Sunday, 9 August 2015

Love Poem : प्रेम खरंच करू नये

प्रेमाला वय नसतं आणि प्रेमाविषयी लिहिण्यालाही. म्हणुनच


' प्रेम म्हणजे , प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं, आमचं साऱ्यांच
सेम असतं. '

यासारखी सदाबहार कविता मंगेश पाडगावकरांच्या लेखणीतुन आयुष्याच्या मध्यान्हीला उतरते.

मीच माझ्या काही लेखांमध्ये प्रेमाला ईश्वर मानलं आहे. प्रेमाशिवाय आयुष्य रंगहीन असल्याचं म्हटलं आहे.
माझा प्रेमावर दृढ विश्वास आहे. प्रेम माणसाला नेहमीच तारतं, मारत मात्र कधीच नाही अशी माझी धारणा आहे. प्रेम म्हणजे माणसाला स्वप्नांच्या प्रदेशात घेऊन जाणारी पाऊल वाट अशी माझी श्रद्धा आहे. आणि तरीही आज मीच ' प्रेम खरंच करू नये ' अशी कविता लिहितो आहे.

सर्वसामान्यपणे कविता काल्पनिक असतात समज दृढ आहे. पण हे सत्य नाही. मी शंभर टक्के नाही म्हणणार पण ऐंशी टक्के कविता कुठेतरी ठिणगी पडल्याशिवाय जन्माला येत नाहीत हे वास्तव आहे.

या कवितेचेही असेच झाले.

परवा एका बारमध्ये बसलो होतो. माझ्या आधी एका कोपऱ्यात दोन तरूण बसले होते. एक एक पेग झाला असावा त्यांचा. रंगात आले होते. एक तरून दुसऱ्याला सांगत होता, " यार नुकतीच ओळख झाली होती. आमच्या Whats App ग्रुपमध्ये होती. मोठा ग्रुप होता आमचा. नावही माहित नव्हतं मला तिचं. प्रत्यक्ष पाहिलंही नव्हतं . माझ्या WhatsApp वर मेसज आला होता तिचा. मी सहज तिचा DP पाहिला. बहुदा तो तिचा खरा फोटो असावा. खुप सालस वाटली. प्रेमातच पडलो. मी तिला स्वतंत्रपणे मेसेज पाठवला. तिनं उत्तर दिलं. कोणाचा नंबर आहे असं विचारल्यानंतर नाव सांगितलं. आमच्या ग्रुपमधल्या कुणाच्यातरी मैत्रिणीची मैत्रिण होती. chating सुरु झालं. तासनतास. च्याटिंग सुरु असताना दोन चार मिनिटं तिचं उत्तर आलं नाही तरी माझ्या काळजाचा ठोका चुकायचा.

तीही छान बोलत होती माझ्याशी. कुठे रहातोस ? काय करतोस ? सर्व्हिसला कुठे ? घरी कोण कोण असतं ? अशी सगळी चौकशी केली तिनं माझी. तीसुद्धा कुठे रहाते ? काय करते ? सारं सांगितलं. ती सर्व्हिसला असल्याचंही सांगितलं तिनं मला. एकदा तर सर तिनं मला एक इमेज टयाग केली. परस्परांना अलिंगन देऊ पहाणाऱ्या प्रियकर प्रेयसीची प्रतिमा असणाऱ्या ढगांची. आम्ही पागल ना यार . वहातच गेलो. मी तिच्या प्रेमात पडल्याचं तिला सांगितलं.

