दल आभार. ग्रामीण भागात बैलांची सावड चालते हे आपणास माहित असेलच. ग्रामीण भागातील माणसांच्या स्वभावाचा जो एक पैलु आपण मांडला आहात तो बऱ्याच प्रमाणात खरा आहे. आता शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत मी आपणाकडून जाणून घेऊ इच्छितो. आपल्या कल्पना चांगल्याच आहेत. पण त्यासाठी हवी असणारी इच्छाशक्ती कोणाकडे आहेऽसो आज महिला दिन आणि शिवजयंती अशा दोन्ही कार्यक्रमाच्या धावपळीत होतो त्यामुळे उत्तर द्यायला उशीर झाला. उद्यापासून आठ दहा दिवस गावी शेतावर जाणार आहे. त्यामुळे आपणास लगेच प्रतिसाद देऊ शकणार नाही. पण आपण संपर्कात रहावे.

      Delete
    4. मी याअगोदरच्या Reply मध्ये सांगितले होते की जनावरांच्या शवाचे व्यवस्थापन करण्याबददलच्या प्रश्नाबददल विचार करत आहे. यावर मी विचार केला आहे. आपल्याला माहिती आहे की काही अभयारण्यांसाठी वाघ सिंहांसारख्या प्राण्यांना जीवंत ठेवण्यासाठी मांस दिले जाते. जेव्हा शेतकऱ्यांचे बैल मरायला येतील (फक्त त्यांच्या श्वास चालू असेल) त्या स्थितीत त्या भुकेलेल्या वाघा सिहांना असे मरायला टेकलेले गाय बैल देण्याक काहीही हरकत नाही जेणेकरून शेतकऱ्याला पैसाही मिळेल. तुम्हाला माहित असेल की जेव्हा कत्तलखान्यात गाईला किंवा वासराला मारले जाते तेव्हा त्यांच्या डोळयामध्ये मिरची फोडून दाबून भरली जाते आणि खूप वेळ तश्याच वेदनादायक अवस्थेत अशी गाई वासरे ठेवली जातात. खोट जर वाटत असेल तर www.change.org तसेच www.forcechange.com वर लोकांनी याला विरोध करण्यासाठी Petitions बनवली आहेत त्यामध्ये काही परदेशी लोक सुध्दा समाविष्ट आहेत ज्यांनी फोटो पुरावे म्हणून जोडले आहेत. तुमचे Google किंवा Facebook अकांऊंट वापरून ती Petition Sign In करा आणि Share करा जेणे करुन Supporters ची संख्या वाढली की सरकार त्यावर लगेच मोठी कारवाई घेऊ शकेल. या असल्या कत्तलखान्यात देण्याऐवजी अभयारण्यातल्या त्या बिचाऱ्या वाघा सिहांना मरायला टेकलेली (फक्त श्वास चालू असणारी) जनावरे दिली तर ते खुशीने खातील. खडडा पाडण्याचा प्रश्न मिटला. शेतकऱ्याला त्याबदल्यात पैसेही मिळतील. पण काही शेतकरी या सुविधेचा गैरवापर करतील तो म्हणजे पैसे मिळवण्यासाठी जरा आजारी गाय बैल पडले की त्यांना वाघ सिंहांसाठी अभयारण्यात देऊन मोबदला घेतील. त्यासाठी असाही नियम असला पाहिजे जेणेकरून मरायला टेकलेली व फक्त श्वास चालू असणारी किंवा काही तासांपूर्वी मेलेली जनावरे असली पहिजेत जी वाघ सिंह आवडीने खाऊ शकतील. काही शेतकऱ्यांच्या त्यांच्या प्राण्यांबरोबर भावना असतात व ते त्यांचे बैल अशा अभयारण्यात देऊ शकत नाहीत. अशा शेतकऱ्यांना माझे म्हणणे आहे की ज्या बैलाने इतकी वर्षे त्या शेतकऱ्याच्या शेतात राबून त्याच्या कुटुंबाचे पोट भरले, जो बैल शेतकऱ्याच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी कारणीभूत ठरला, ज्या गाईचे दुध विकून शेतकऱ्याची मुले मोठी झाली, एवढी वर्षे राबलेल्या त्या गाई बैलांचा मृतदेह पुरायला त्यांचे उपकार म्हणून फेडण्यासाठी त्या शेतकऱ्याला साधा खडडा खणता येत नाही?

