जगातला सगळ्यात ' प्राईम सब्जेक्ट ' कोणता असेल तर आई. काय दुर्दैव आहे पहा ! मी स्वतःला मराठी म्हणवतो आणि लिहायला सुरवात केल्यानंतर आधी ' प्राईम
सब्जेक्ट ' ला ' प्राधान्य विषय ' हा प्रती शब्द आठवत नव्हता. म्हणून आधी प्राईम
सब्जेक्ट असा शब्दप्रयोग केला होता. आज ' मदर्स डे ' नाही पण आईविषयी लिहायला दिवस कशाला हवा !
कोणत्याही जीवाचा जन्म आईमुळे
वडिलांमुळे ? किंवा कोणत्याही जीवाच्या जन्मात महत्वाची भूमिका कुणाची ?
नराची कि मादीची ? या प्रश्नावर खल करणं म्हणजे अंड आधी कि कोंबडी आधी ?
या प्रश्नावर खल केल्यासारखं आहे. पण स्त्रीनं मुल जन्माला घालणं, त्याला
पदराखाली घेणं, त्याला माया लावणं, त्याला चिऊ - काऊच्या गोष्टी सांगत
त्याच्यावर संस्कार करणं या गोष्टी स्वाभाविक आहेत. स्त्री काय किंवा पुरुष
काय आपल्या मुलाची सर्वांगीण प्रगती व्हावी.......त्याच्यावर चांगले
संस्कार व्हावेत म्हणून धडपडत असतात. ते स्वाभाविक नव्हे तर गरजेचं आहे.
कारण कुणी कितीही नाकारलं तरी आपण आपल्या मुलांकडे भविष्य काळातील आधार
म्हणून पाहत असतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे. प्रत्येक आई वडिलांना
म्हातारपणी त्याच्या मुलांकडून आधार मिळतोच असं नाही. पण रोप
लावताना......... त्याला पाणी घालताना उद्या फळं मिळणार आहेत हि जाणीव
प्रत्येकालाच असते ना ! बाभळीला नाही कधी कुणी पाणी घालीत.
पण पशु पक्षांमधली मादी आई म्हणू ज्यारितीने आपल्या बाळाचं संगोपन करते ते पाहिलं कि अचंबित व्हायला होतं.
झालं
काय. गावी माझ्या गड्यांनी कोंबड्या पाळल्यात. पाळल्यात म्हणजे काय तर
दोघांनी एक एक कोंबडी घेतली. वीसएक अंडी घेतली. कोंबड्या त्या अंड्यांवर
बसवली. एकवीस दिवस अन्नपाणी........हिंडण फिरणं सोडून कोंबड्या त्या
अंड्यावर बसून राहिल्या. हळूहळू पिलं अंड्यातून बाहेर आली. दोन्ही कोंबड्या
त्यांची त्यांची पिल्लावळं घेवून अंगणातून स्वतंत्रपणे हिंडू लागल्या.
कावळा दिसला कि जीवाच्या आकांतानं त्याच्यावर धावून जायच्या. उन्हातान्हात
पिलांना पंखाखाली घेवून बसायच्या. दोन्ही कोंबड्यांना दुसरीचं पिलू
आपल्याजवळ आलेलं खपायचं नाही. आपल्याजवळ येवून किडूकमिडूक टिपू पहाणाऱ्या
दुसरीच्या पिलाला त्या चोच मारून हुसकावून लावायच्या.
दोघींचे डाले (
रात्री कोंबड्या झाकून ठेवायचं साधन. त्यालाच झापही म्हणतात. ) दोन
स्वतंत्र ठिकाणी ठेवलेले असायचे. दिवस कलला.........सूर्यप्रकाश मंद झाला
कि दोघी आपापल्या पिलांना घेवून आपापल्या झापाखाली जायच्या.
पिलं
लहानच होती. पंधरावीस दिवसांची. नेहमीप्रमाणे कोंबडी सकाळच्या कोवळ्या
उन्हात न्हात बसली होती. तिची पिलं तिच्या अवती भवतीच होती. दोन तीन पिलं
तिच्या अंगावर चढली. कोंबडी तुसभरही हलली नाही. ती तशीच डोळे मिटून पडून
राहिली. आणि मी तो क्षण कॉमेरयात टिपून घेतला. कारण माझ्या डोळ्यासमोर दिसत
होती मला अंगाखांद्यावर खेळवणारी माझी आई.
दिवस श्रावणाचे. रिमझिम
पावसाचे. कधीही सर यायची. एक दिवस सकाळपासूनच भूर भूर सुरु होती. चार सहा
मिनिटं पाऊस.......तासभर उन पडायचं.......पुन्हा पाऊस यायचं असा उन्हा
पावसाचा लपंडाव सुरु होता. आम्ही सारेच टिव्ही पहात घरात बसलो होतो.
