Wednesday, 19 August 2015

वाघ परवडला पण .......

राज ठाकरेंच्या घरच्या कुत्र्याने त्यांच्या पत्नीचा चेहरा फाडला. आणि त्यांच्या चेहऱ्यावर चार सहा नव्हे तब्बल पासष्ठ टाके पडले हि बातमी पाहून खरे तर वाईट वाटले. पण यातून आपण साऱ्यांनी काहीतरी बोध घ्यायला हवा. काय असला पाहिजे तो बोध ? जाणून घ्यायचं आहे तर वाचा हि कथा -


मुंबई नगरीचा एक राजा होता. त्याचं नाव होतं राज. त्यांन स्वतःच आपल्या डोक्यावर मुकुट धारण केला होता. हिंदुंचा , मावळ्यांचा कि मुंबई महानगरीतल्या रयतेचा ? तो कोणाचा राजा होता हे त्यालाही सांगता येत नव्हते. परतू नावात राज असल्यामुळे मला तमाम जनतेवर राज्य करण्याचा पूर्ण आणि जन्मसिद्ध अधिकार आहे असे तो मानात असे.

त्याच्या दरबारी मंत्री संत्री नव्हते. त्याच्या प्राणी शाळेत हत्ती घोडे नव्हते. त्याच्या राज्याच्या जंगलात वाघांचीसुद्धा वानवा होती. पण त्याच्या माजघरात अनेक कुत्रे होते. ' पग ' का ' बग ' , ' जर्मन शेफर्ड ' आणि इतर बऱ्याच जातीचे कुत्रे त्यांच्या माजघरी होते. जाती वेगवेगळ्या असल्या तरी ' कुत्रे ' हे सर्वनाम त्या सगळ्यांना लागू होते.

मंत्र्यां - संत्र्यांचा , आम जनतेचा वावर या राजाभोवती नसला तरी या पायलीच्या पन्नास कुत्र्यांचा वावर त्यांच्या अवती भोवती नेहमी असे. त्यांना आंजारत गोंजारत ' हिच माझी खरी प्रजा, हिच माझी खरी रयत ' असं राजा कौतुकानं म्हणत असे.

जनतेची नव्हे तेवढी या कुत्र्यांची राजाशी लगट असे. हि कुत्री कैक वेळा दोन पायावर उभी रहात असत. राजाच्या छातीवर पाय देत असत. पण प्रजेने मात्र खांद्यावर हात ठेवलेलाही त्यास रुचत. राजाही प्रेमाने त्यांचे कान धरून त्यांना कुरवाळीत असे. आजुबाजुचे भाट लगेच त्या गोष्टीची चित्रफित तयार करत असत आणि राज्यभर दौंडी पिटवून ती चित्रफित दाखवीत असत.

कोणे एके काळी होऊन गेलेल्या शिवाजी राज्यांचा ' हर हर S S SS S S महादेव ' हा मंत्र होता. तर या राजाचा मात्र केवळ ' खळ S S S ळ ..........खटयाक ' हा एकच मंत्र होता. हा राजा शत्रूला विरोधकांना कधीही युद्धाचे आव्हान देत नसे. तर  केवळ ' खळ S S S ळ ..........खटयाक ' या मंत्राचे भय दाखवत असे.

त्याच राजाच्या राज्यात एक जंगल होते. त्या जंगलात प्रकाश नावाचा एक इसम रहात असे. तो आणि त्याची पत्नी जंगलात राहून गोर गरिबांची सेवा करीत असत. गरिबांशी आणि दिन दुबळ्यांशी अत्यंत प्रेमाने वागत असत.

त्याने आपल्या घरी वाघ आणि सर्प पाळले होते. तो त्या प्राण्यांचीही सेवा करीत असे. त्यांची काळजी घेई.
त्यांना पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळी.  त्या इसमाची पोरेसोरे कुठलीही भीती न बाळगता त्या वाघाशी आणि सर्पाशी खेळत असत.

पण केवळ मांस भक्षक असलेल्या वाघानेसुद्धा त्या इसमाच्या पोरासोरांना साधा ओरखडा काढल्याचे कुणाच्या ऐकिवात नव्हते.

आणि तिकडे राजदरबारी चक्क राजाच्या कुत्र्याने राणीवर हल्ला केला होता.    

बोध : माणसांची बेईमानी इमानदार प्राण्यांच्या लक्षात येऊ लागली आहे.             


 


10 comments:

  1. सुवर्णा तांबे20 August 2015 at 20:15

    खुसखुशीत.

    ReplyDelete
  2. राजू गावडे21 August 2015 at 06:48

    प्रकाश आमटे आणि राज ठाकरे यांची अप्रत्यक्ष उदाहरणे देत मस्त गोष्ट लिहिलीत.

    ReplyDelete
  3. Replies
    1. आभार चिंतामणीजी.

      Delete
  4. लिहित रहा लिहित रहा लिहित रहा मस्तच लिहताय लिहित रहा

    ReplyDelete
  5. chan lihilay.

    ReplyDelete
    Replies
    1. केतनजी अभिप्रयाबद्दल मनापासून आभार.

      Delete