Friday, 28 June 2019

दुहेरी समाधान

खरंतर वारीचा वारकरी व्हावं. पंढरीला एकदातरी चालत जावं अशी फार मोठी मनीषा होतं. पण देवाच्या भुकेपेक्षा पोटाची भूक मोठी असावी. नौकरी, घर, संसार, मुलांचं भवितव्य यातच गुरफटलो. वारी नाहीच झाली. अर्थात वारीला गेलो तरच पांडुरंग भेटतो असा भाव नाही माझी. वारीला जायचं होतं ते आंतरिक समाधानासाठी. एक अनुभव गाठीशी असावा म्हणून. तसा पांडुरंग प्रत्येक माणसाच्या चांगल्या कर्मात असतोच. पण आपलं कर्म चांगलं कि वाईट हे आपण नाही ठरवावं.


संजय शेंडगे माझे बंधू. त्यांनी वीस बावीस वर्षांपूर्वी वारकऱ्यांना पिठलं भाकरी वाटप करण्याचा वसा घेतला. आणि पांडुरंगाने दरवर्षी तो वसा पेलण्याचं बळ दिलं. मी दरवर्षी नाही उपस्थित राहू शकत. पण यावर्षी आवर्जून उपस्थित राहिलो. माझे बंधू ज्ञानराज विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक संचालक. अर्थात हे आज. जेव्हा हा वसा घेतला तेव्हा ते आमचं कुटुंब एका दहा बाय दहाच्या खोलीत रहात होतं. आज बहीण आशा शेंडगे धायगुडे हि नगरसेवक देखील आहे. थोडी सुबत्ता आली घरात. पण आजही आपण त्या विठूमाऊलीच्या पायतळीची विट आहोत याची जाणीव आहे आम्हा प्रत्येकाला.

शाळेतली मुलं प्रत्येकजण आपापल्या घरातून पाच-पाच भाकऱ्या चपात्या यातील जे शक्य ते घेऊन येतात.
सकाळी सात वाजता हजारो भाकरी, चपात्या तयार होत्या. त्या गाडीतून वाटपस्थळी आणण्यात आल्या. तिथेच एका बाजूला पिठलं रटरटत होतं. वारकऱ्यांचा ओघ सुरु झाला. वाटप सुरु झालं. पण आमचं नियोजन अत्यंत शिस्तबद्ध असतं. झुंबड उडत नाही. गर्दी होत नाही. वारकरी रांगेत येतात. हातात पिठलं भाकरी घेऊन पुढे जातात. शाळेचं अनेक विद्यार्थी तिथे हजर असतात. सगळेच विद्यार्थी आळीपाळीने वारकऱ्यांना पिठलं भाकरीचं वाटप करत असतात. आम्हाला दुहेरी समाधान. वारकऱ्यांना अन्नदान होत असल्याचं आणि विद्यार्थ्यांवर संस्कार होत असल्याचं.

No comments:

Post a Comment