Friday, 25 September 2015

शेतकऱ्यांसाठी एवढं कराल

तुम्ही आणि मी नाना नाही, मक्या नाही. अक्षय नाही आणि अजिंक्य रहाणे सुद्धा नाही. परंतु तुमच्या पैकी प्रत्येकाच्या मनात शेतकऱ्यांच्या बाबत एक सॉफ्ट कॉर्नर नक्की आहे. फेसबुकवर दिसणाऱ्या कॉमेंट वरून ते माझ्या लक्षात येतं. त्यामुळेच आपण त्यांना आर्थिक मदत नाही करू शकलो तरी मी सांगतोय तेवढं नक्की करू शकाल.

कदाचित
या लेखाच्या शिर्षकावरून हा लेख आपणास फारसा वाचावासा वाटणार नाही. तरीही हा लेख आपण पूर्ण वाचावा. आणि आपणास शक्य असणाऱ्या फेसबुक, Whats App, ईमेल अथवा अन्य कोणत्याही मार्गाने फोरवर्ड करावा. इतका फोरवर्ड करावा कि तो फडणवीस यांच्या पर्यंतच नव्हे तर मोदींपर्यंत पोहचायला हवा.

काय आहे आमचे राज्यकर्ते वर्षानुवर्ष सत्तेत आहेत. स्वतःला शेतकरी म्हणवून घेत आहे. मोदींना आणि फडणवीसांना कांदा कुठे येतो हे माहित नाही म्हणत त्यांना हिणवत आहेत. पण यांना तरी शेतकऱ्यांच्या अडचणी कुठे माहित आहेत. सत्तेच्या आशेने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची बाजू घेणं हाही यांचा एक मढ्याच्या टाळूवरच लोणी खाण्याचा प्रकार. कर्ज माफी हवी ती शेतकऱ्यांसाठी नव्हे तर यांनी रिकामे केलेले सहकारी सोसायट्यांचे आणि जिल्हाबँकांचे गल्ले भरण्यासाठी.

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा साप, विंचू यांच्या दंशाने अथवा वाघासारख्या प्राण्यांच्या प्राणघातक हल्ल्याने. अथवा विजेचा धक्का बसुन अधिक शेतकरी मरण पावतात. त्यांची मुले पोरकी होतात, संसार उध्वस्त होतात. पण अशा रितीने मरण पावलेल्या शेतकऱ्यांची बाजू कोणीच घेत नाही. ना सरकार, ना नाना, ना मक्या. त्यांना कसलीही मदत मिळत नाही. ना शासकीय , ना खाजगी. इतर सगळ्यांचे कामाचे तास किती असावेत याचा विचार करणाऱ्या मानवी आयोगाला हे का दिसत नाही. शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसाचा आठवडा करण्याचा विचार करणाऱ्या शासनाला शेतकऱ्याचे हाल का दिसत नाहीत. 

आम्ही इथं मस्त खालीवर घेऊन झोपलेलो असतो. तिथे शेतकरी अंधारात डोळे मोठे करून अंधार निरखत असतो. आम्ही पावसाचा शिंतोडा आला तरी छत्री उघडतो नाही तर रेनसुट चढवतो. आणि आमचा शेतकरी पाऊस निरखत शक्य असेल तर झाडाच्या आडोशाला जातो. कडाक्याच्या थंडीत आम्ही एक नव्हे दोन दोन रजया अंगावर घेत उब शोधतो आणि आमचा शेतकरी थंडीत कुडकुडत पाण्यात उतरतो.

शेतीसाठी तीन पाळ्यात वीजपुरवठा केला जातो. या वेळा सर्वसाधारणपणे सकाळी ७ ते दुपारी ३, दुपारी ३ ते रात्री ११ अथवा रात्री ११ ते सकाळी ७ अशा असतात. बऱ्यादा दिवसा अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होतो. त्यामुळे शेतकरी रात्री ११ ते सकाळी सात या वेळेत शेतीला पाणी देणे अधिक पसंत करतात. कारण तेव्हा रात्र असली तरी वीज पुरेशी असते. त्याला झोप आलेली असते. पण विलाज नसतो. बाहेर जीवघेणी थंडी असते. पण पर्याय नसतो. कृष्ण पक्ष असेल तर आपलेच पाय आपल्याला दिसत नाहीत एवढा अंधार असतो. पण शेतावर जाण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा मार्ग नसतो. असलीच तर हातात ठसका लागल्यासारखा, जिवावर आल्यासारखा प्रकाश ओकणारी एखादी विजेरी असते. पण ती कधी दगा देईल हे सांगता येत नसतं.  तेव्हा त्याला सापा विंचवाची भीती वाटत नाही असे नाही. पण देवावर हवाला ठेऊन तो रानात जातो.

हे स्वतःला शेतकरी म्हणवणाऱ्या राज्यकर्त्यांना कधी जाणवले नाही का ? नाहीच जाणवले. कारण हे स्वतः कधीच शेती करत नाहीत. शेतात राबतो गडी. आणि खादीचे पांढरेशुभ्र कपडे घालून मिरवतात हे.

त्यामुळेच शेतकऱ्याला तीन नव्हे तर दोनच पाळ्यात वीजपुरवठा करावा. पहाटे ५ ते दुपारी १ आणि दुपारी १ ते रात्री ९ या वेळात शेतीसाठी वीजपुरवठा केल्यास आपल्याप्रमाणेच शेतकरीही रात्री घरात निवाऱ्याला झोपू शकेल.

या काळात शेतीला पुरेशा दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी मोठया उद्योगांचा वीज पुरवठा कमी करावा लागला तरी चालेल. कारण असे उद्योग जनरेटरच्या साह्याने वीजनिर्मिती करून कारखाने चालवू शकतात. आणि चाळीस पन्नास टक्के फायदा मिळविणाऱ्या उद्योग क्षेत्राला त्यामुळे फारशी झळ बसणार नाही.

एवढ सुख शेतकऱ्याला आपण सहजासहजी देऊ शकतो. त्यासाठीच हि पोस्ट अधिकाधिक शेअर करा.   
                    
    
  


               

     

6 comments:

 1. Agdi khre. On he honar kse.

  ReplyDelete
  Replies
  1. सुहासजी अभिप्रायाबद्दल आभार. हे होणार कसे हे मलाही सांगता येणार नाही. परंतु हा विचार राज्यकर्त्यांपर्यंत पोहचला तर काहीतरी होऊ शकते म्हणुनच. हा लेख शेअर करण्याची विनंती मी वाचकांना केली आहे. अनेकांनी तो शेअरही केला आहे.

   Delete
 2. मधुर मोटे30 September 2015 at 17:16

  एवढया साध्या गोष्टी आमच्या राज्यकर्त्यांना कशा लक्षात येट नाहीत ?

  ReplyDelete
  Replies
  1. मधुरजी , अभिप्रायाबद्दल आभार. राज्यकर्त्यांच्या लक्षात आले नसेल. अथवा आले असेल तरी जातीयवादाप्रमाणे या गोष्टीचा आयुष्यभर राजकीय फायदा घेता येणार नाही म्हणुन ते याकडे दुर्लक्ष करत असतील.

   Delete
 3. मनोज विचारे30 September 2015 at 17:50

  आज पहिल्यांदाच आपल्या ब्लॉगला भेट दिली. अनेक मनापासून आवडले.

  ReplyDelete