दुपारचे बारा एक वाजले होते. गारवठलेल्या उन्हातच पावसाची मुळमुळ सुरु
होती. मी सहज अंगणात डोकावलं. आमच्या वाड्याला चार दरवाजे. पावसापासून बचाव
व्हावा म्हणून कोंबडी आमच्या शेजारच्या बंद दारात दबा धरून बसली होती.
पिलं मात्र कुठंच दिसत नव्हती. पिलं कुठ गेली ? असा प्रश्न मला पडला होता.
मी बाहेर आलो. कोंबडीच्या जवळ गेलो. तेवढ्यात कोंबडीच्या मानेजवळच्या
पिसातून बाहेर डोकावणारं एका पिलाचं लुसलुशीत डोकं मला दिसलं. माझी चाहूल
लागल्यामुळे कोंबडीनं थोडी चुळबुळ केली. आणि आणखी एक पिलू कोंबडीच्या
पोटाखालच्या पिसातून डोकावलं. आणि माझ्या लक्षात आलं कि पिलांना पाऊस लागू
नये म्हणून कोंबडी सगळ्या पिलांना पंखाखाली घेवून बसली होती. आठ दहा
पिलांना पंखाखाली सामावून घेताना कोंबडीला अंग किती फुगवाव लागलं असेल ?
याची आपण कल्पनाही करू शकता नाही. मी तोही क्षण कॉमेरयात टिपून घेतला. कारण
मला दिसत होती मला ऊन लागू नये म्हणून माझ्यावर पदर धरणारी माझी आई. मला
सर्दी लागू नये म्हणून पावसात चिबं झालेलं माझं डोकं अंगावरच्या साडीच्या
पदरानं कोरडं करणारी माझी आई.
एकदिवस दुपारी आम्ही सारे रानात गेलो
होतो. नेहेमीप्रमाणे कोंबडी पिलांसकट मोकळीच होती. दुपारी काहीतरी कामासाठी
मी घरी आलो होतो. एक कोंबडी तिच्या पिलानसह पायांनी उकिरड्यावरचं शेण
फिस्कारून पिलांना किडूक मिडूक दाखवून देत होती. पिलाही आपल्या इवल्या
इवल्या चोचीन शिताफीनं ते किडूकमिडूक टिपत होती. पण दुसरी कोंबडी मात्र
कुठं दिसत नव्हती. मी घराच्या मागे गेलो. कोंबडी निवांत बसली होती. सगळी
पिलं तिला बिलगली होती. मला काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. माझी चाहूल
लागताच कोंबडी उठली जड पावलं टाकत निघाली. तिच्या मागोमाग तिची पिलही. आणि
मी पाहिलं एक पिलू कमी होतं बहुधा कावळ्यानं उचलून नेलं होतं. आणि कोंबडी
पिलांना घेवून तिथ बसून शोक करत बसली होती. तेव्हा मला आठवली मी नजरेआड होताच कावरीबावरी होणारी माझी आई.
हे सारं करीत असताना त्या
कोंबड्यांना या पिलांचा बाप कोण ? जो कोणी असेल तो जर या पिलांसाठी काहीच
करीत नसेल तर आपणच या पिलांना का पोसायचं ? असा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर
मला कधीच दिसला नाही. आपापल्या पिलांचा त्यांनी कोणत्याही परीस्थित कधीही
रागराग केल्याचंही मी पाहिलं नाही. आज पिलं दीड दोन महिन्याची झालीत तरीही
त्या पिलांना आपल्यासोबत घेवून फिरत असतात.
कोंबडीला कुठलेच प्रश्न
पडले नव्हते पण मला मात्र अनेक प्रश्न पडले होते. वेगवेगळ्या कोंबड्यांची
अंडी कोबडी उबवतेच कशी ? या पंधरावीस अंड्यांपैकी
चारसहा अंडी आपली नसावीत याची जाणीव त्या कोंबडीला नसेल का ? वेगवेगळ्या
कोंबड्याच्या अंड्यातून बाहेर आलेली पिलं ती आपलीच कशी मानते ? दुसऱ्या
कोंबडीच्या आणि आपल्या पिलातला फरक ती कसा ओळखते ? पिलांना तरी आपली आई
आणि आपली भावंड कशी ओळखता येतात ? हे खा ते खाऊ नका हे कोंबडी तिच्या पिलांना कसं सांगत असेल ? माझी आई थोर आहेच पण हि आईसुद्धा थोर नव्हे काय ?
लेख खुपच छान झालाय. पशु - पक्षीही स्वार्थी असतात. पण माणसांएवढे नाही.
ReplyDeleteश्रेयस, जे जे चांगलं ते ते घ्यावं यासाठीच परमेश्वरानं आपल्या भोवती निसर्ग निर्माण केलाय. पण निसर्गाकडून घेतानाही आपल्या स्वार्थी वृत्तीमुळे आपण निसर्गाचा केवळ ऱ्हास करत आलोय.
ReplyDeleteaaiwishayi anekani lihilay pan aapan jya aaiwishyi lihilat te apratim.
ReplyDeleteआभार मित्रा.
Delete