Wednesday, 22 October 2014

Diwali Greetings : दिवाळी माझ्या बैलाची


परवा गावाहुन निघालो. आता गावाकडंचं घर आठ - दहा दिवसासाठी बंद. तिथं दारात दिवा लावायलाही कुणी नाही. आम्ही सारे पुण्यात. दिव्यांच्या झगमगाटात.  गावाकडंचं दार अंधारात. दारात बांधलेला, अंधाराची सोबत करणारा माझा बैल पठाण ! अंधाराची सोबत करणारा माझा पठाण !

दिवाळीचं………….आकाशदिव्यांच………… पणत्यांचा………… दिवाळीच्या झगमगाटाचं कौतुक
आम्हाला…………. प्रकाश सोबत घेऊन फिरणाऱ्या शहरांना. पण पिढ्यानपिढ्या अंधारात बुडालेल्या गावांना, अंधाराच्या पखाली वाहणाऱ्या खेडयांना, अंधार तळहातावर घेऊन फिरणाऱ्या शेतकऱ्याला दिवाळीचं फारसं कौतुक नसतं. गावाकडं दिवाळीपेक्षा पोळा अधिक उत्साहात साजरा होतो. गावाकडं सणासुदीच्या घाईगर्दीला, लगबगीला दिवाळीपेक्षा पोळ्यालाच अधिक उधाण येतं.

दिवाळीत गावाकडच्या सगळ्याच घरांसमोर पणती आणि घरावर आकाशदिवा लावलेला असतोच असे नाही. चार सहा घरं असतातही प्रकाशाचा पाठपुरावा करणारी……… तळाहातावरचा अंधार भिरकावणारी…………  प्रकाशाला ओंजळीत घेऊ पहाणारी. 

मीही त्या चार सहा जणांमधला एक होतो. अंधाराचा कोथळा बाहेर काढून प्रकाशाची तिरीप शोधू पाहतो. 

पण बाकी सारे अंधाराची पाठराखण करणारे …………अंधारात चाचपडणारे…………… अंधाराचा श्वास घेणारे…………. अंधाराचाच उसासा टाकणारे. 

मी दिवाळीसाठी पुण्याला जाणार असतो. एकेक दिवस सरत असतो………एकेक दिवस उरत असतो. मी पुण्याला निघायची तयारी करू लागतो………… ब्याग भरू लागतो. रात्रीची वेळ असते. वीज आलेली नसते.  घरात रॉकेलच्या दिव्याचा प्रकाश असला तरी अंगणात मिट्ट काळोख असतो. घरातल्या प्रकाशची एक तिरीप दाराआडून त्या काळोखाकडे पहात असते. आणि मला दिसतो अंगणातल्या काळोखात चाचपडणारा माझा पठाण. 

मी चमकतो. मला दिसू लागतो मी उद्या मी पुण्याला गेल्यानंतर अंधारात चाचपडणारा माझा पठाण. अंधाराचा श्वास घेणारा…………… अंधाराचा उसासा टाकणारा…………. अंधाराची सोबत करणारा. आणि मी मात्र पुण्यात जाऊन प्रकाशाचा सोहळा साजरा करणार असतो. पाय जड होतात. निघावसं वाटत नाही. पण थांबणंही शक्य नसतं. अंधारातल्या पठाणकडं पहात मी वेळ ढकलत असतो. झालं आजची शेवटची रात्र. उद्या सकाळी मी निघणार. प्रकाशाचा सोहळा साजरा करायला. मी झोपू पहातो. तोंडावर पांघरून घेतो. अंधारात गुडूप होतो. 

त्या अंधारात मला दिसतो माझा पठाण. अंधारात चाचपडणारा…………… अंधाराचा श्वास घेणारा…………… अंधाराचा उसासा टाकणारा…………. अंधाराची सोबत करणारा.

मी तिरिमिरी येऊन उठतो. अंधाराचे कानेकोपरे धुंडाळू लागतो. आणि त्या अंधारातही माझ्या हाती उजेडाचा स्त्रोत लागतो.………… सांदीकोपऱ्यात ठेवलेला आकाशदिवा.…… चांदणी. एका हाता एवढया चांदणीवर चांदण्यांचीच नक्षी असलेली.

मी लगबगीनं बाहेर येतो. अंगणात टांगलेला विजेचा दिवा खाली घेतो. दिवा चांदणीत सोडून चांदणी काठीला बांधतो. काठीला बांधलेल्या चांदणीसह आकाशाकडे झेपावतो. आकाशातली चांदणी तोडून घराबाहेरच्या खुंटीला बांधावी त्या आवेशात काठी खुंटीला बांधतो. 

वीज येते. एका चांदणीतुन असंख्य चांदण्या अंगणात ओतत रहाते. मी पहात असतो अंगणभर झालेली चांदण्यांची पखरण. त्यात न्हाहून निघालेला माझा पठाण. तेच चांदणं पांघरून मी झोपतो. सकाळी उठतो. शेतातली कामं उरकतो. घरी येतो. ब्याग घेतो. विजेची बटणं चालुच ठेवतो. कुलूप लावतो. निघतो. अंगणातल्या पठाणचा चेहरा हातात घेतो. त्याला दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि त्याच्या पुढ्यात प्रकाश भिरकावून मीही प्रकाशाकडे झेपावतो.  

सर्व ब्लॉगर मित्र मैत्रिणींना, माझ्या ब्लॉगच्या तमाम वाचकांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा. आपणास हि दिवाळी तर आनंदाची,  सुख समृद्धीची , भरभराटीची जावोच पण आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवसही दिवाळी सारखाच आनंदात जावो. 


  

No comments:

Post a comment