      Delete
    5. अक्षयजी, अभिप्रायाबद्दल आभार.आपले मत योग्य आहे. पण यासाठी सुद्धा एक व्यवस्था उभारावी लागेल. शेतकऱ्याला पैसे दयावे लागतील. त्याच्याकडची जनावरे खरेदी करावी लागतील. जंगलातील प्राण्यांसाठी तुमच्याकडची भाकड जनावरेही फुकट द्या म्हणले तर तो देणार नाही. पण यातही आपण कायदा आणु पहात आहात तो कशासाठी ? शेतकऱ्यासाठी निरुपयोगी असलेले जनावर मरणासन्न अवस्थेत पोहचायला हवे हि आत कशाला ? कारण जर्शी गाईच्या पोटी नर जन्माला आला तर त्याचा शेतकऱ्याला उपयोग नसतो. त्याला खांदा ( वशिंड ) नसल्यामुळे शेतीकामात त्याचा उपयोग करणे अवघड असते त्यामुळे अशी म्हिन्यभ्रचिअ वासरेही शेतकरी हजार पाचशे रुपयांना विकुन टाकतो. शेतकऱ्याला पैशाचा लोभ किती असतो हे जाणून घेण्यासाठी माझा ' प्राण्यांची कामभावना हा लेख जरूर वाचावा. http://maymrathi.blogspot.com/2014/08/animal-sex.html

      Delete
    6. मी अगोदरच म्हटले आहे की अभयारण्यातल्या प्राण्यांना मरायला टेकलेले प्राणी (फक्त श्वास चालू असणारे) प्राणी देऊन शेतकऱ्याला मोबदल्यात पैसेही मिळतील अशी मी कल्पना सुचवली होती. मोबदल्याबददल तुम्ही वाचले नसेल कदाचित. तुम्ही मागे म्हटला होतात की तुम्ही मा. देवेंद्र फडणविस यांना चार पाच पत्र पाठवलित. पण याबददल कायदा बनवायलासुध्दा सांगा की मरायला टेकलेले किंवा फक्त श्वास चालू असलेले निरूपयोगी गाय बैल अभयारण्यातल्या दुर्मिळ होत जाणाऱ्या मांसाहारी पशूंना खायला देवून त्याबददल शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळण्याचा कायदयबददल फडणविसांना सुचवा. व त्याचबरोबर जेथे कत्तलखाने होते तेथे दुध उत्पादन क्षेत्रांचा विकास करावा. त्याबददलच्या रोजगाराबददल व कामगारांबददल मी आधीच पूर्वीच्या Reply मध्ये लिहिलेले आहे.

      Delete
    7. अक्षयजी, आपली सुचना योग्य आहे.

      Delete
  2. Only unuseful animals ecept cow needs to be slauted which eill face money. This will give job to somebody and farmers will get money to replenish the stock of useful animals. The rate of mutton will be controlled. Every poor will be able to eat non veg as per their capcaity. The problem of fodder space water needef for the anunlmals in daught affected areas will be solved.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Friend.But what about non useful caws which are near about 1 lakh 28 thousand in India at this moment.

      Delete
  3. समीर काळे6 March 2015 at 15:14

    आपला लेख सर्वसमावेशक आहे खूप आवडला. माझ्या बैलाची दिवाळी वाचुन तर डोळ्यात पाणी आले. ग्रेट.

    ReplyDelete
  4. आपल्या लेखात तथ्य आहे सर,परंतु आपले राज्य हिंदुबहुल असल्यामुळे अनेकांना हा विषय पटणार नाही .....

