दोन दिवसापूर्वी एका मित्राने विचारले, "सर तुम्ही १४ एप्रिलला बाबा साहेबांवर पोस्ट लिहिणार आहात का ?" मी होकार दिला असता तर मला बाबासाहेबांच्या विषयी आदर आहे अशी त्या मित्राची खात्री पटली असती. पण मी म्हणालो, "ते काही सांगू शकत नाही. कारण
लिहावे वाटल्याशिवाय मी कधीही लिहीत नाही." तरीही त्याचे पुन्हा तेच, "हो कि नाही तेवढे सांगा?" शेवटी मी "नक्की नही सांगता यायचे." असे उत्तर देऊन वेळ मारून नेली. त्यानेही फारसे ताणले नाही.
आज अनेकजण बाबासाहेबांना अभिवादन करतील. त्याविषयी पोस्ट करतील. परंतु हे ढोंग असते. मी असे काही करत नाही. मी देवाचे अस्तित्व नाकारत नाही आणि जात येता दिसल्या देवाला नमस्कार करत नाही. मी आंबेडकर जयंतीलाच नव्हे तर शिवजयंतीलाही कधी पोस्ट केली नाही आणि मी धनगर आहे म्हणून अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीलाही पोस्ट केली नाही. मनोहर पर्रीकरांचे निधन झाले आणि त्यादिवशी अगदीच उचंबळून आले म्हणून मी त्याच्याविषयी कविता लिहिली. पोस्ट केली. चांद्रयान २ हि मोहीम असफल झाली. आणि त्या संपूर्ण घटनाक्रमावर कविता आणि पोस्ट लिहिली.
परंतु याची जयंती, त्याची पुण्यतिथी, याचा वाढदिवस, त्याचे दुःखद निधन असले काही करण्याची मला कधीही गरज वाटत नाही. आणि अशा पोस्ट करणारे वर्षभर पुन्हा कधीच त्या व्यक्तीच्या आदर्शानुसार चालत नाहीत. कपाळावर चंद्रकोर लावून छत्रपतींशी नातं सांगणारे आणि शिवजयंतीला ढोल पथकात बेभान होऊन ढोल बडवणारे वर्षभरात कितीवेळा छत्रपतींचे नाव घेत असतील. या ढोल बडवणाऱ्या मंडळींना छत्रपतींचे व्याख्यान ऐका म्हटलं तर त्याला कां देण्याचे सौजन्य कितीजण दाखवतील?
मागे एका सम्यक साहित्य संमेलनाला उपस्थित होतो. एक वक्ते व्यासपीठावर व्याख्यानासाठी उभे राहिले. वक्ते पांढरपेशी. त्यांनी बाबासाहेबांचे स्मरण केले, व्यासपीठावरील सर्वांचा नामोल्लेख केला आणि श्रोत्यांना नमस्कार करून व्याख्यानाला सुरुवात करणार इतक्यात श्रोत्यांमधून काही मंडळींनी 'जयभीम करा' म्हणा मग पुढे बोला... का असे? आमच्या व्यासपीठावर येणार असाल तर जयभीम म्हणावे लागेल असा आग्रह का? बौद्ध धर्माचा सामूहिक स्वीकार करणाऱ्या बाबासाहेबांनी सांगितले का कि, "परस्परांना नमस्कार करू नका, रामराम घालू नका, जयभीम करा. मला बाप माना?"
आपली पोळी भाजण्यासाठी मागील चार सहा वर्षांपूर्वी शरद पवारांनी जसे जाई शाहू, फुले आंबेडरकरांनाची घोषणा दिली तशीच काही दलित राजकीय नेत्यांनी जयभीमचा नारा लावून धरला. परंतु शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशाचा किती लोक गांभीर्याने विचार करतात? कोरेगावच्या विजयस्तंभाच्या जत्रेला गेलो, पुणे स्टेशन येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या भोवती गर्दी केली, बाबासाहेबांच्या मिरवणुकीत सिनेमाच्या गाण्यावर तल्लीन होऊन नाचणे म्हणजे बाबासाहेबांचे स्मरण करणे नव्हे. बाबासाहेबांच्या विचारांचे अनुसरण करणारे माझी अनेक मित्र आहेत. ते कधीही कोरेगाव भीमाच्या जत्रेला जात नाहीत...पुना स्टेशनला जाऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करत नाहीत. परंतु बाबासाहेबांच्या विचारांचे ते मनापासून आचरण करतात.
कोणी या पोस्टचा काहीही अर्थ काढो. परंतु बाबासाहेब माझ्या पोस्ट मधील विचारांशी नक्कीच सहमत असतील. आणि माझ्या अभिवादनाचा ते मनापासून स्विकार करतील.
तुमच्या मताशी मी पुर्ण सहमत आहे.
ReplyDeleteअभिप्राबद्दल मनःपूर्वक धन्यवाद सर.
Delete