Sunday, 23 August 2015

सेल्फ सर्व्हिस

बऱ्याच दिवसांनी साताऱ्याला गेलो होतो . वाटेत माझी ALFA - LAVAL जुनी कंपनी दिसली . म्हणलं चला जुन्या सहकाऱ्यांना , मित्रांना भेटू या. सगळ्यांच्या गाठीभेटी घेतल्या परत पुण्याकडे निघालो.  जनरल शिफ्ट सुटण्याची वेळ झाली होती.  मला सोबत दयायची म्हणुन माझे मित्र पांडुरंग तनपुरे आणि सुनिल ज्योतिक माझ्याच कारमध्ये आले. सोबत आमचं महिला मंडळ
होतं. महिला मंडळ म्हणजे फक्त एकमेव बायको. मुद्दाम स्पष्ट केलं अन्यथा म्हणतात ना , ' पाद्र्याला निमित्त……… पावट्याचं '  तसं आंबट शौकिनांना उगीचच जिभल्या चाटायची संधी मिळायची. 

पुणे सातारा या मार्गावर शिरवळ ते खेड - शिवापूर दरम्यान जेवढी हॉटेल आहेत तेवढी अन्य कुठेही नसावीत. खेड - शिवापूर आलं होतं. भेळीसाठी फार प्रसिद्ध आहे असं म्हणतात. मी तिथली भेळ पूर्वी अनेकदा खाल्ली आहे. इतर ठिकाणच्या भेळीप्रमाणेच इथल्या भेळीतही चुरमुरे , फरसाण यापेक्षा अधिक काही असत नाही. मग प्रसिद्ध कशाबद्दल ? हे मला न सुटलेलं कोडं आहे. 

खरंतर भूक वगेरे कुणालाच नव्हती. पण बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे एकमेकांच्या सहवासात अधिक वेळ काढता यावा म्हणुन आम्ही नाष्ट्याला थांबायच ठरवलं. एक चांगल्यापैकी हॉटेल बघितलं. चांगल्यापैकी म्हणजे इंटीरिअर काय ! नाहीतरी माणूस बाह्यरुपाशिवाय बघतो काय ? हॉटेल एैसपैस होतं. गर्दीही बऱ्यापैकी होती. गाडी लावायला भलं मोठं पार्किंग होतं. 

आम्ही गाडी पार्क केली. हॉटेलात शिरलो. एक कोपऱ्यातल टेबल पाहून विसावलो. दिवस उन्हाळ्याचे होते. विसावल्या विसावल्या घोटभर पाणी प्यावेसे वाटले. टेबलावर पॅल्स्टिकचा जग होता. आशेने जवळ घेतला तर त्यातले पाणी चक्क गरम होते. 

वेटरचा शोध घेण्यासाठी हॉटेलभर नजर फिरवली. तर दो - चार ठिकाणी माझ्याकडे पाहून हसणारे ' सेल्फ - सर्व्हिस ' असे बोर्ड दिसले. " आयला , म्हणजे पाणीसुद्धा हाताने घ्यायचे कि काय ? " 

आमच्या मनोबुद्धीला ते काही पटेना. आम्ही नजरेने पुन्हा एकदा हॉटेल पालथे घातले. तेव्हा आम्हाला एका कोपऱ्यात एक वेटरवजा माणूस दिसला. आम्ही त्याला हाक मारली. तर त्याने ," साहेब , इथं सेल्फसर्विस आहे."  म्हणत आमची दांडी उडवली. 

" हो रे बाबा. ते कळलं. पण पाणी तरी देशील का तेही आम्हीच घेऊ आमच्या हातानी. " 

" पाणी आणतो कि साहेब. बिस्लरी आणू कि ……… " 

या प्रश्नाने भल्याभल्यांचा  इगो दुखावला जातो. मग साधा गावाकडचा, इतर वेळी कुठलंही साधं सुधं पाणी पिणारा माणूसही तोऱ्यात , " बिसलरीच आण. " असे सांगतो.

पण आम्ही मात्र लाज सोडलेले. गावाकडे गेल्यानंतर आपण ओढ्या - वघळीचे, विहिरीचे , बोअरचे कसलेही पाणी पितो याची जाणीव असणारे. त्यामुळेच , " साधेच आण बाबा. " असे म्हणत आम्ही त्याला साधे पाणी आणावयास सांगितले. 

घरी साले पाण्याचा तांब्याहि भरून न घेणारे आम्ही इथे मात्र पैसे देऊन , ' आम्हाला चार भेळ द्या ' अशी भिक मागत काउंटरवर गेलो. 

त्याने पैसे घेतले. कसलेतरी पॅल्स्टिकचे टोकन दिले. ते घेऊन आम्ही पुढच्या काउंटरवर गेलो. भेळ घेतली. आमच्या जागेवर जाऊन खाल्ली पुन्हा चहाचे टोकन देऊन चहा आणले . 

पण हे सगळं करत असताना माझ्या मनात मात्र प्रश्नांचे काहूर उठले होते.     

घरी पाण्याचा तांब्याही भरून न घेणारी मंडळी इथे पैसे देऊन हमाली का करतात ? सेल्फसर्व्हिस या भावनेतून हॉटेल चालवणारी मंडळी पैसे कमी घेतात का ? या हॉटेल मालकांनी जर सेल्फसर्व्हिस हि संकल्पना नाकारली तर इथे दोन चार जण वेटर म्हणुन पोट भरू शकणार नाहीत का ? ज्या पाश्चात्य देशात मनुष्यबळाची कमतरता आहे तिथे ठीक आहे पण माणसांची बजबजपुरी माजलेल्या देशात कशाला हवी सेल्फसर्व्हिस ? एक ग्राहक म्हणुन हि सेल्फसर्व्हिसची मनमानी आपण का नाही नाकारत ?   

तुम्ही काय कराल ते मला माहित नाही. तेव्हापासून मी मात्र सेल्फसर्व्हिस असलेल्या हॉटेलमध्ये जाणार नाही असं निर्णय घेऊन टाकलाय. घरात चालेल सेल्फसर्व्हिस पण हॉटेलात नाही.  


8 comments:

  1. सुनिल पवार23 August 2015 at 16:39

    खुप सुरेख सर

    ReplyDelete
  2. खरे आहे...या ॲंगलने विचारच केला नव्हता...सेल्फ सर्व्हिस चा! कारण या हॉटेल्स चे रेट्स काही कमी नसतातच. मग का सेल्फ सर्व्हिस? बरेचदा लहान मुले / फॅमिली घेऊन आलेले स्त्री , पुरुष हातात अनेक ट्रेज पेलत कसरत करत टेबलवर जातांना दिसतात.

    ReplyDelete
  3. याला म्हणतात मराठी बाणा, चुकिच आहे त्याला चुकच म्हणा

    ReplyDelete
    Replies
    1. हेमंतजी , आपण तर अभिप्राय नोंदवतानाच यमक सुद्धा साधलात. आभार.

      Delete
  4. jya wishyacha koni wicharhi kela nwhta to wishay tumhi chhan lihilay.

    ReplyDelete
    Replies
    1. आभार केशवजी. आणखी खुप गोष्टी आहेत लिहिण्यासारख्या. यातून जनजागृती झाली तर आनंद वाटेल.

      Delete