    ReplyDelete
    Replies
    1. अक्षयजी अभिप्रायाबद्दल आभार. आपले राज्य हिंदुबहुल असल्यामुळे हे लोकांना पटणार नाही हे आपले म्हणणे योग्य आहे. पण लोकांना पटो अथवा न पटो आपण चांगले विचार समाजासमोर मांडायलाच हवेत. स्त्री शिक्षण हा विषय समाजाला पटणारा नव्हता तरी अनेक समाजसुधारकांनी तो विषय समाजासमोर मांडला आणि वास्तवात आणलाच ना. असो. आपल्या मते नेहमी अशीच मांडावीत. मार्गदर्शन मिळते.

      Delete
    2. कोण सांगतो की स्त्री शिक्षण हा विषय हिंदु समाजामध्ये नव्हता? पितामह भीष्मांचा वध करणार स्त्रीच होती ना? झशीचाी राणी लक्ष्मीबाई यांनी युध्दाचे शिक्षण घेतले नव्हते का? स्त्री शिक्षण ही बाब हिंदू समाजात अगोदरपासूनच आहे. जेव्हा अरबी लोकांनी हिंदूस्थानवर राज्य केले तेव्हापासून स्त्री शिक्षण बंद करण्यात आले कारण अरबी समाजामध्ये म्हणजेच मुस्लीम स्त्रियांना शिकण्याची परवानगी नव्हती. अरबी लोकांचे बघून आपले लोकही त्यात सहभागी झाले. मुस्लिम लोक त्यांच्या सणांच्या दिवशी देवाला खुश करण्यासाठी बकऱ्यांसारख्या प्राण्यांचा बळी देतात हे बघून आपले लोक इतर देवतांना खुश करण्यासाठी कोंबडयाबकऱ्याचे बळी देऊ लागले. सर्व परिस्थिती परत जाग्यावर आणण्यासाठी कष्ट करावे लागले ते म्हणजे महात्मा फुले यांसारख्या माणसांना. पण ब्रिटिश, अरबांच्या हस्तक्षेपाअगोदर आपला देश हिंदूस्थान होता ज्याने जगाला वैदिक गणित, आयुर्वेद, योगा, नाडीखगोलशास्त्र, पंचांग, प्राणायाम, यांसारख्या आनेक गोष्टी जगाला दाखवून दिल्या. पण अरबांनी व ब्रिटीशांनी ही सारे वैदिक विज्ञान व वैदिक गणित जाळून खाक केले. पण काही लोकांनी असे ज्ञान सुरक्षित लपवून ठेवले त्यामुळे आपण आज आयुर्वेद, योगासने, प्राणयाम यांचे महत्त्व जगाला पटवून देऊ मिळवू शकलो. पण झाला एक मोठा गाेंधळ, तो म्हणजे सध्या आपल्याकडे जे वैदिक गणित उपलबध्द आहे ते ग्रीकांच्या गणिताशी तुलना करता खुप कमी वेळ व कमी जागा वापरते व बराेब्बर उत्तर देते पण आपल्याकडे संपूर्ण वेैदिक गणित उपलबध्द नाही कारण त्याचा निम्म्याहून अधिक भाग अरबांकडून नष्ट केला गेला. अशा या अपूर्णतेमुळे वैदिक गणित आज पाश्चिमात्त्य देशांमध्ये Collection of Shortcut tricks in mathematics म्हणून ओळखले जाते. वैदिक विज्ञान जसे की आयुर्वेद, अपल्या आयुर्वेदिक औषधांनी आधुनिक विज्ञानावर मात तर केलीच पण खुप काही गोष्टी अरब आणि ब्रिटीशांच्या हिंसाचारामुळे नष्ट झाल्या आणि या अशा अपूर्णतेमुळे आपले वैदिक विज्ञान हे पाश्चिमात्त्य देशांमध्ये Pseudo Science म्हणून ओळखले गेले. किती वाईट गोष्ट आहे ही? आपल्या वैदिक गणिताला Shortcut Tricks व वैदिक विज्ञानाला Pseudo Science म्हणणे म्हणजे आपल्या वैदिक पूर्वजांचा अपमानच ताे, होय की नाही? त्यामुळे मला असे वाटते की आपण परकीय विज्ञान व गणित शिकता शिकताच वैदिक विज्ञान व गणित सुदधा Continue केले पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा आधुनिक विज्ञान काहितरी शोध लावते तेव्हा लोक म्हणतात की हे आपल्या वेदांमध्ये अगोदरच लिहून ठेवलेले आहे. जेव्हा आपण बघायला जातो तेव्हा ते सत्य असते. म्हणजेच आपल्या पुर्वजांनी पाश्चिमात्त्य विज्ञानाअगोदरच हया सर्व गोष्टींचा शोध लावला होता. त्यामुळे मला वाटते की परदेशी ज्ञान मिळवण्याऐवजी आपण आपले नष्ट झालेले वैदिक गणित व वैदिक विज्ञान जेथून नष्ट झाले आहे तेथून ते पुन्हा विचार करून पूर्वरत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून आपले Advanced Vedic Science & Vedic Mathematics as well as Vedic Culture should be accepted by Foreigners. Am I right? आपल्या महान वैदिक विज्ञानासाठी व वैदिक गणितासाठी पुरावे म्हणून मी खाली काही लिंक्स देताे त्यांना अवश्य भेट दया.