ती म्हणाली , " प्रत्यक्ष न पहाता. "
मी म्हणालो , " मी तुझा DP पाहिला आहे. खुप स्विट. "

तिला काय वाटलं कुणास ठाऊक. पण माझ्या दहा मेसेज नंतर तिचा एखादा मेसेज येऊ लागला. मी खुप कासावीस होऊ लागलो. माझा एक एक मेसेज म्हणजे एक एक पत्रच असायचं. ती मात्र एखाद्या शब्दात माझी बोळवण करायची. आणि मी कासावीस व्हायचो. माझं मन मोकळं करण्यासाठी आणखी मोठी पत्रं लिहायचो. मी तिच्यात पुर्ण गुंतत चाललो होतो. आणि एक दिवस तिचा मेसेज आला , " मला तुझी किळस येतेय. "

" मी मोडुन पडलो यार " त्यानं दुसरा पेग एका दमात रिचवला. तिला किळस यावी असं काहीच केलं नव्हतं मी. पण तिच्याशी खुप बोलावसं वाटायचं. कधीतरी भेटू असाही विश्वास वाटायचा. पण कसलं काय ? भेट नाही आणि बीट नाही. फुलं लागण्याआधीच तिनं माझ्या प्रेमाचा वेल उपटुन टाकला.
                                              
" अशा कशा वागतात रे या  "

ते पुराण पुढे बराच वेळ चालू होते. पण मी माझ्या ग्लासात रमलो होतो. खरंच काय चुकले होते त्या तरुणाचे. त्या मुलीने प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्याला नकार दिला असता तर मी समजू शकलो असतो. पण काहीही जाणुन न घेता तिनं ज्या शब्दात त्याला झिडकारल ते चुकीचंच होतं. तिच्या भावना तिनं अधिक चांगल्या शब्दात व्यक्त केल्या असता तर तो तरून असा पुरता खचला नसता.

मला वाटले हा माझ्यासारखाच शब्दात, कल्पनेत रमणारा हळव्या मनाचा असावा. आणि ती मात्र पायापुरतं पहाणारी.

पण या सगळ्यामुळे माझ्या मनात मात्र कवितेचा अंकुर आकाराला आला होता. त्या अंकुराची हि कविता -   

प्रेम खरंच करू नये

प्रेम खरंच करू नये
कुणासाठी झुरू नये
सावलीमागे आपण आपल्या
मुळीसुद्धा फिरू नये………१

हाती काहीच लागत नाही
त्रास मात्र खुप होतो
कळत नाही कोणत्या क्षणी
आयुष्याचा धुप होतो
जाळ्यात आपण प्रेमाच्या
कधी सुद्धा शिरू नये
प्रेम खरंच करू नये ………२

पंख असल्यासारखे आपण
हवेवरती तरत असतो
तिच्या गोड शब्दांसाठी
रात्रंदिवस झुरत असतो
कुणासाठी काळीज कधी
हातावरती धरू नये
प्रेम खरंच करू नये ……३

झोकून देतो हवेमध्ये
आभाळ घेतो कवेमध्ये
ती मात्र नसते कधीच
बुडणाऱ्या नावेमध्ये
पोहता येत नसेल तर
समुद्रात तरू नये
प्रेम खरंच करू नये ……४

तिच्यासाठी रात्रंदिवस
आपला जीव जागा असतो
प्रेम म्हणजे कधी तरी
फुटणारा फुगा असतो
फुटणाऱ्या फुग्यामध्ये
हवा कधीच भरू नये
प्रेम खरंच करू नये ………५

राजमार्ग असला तरी
ठेचा असतात वाटेला
फुल जरी असले तरी
काटे असतात देठाला
काटा कधी टोचणार नाही
असा विश्वास धरू नये
प्रेम खरंच करू नये ………६

               - विजय शेंडगे , पुणे




12 comments:

  1. एकदम छान! पाडगावकरांच्या कवितेची आठवण येत राहिली. "कुणासाठी काळीज कधी हातावर धरु नये" या ओळी विशेष आवडल्या. लिहीत राहा ...
    वेळ काळ विसरुन जातो, नेट पॅक वाढवून घेत जातो, तिच्या चार शब्दांसाठी, मेसेजेस ची रीघ लावतो, व्हॉट्सप वर तिने, थोडे छान उत्तर दिले.. प्रेमाच्या आभासात लगेच, गहिरं विरघळून जाऊ नये.....प्रेम खरंच करु नये!
    :-)

