Monday 25 August 2014

Gender Gap : गडी पुढे , बाया मागे

झालं काय परवा आमचे एक चुलत बंधू वारले. अचानक. हृदय विकाराच्या झटक्याने. ध्यानीमनी नसताना. वय ५८ च्या आसपास. मागे दोन विवाहित मुलं. विवाहित मुलगी. पत्नी. असा गोतावळा.

घटना घडली पुण्यात. आम्ही गावी. भावकीच्या चार गाड्या भरल्या. गावाहून पुण्यास यायला निघालो. दुःखद घटना घडूनही गप्पांना उधान आलं होतं. उधाणाचा सूर मात्र मरणाभोवती घोंगावणारा.

“च्यायला, आपल्या बेटात ( म्हणजे आमच्या आजोबांच्या वंशावळीत ) सगळे गडीच पुढं चाललेत आणि बाया माघं राहत्यात. काही तरी बघायला पायजे.” आमचा एक चुलत भाऊ.  
  


" खरंच न्हाय तर काय. मागच्या पिढीत म्हंजी आपल्या वडलांच्या पिढीत बघा……….  दादा गेलं…. त्यांच्या दोन्ही बायका मागं, तात्या गेलं ……. ताई मागं, आप्पा गेलं……कोंडाताई मागं, आण्णा गेलं ……….  जनाताई मागं."

" व्हयना खालच्या बेटात ( म्हणजे आमच्या चुलत आजोबांच्या ) तसं नाय होत."

" आन आपल्या पिढीत बी बघाना आशा ( अशोक ) गेला…… चंद्राबाई मागं, काशिनाथ गेला……विमलबाई मागं, आता भाऊसाहेब गेलं आन त्याची बायको मागं."

" आयला खरंच रं. काय तरी बघाय पायजे.” 
आमच्या भावजयाही गाडीत होत्या. आमची चर्चा त्या ऐकत होत्या. आमच्या चर्चेवर त्यातलीच एक म्हणाली, ” व्हय व्हय. खरंच बघा काय तरी आन आमाला घालवा पुढं आन तुमी राव्हा मागं.

यातला बराचसा भाग विनोदाचा होता. पण वस्तुस्थिती खरी होती.

स्त्रियांचं आयुष्यमान वाढतंय. आपला नवरा पुढं जावा आणि आपण मागं राहून मजा करावी असा कुठल्याच स्त्रीला वाटत नसेल. पण स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचं आयुष्यमान दिवसेंदिवस कमी होतंय ही वस्तुस्थिती आहे. मी एक दिवस सहज म्हणून वेगवेगळ्या देशातल्या विविध वयोगटातल्या स्त्रियांचं प्रती हजारी पुरुषांशी प्रमाण पाहिलं. तेव्हा असा दिसून आलं कि ० ते ४५ या वयोगटात प्रती हजारी पुरुषाशी स्त्रियांचं प्रमाण कमी आहे परंतु पन्नास वर्षापुढील वयोगटात मात्र पुरुष कमी आणि स्त्रिया अधिक आहेत.

स्त्रियांचं आयुष्य कमी व्हावं आणि पुरुषांचं वाढावं असं माझं मत नाही.

पण असं का होतंय हा संशोधनाचा आणि  विषय आहे हे मात्र नक्की. काम नको आराम हवा असं प्रत्येकालाच वाटतं. अधिक काम केलं तर शारीरिक झीज मोठ्या प्रमाणात होते असं माणसांचं सर्वसाधारण मत आहे. स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक कष्ट घेतात. वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षापासून स्त्री घरकामात लक्ष घालते. ते अगदी सुना आल्यातरी तिची त्या रगाड्यातून फारशी सुटका होत नाही. मग तरीही स्त्रियांचं आयुष्यमान अधिक कसं ? पुरुषांचं आयुष्यमान कमी का ? असं होण्याला कारणं काय ? पुरुषांची जीवनशैली ? पुरुषांची व्यसनाधीनता ? कि पुरुष दिसू देत नसलेली पण त्यांना पोखरणारी चिंता ?  

10 comments:

  1. मला वाटतं पुरुषांच्या व्यसनाधीनतेमुळे त्यांचं आयुष्यमान कमी असावं.

    ReplyDelete
  2. प्रथमेश पाटील2 September 2014 at 15:20

    लेख आवडला. शेवटचं चित्रही खुप समर्पक आहे.

    ReplyDelete
  3. प्रथमेश पाटील2 September 2014 at 15:20

    लेख आवडला. शेवटचं चित्रही खुप समर्पक आहे.

    ReplyDelete
  4. पुरुषांची व्यसनाधीनता हे एक कारण असू शकेल. पण अधिक संशोधन व्हायला हवं.

    ReplyDelete
  5. प्रथमेश प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. आता तुमच्यासारख्या रसिक वाचकांचं प्रेमच मला लिखाणासाठी प्रोत्साहन देतं.

    ReplyDelete
  6. प्रथमेश प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.

    ReplyDelete
  7. kharach lhan wyatil stri purush prmanacha wichar jsa aapn krto tsach tumhi mhtay ya wyatil prmanachahi wichar krayla hwa.

    ReplyDelete
  8. kharach lhan wyatil stri purush prmanacha wichar jsa aapn krto tsach tumhi mhtay ya wyatil prmanachahi wichar krayla hwa.

    ReplyDelete
  9. तृप्ती प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. लहान वयातील स्त्री पुरुष प्रमाणाचा जसा गांभीर्यानं विचार होतोय तसा याही वयातील स्त्री पुरुष प्रमाणाचा विचार नक्कीच होईल. पण या संदर्भात पुरुषांनीच आत्मपरीक्षण करायला हवं .

    ReplyDelete
  10. तृप्ती प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.

    ReplyDelete