Friday 7 June 2019

घंटेवरले फुलपाखरू : प्रकाशनाची हायकूमय संध्याकाळ

जे जे चांगलं त्याविषयी लिहावं अशी माझी भूमिका असते. आजवर मी कायम साहित्यवर्तुळाच्या परिघाबाहेर राहिलो. त्याला अनेक कारणं होती. त्याविषयी इथे बोलणं उचित होणार नाही. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून मी या परिघातला एक बिंदू होण्याचा प्रयत्न करतो आहे. केंद्रबिंदू वगैरे नाही बरं का ! वर्तुळाच्या अवकाशात असतो कुठेतरी मी. अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहिलो. अनेक पुस्तकांच्या प्रकाशनाला उपस्थित राहिलो. श्रीपाल सबनीस, ह्रद्यनाथ मंगेशकर, अरुणा ढेरे अशा मात्तबर व्यक्त्यांनी मांडलेले विचार ऐकले. काव्यसंग्रहाचं प्रकाशन म्हटलं कि
निमंत्रित कवींचं संमेलन असतंच. कारण गर्दी जमायला ते सोयीचं असतं. कथासंग्रहाच्या प्रकाशनात एक दोन कथांचं वाचन असतं. कादंबरीच्या प्रकाशनाला एखादा परिच्छेद वाचला जातो. चार पाच प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, सूत्रसंचालक. वक्त्यांची भाषणं असा भरगच्च कार्यक्रम असतो.

पण आज घंटेवरले फुलपाखरू या विजय पाडळकर यांनी अनुवादित केलेल्या जपानी हायकू संग्रहाच्या प्रकाशनाला उपस्थित होतो. खास निमंत्रण नव्हतं मला. तसंही देव कधी निमंत्रण देतो आपल्याला देवळात या म्हणून. पण जातोच ना आपण. तसाच मीही गेलो होतो. अगदी अनाहूतपणे. तसा मीही जातो. आज तिथे डोकवायला विशेष असं कारणही होतं. माझा मित्र धनंजय तडवळकर सूत्रसंचालन करणार होता. पोहचलो तिथं. अंमळ उशीरच झाला होता. पण फार नाही हा !

मी पोहचलो तेव्हा धनंजय डेस्कवर होता. अरुणाताई अध्यक्षस्थानी विराजमान झालेल्या होत्या. बैठक व्यवस्थेच्या एका बाजूला प्रकाशक अभिजित वाळिंबे आणि दुसऱ्या बाजूला पर्यावरण तज्ञ संतोष शिंत्रे स्थानापन्न झाले होते. अरुणाताईंच्या उजव्या हाताला लेखक विजय पाडळकर आणि डाव्या हाताला मुखपृष्ठकार नयन बाराहाते होते. सुरवातीला प्रकाशकांनी त्यांचे भूमिका मांडली. मग विजय पाडळकरांनी घंटेवरल्या फुलपाखरात त्यांची जी मानसिक गुंतवणूक झाली होती ती कथन केली. बाशो, योसा बोसॉ आणि इस्सा तीन जपानी कवींच्या हायकूंचा अनुवाद म्हणजे घंटेवरलं फुलपाखरू. पाच पन्नास नव्हे तर ५०० हायकूंचा  समावेश आहे या संग्रहात. अमेरिकेतल्या तीन वर्षातल्या वास्तव्यात आकाराला आलेलं हे पुस्तक. लेखकाला जपानी येत नव्हती म्हणून मूळ हायकूंचं इंग्रजी भाषांतर शोधलं. आणि त्यांचा संदर्भ घेत ‘घंटेवरले फुलपाखरू’ आकाराला आले.

त्यानंतर मुखपृष्ठकार नयन बाराहाते यांनी त्यांचे विचार मांडले. खरेतर आजवर कुठल्याही पुस्तक प्रकाशनाला मुखपृष्ठकर उपस्थित असल्याचे मी पाहिले नाही. परंतु नयन केवळ उपस्थित नव्हता तर पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेत तो किती गुंतला होता त्या विषयी सांगत होता. रंगसंगती अशीच का निवडली? मुखपृष्ठावरील घटकांचं प्रमाण असंच का घेतलं? पुस्तकाची मांडणी अशीच का? लेखकाशी काय आणि कशी चर्चा केली? लेखकाचं नाव उभंच का घेतलं? पुस्तकाचं शीर्षक ज्या रितीने लिहलं आहे ते ऐकलं तेव्हा तर मी अधिक अचंबित झालो. नयन सांगत होता, “जपानी लिपी ज्या रितीने लिहिली जाते त्या वळणाची हि अक्षरे आहेत.”तो हे सगळं सांगत होता आणि मुखपृष्ठकाराची पुस्तकातली मानसिक गुंतवणूक पाहून मी अचंबित होत होतो. मुखपृष्ठ म्हणजे केवळ एक रंगीबेरंगी कव्हर असत नाही. तर ते शब्दरूप असतं आतील शब्दाचं याची जाणीव होत होती.     

त्यानंतर संतोष शिंत्रे यांनी जपानी संस्कृतीचे, हिरोशिमा नागासाकीतील अणुस्फोटाचे संदर्भ देत विचार मांडले. आणि त्यानंतर अध्यक्षीय भाषणासाठी अरुणाताई उभ्या राहिल्या. शिरीष पै पासून शांताताई शेळके यांच्यापर्यंत अनेकांच्या हायकूंचे संदर्भ देत त्यांनी विचार मांडले. अत्यंत मार्दवी, मृदू आवाजातलं वक्तव्य कानात साठवावं असं वाटत होतं. जवळजवळ चाळीसेक मिनिटांचं त्यांचं भाषण. पण कंटाळवाणं वाटलं नाही. संदर्भहीन वाटलं नाही.

त्यांचंच नव्हे तर आरंभापासून अंतापर्यंत संपूर्ण सोहळा म्हणजे एक एकजीव प्रवाह होता हायकूंचा. धनंजयच्या सूत्रसंचालनात त्याने अनेक हायकूंचे संदर्भ दिलेच. परंतु प्रत्येक वक्त्याच्या भाषणात हायकूची रेलचेल होती. प्रदीप निफाडकर, रमण रणदिवे, नितीन हिरवे असे अनेक मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. आभार प्रदर्शन करताना धनंजयने माझ्यासह इतरही अनेक मान्यवरांचा आवर्जून उल्लेख केला.

एकमात्र उणीव राहिली कार्यक्रमात ती म्हणजे अत्यंत सूत्रबद्ध सूत्रसंचालन करणाऱ्या कवी धनंजयचा सत्कार तर नाहीच पण साधा नामोल्लेख करण्याचेही भान आयोजकांना राहिले नाही. कसा विसर पडला आयोजकांना कुणास ठाऊक? धनंजयनं सूत्रसंचालनाची जबाबदारी घेतली आणि अत्यंत अप्रतिमरीत्या पार पाडली. सगळ्यांचे आभार मानले. आयोजक विसरले असतील पण उपस्थित श्रोत्यांनी मात्र धनंजयच भरभरून कौतुक केलं. आयोजकांनी धनंजयच कौतुक न करणं हे त्या सोहळ्याला लागलेलं गालबोट होतं. पण एकूण सोहळ्याला दृष्ट लागू नये म्हणून नियतीने मुद्दाम तेवढी उणीव ठेवली असावी असं वाटलं मला.

No comments:

Post a Comment