    ReplyDelete
    Replies
    1. खुप दिवसानंतर अत्यंत उत्साहीत करणारी आपली प्रतिक्रिया मिळाला. खुप खुप आभार.
      ( वेळ काळ विसरुन जातो,
      नेट पॅक वाढवून घेत जातो,
      तिच्या चार शब्दांसाठी,
      मेसेजेस ची रीघ लावतो,
      व्हॉट्सप वर तिने,
      थोडे छान उत्तर दिले..
      प्रेमाच्या आभासात लगेच,
      गहिरं विरघळून जाऊ नये.....प्रेम खरंच करु नये!
      या ओळी आपल्या का ? )

      Delete
    2. हो...अर्थातच! :-)
      तुम्ही माझ्या लिहीण्याची नेहमी चौकशी करता त्याबद्दल आभार. पण सध्या बहुधा प्रतिभा रुसली आहे...अणि वेळही नाही मिळत...! :-)

      Delete
    3. तुमचं नाव माहित नाही. पण तुम्हाला उद्देशून आंबट - गोड असा उल्लेख करणे रुचत नाही. पण सांगावेसे वाटते ' प्रतिभा कधी रुसत नसते , आपणच तिच्याकडे पाठ फिरवतो. ' तुम्ही अधिक सजगपणे भोवताल पहा. प्रतिभा आपसुकच सोबतीला येईल.

      Delete
  2. आपली भाषा सहज आणि छान आहे.कविता तर आपली उत्कृष्ट आहे,पण मला वाटतं तरूण पिढी प्रेमाविषयी गफलत करत असावी.प्रेम ही भावना आहे.विशिष्ट व्यक्ती आपल्याला मिळावीच असं कांही नाही.तो मुलगा खरच तिच्यावर प्रेम करत होता की त्याला फक्त ती पाहीजे होती सांगता यायचं नाही.मला वाटतं प्रेम करावं,पण ते ठरवुन करता येत नाही.प्रेमात कांही हाशील होत नाही कारण कांही हाशील करण्यासाठी प्रेम नसतच.नकार ही एक घटना आहे.प्रेम संपण्याचा प्रकार नाही.तिला न माहीत होता ही तिच्यावर भरभरून प्रेम करता येतं.dating ,relationship वगैरे या गोष्टीत प्रेम कमी आणि पराक्रम जास्त आहे.बाकी कविता मस्तच.

    ReplyDelete
    Replies
    1. जगदीशजी, आपल्या आभिप्रायाबद्दल आभार . आपण खुप सुंदर विचार मांडलेत. आपले म्हणणे तत्वतः बरोबर आहे. पण आजकाल तत्वाशी कोणाला देणे घेणे असते. प्रेम करताना असो अथवा लग्न करताना मुलीचे रूप पहिले जाते , मुलगा मुलीची हौस मौज करेल कि नाही हेच पाहिले जाते. हे कोण नाकारेल.

      Delete
  3. याच्या उलट पण असू शकते ना?
    आपल्या समाजात पत्नीला किती किंमत दिली जाते?

    ReplyDelete
    Replies
    1. अरुणाजी, मी स्त्री विरोधी नाही. मला स्त्रियांविषयी अत्यंत आदर आहे. पण आपले म्हणणे फारसे पटले नाही. आपण अद्याप भूतकाळातून बाहेर आल्या आहात असे वाटत नाही. त्या काळातही महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना सन्मान दिला नव्हता का ? ठीक आहे मान्य तशी उदाहरणे अपवादात्मक होती. पण काळ बदलला आहे. आणि वर्तमान वेगळे आहे. असे माझे मत आहे. आजकाल पुरुषी वृत्तीखाली दबलेली स्त्री अभावानेच पाहायला मिळते. आणि सामाजिक प्रगतीचे लक्षण आहे असे ठामपणे म्हणता येते.

      Delete
  4. प्रिया दातार20 August 2015 at 17:36

    कविता आपल्या लौकिकास साजेसी झाली आहे.

    ReplyDelete
  5. Khup Surekh.

    ReplyDelete
    Replies
    1. स्वातीजी आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून आभार.

      Delete