      (1) http://www.speakingtree.in/public/blog/shocking-scientific-inventions-by-ancient-hindu-saints
      (2) http://agniveer.com/science-in-vedas/
      (3) http://www.huffingtonpost.co.uk/abhaey-singh/15-indian-inventions-disc_b_3682950.html
      (4) http://www.hitxp.com/articles/veda/vedic-ancient-science-modern-technology-mathematics-geometry/
      (5) https://www.saddahaq.com/humaninterest/plasticsurgeryindianorigin/platic-surgery-its-indian-origin
      (6) http://sudhanshu.com/history.htm

      Delete
    3. अक्षयजी, अभिप्रायाबद्दल आभार. मी स्त्री शिक्षण समाजाला पटणारा विषय नव्हता असे म्हटले आहे. आणि ते वास्तव आहे.स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ महात्मा फुलेंनी रोवली आणि त्यासाठी त्यांच्या सह सावित्रीबाई फुले यांना कोणत्या दिव्यातून जावे लागले हे आपणास माहिती आहेच. असो तरी आपण खुपच अभ्यासपुर्ण लिहिता. त्यामुळेच माझ्या लिखाणाबाबत आपले मत जाणून घेताना अधिक आनंद होतो.

      Delete
    4. मला हे सांगायचे होते की स्त्री शिक्षण हा विषय हिंदू समाजाला न पटणारा बनला तो म्हणजे अरबांच्या हस्तक्षेपानंतर. त्यापुर्वी हिंदूस्थानच्या अनेक स्त्रियांनी इतिहासात मोठ मोठे पराक्रम गाजवलेले आहेत. त्यांच्यापैकी एक म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई ! आपला देश किती वर्षे मुघलांच्या ताब्यात होता ते आपल्याला माहिती आहेच, त्याच कालावधीमध्ये आपल्या देशातील लोकांना जबरदस्तीने त्यांचे नियम पाळावे लागत. मोघल देश सोडून गेले तरी त्यांची प्रथा (स्त्री शिक्षणाला परवानगी नसण्याची प्रथा) आपल्या लोकांमध्ये तशीच राहिली व यामुळेच सर्व भार सोसावा लागला तो म्हणजे महात्मा जोतिबा फुले व सावित्री बाई फुले यांना. मला एवढेच सांगायचे होते की परकीयांच्या हस्तक्षेपाअगोदर हिंदू संस्कृतीत स्त्री शिक्षणाला परवानगी होती.

      Delete
    5. अक्षयजी, अभिप्रायाबद्दल आभार. आपले इतिहासाचे परीक्षण अत्यंत उत्तम आहे.

      Delete
    6. शितलनाथजी आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. परंतू कोणत्या रितीने तुम्हाला कोणत्या दृष्टीकोनातून माझा लेख भावनाशुन्य वाटला कोणास ठाऊक. स्पष्ट केलेत तर बरे होईल.

      Delete