Monday, 14 September 2015

या माऊली या

( तळाचा फोटो पहायलाच हवा ) जवळ जवळ दोन महिन्यापुर्वी हि कविता लिहिली होती. कोरडया खट्ट आभाळाकडे पहात " या माऊली या , आभाळीचे मेघ व्हा " अशी आर्त साद विठू माऊलीला होती. कारण
जुलै संपला तरी पाऊस पडत नव्हता आणि दुष्काळ ' आ ' वासून समोर उभा होता. कविता लिहिली होती म्हणजे कच्ची लिहिली होती. तो कागद तेव्हापासून आजतागायत खिशातच होता. दिवसेंदिवस कुजत चालला होता. पण ती  कविता पोस्ट करण्याची माझी इच्छा होत नव्हती. कारण प्रत्यक्ष विठूला साद घालुनही पाऊस येत नव्हता. आणि तेव्हा ती कविता पोस्ट केली असती तर विठूच्या अस्तित्वावर अनेकांनी शंका घेतल्या असत्या.

जूनच्या एकदोन पावसानंतर पावसानं हात आखडता घेतला. आमच्या वस्तीसमोर मे महिन्यात नवा कोरा बंधारा बांधला होता. पण त्यात पाण्याचा थेंब नव्हता. विहिरीचं पाणी आखडत चाललं होतं. उपसा न होणाऱ्या माझ्या विहिरीचं पाणी तासाभरावर आलं होतं. बोअरचे ठोकेसुद्धा मंद झाले होते. माझा पाच साडेपाच एकर ऊस निस्तेज होत चालला होता. मला शेतावर जावसं वाटत नव्हतं. तिथं जाऊन सुकत चाललेल्या पिकाकड पहावसं वाटत नव्हतं. त्यामुळे जुलै पासुन मी गावाकडे जायचो. " चला अजुनही ऊस हिरवा आहे. " हे पाहुन दोन दिवसात परत यायचो. विहिरीच्या बुडाशी चारदोन दिवसांनी तासाभराच पाणी साठायचं. गडी तेवढं पाणी काढून घ्यायचा. महिन्याभरात केवळ आठ - दहा तास काम करून महिन्याभराचा पगार घ्यायचा. त्याला माझ्या सुकत चालेल्या पिकाशी काही घेणं देणं नव्हतं.

आत्ता ७ तारखेला सोमवारी नेहमीप्रमाणे शेतावर गेलो होतो. कुकडीचं पाणी सुटल होतं. पाटकऱ्याच्या हातापाया पडून दोन चार शेतकऱ्यांनी ते ओढयात सोडलं होतं. मी गेलो तेव्हा ओढयाला वाहती धार होती. माझी विहीर तुडुंब भरली होती. लोकांच्या मोटरी चालू होत्या. भसाभसा ओढयातलं पाणी उपसत होत्या. कुकडीचं पाणी बंद झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी ओढयाची धार बंद पडली होती. खड्डया खुड्ड्यात पाणी साचलेलं होतं. तेही दोन चार दिवसातच अखेरचा श्वास घेणार होतं. पुन्हा नजरेसमोर ओढयाचं कोरडं रखरखीत पात्र येणार होतं. पण माझं उद्याच मरण महिनाभर लांबणीवर गेलं होतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी ७ लाच लाईट आली. आम्ही मोटर सुरु केली. दोन महिने पुरेसं पाणी न मिळालेलं रान पाणी घेत होतं. तासाभराच्या भरण्याला तीन तीन तास लागत होते. लाईट सारखेच झटके मारायची. अकरा नंतर लाईट नीट चालली. मी आणि माझा गडी पाणी लाऊन बसलो होतो. माथ्यावर आभाळाचा एक पट्टा गडद झाला होता. पाऊस येईल असं वाटत होतं. पण मागच्या दोन महिन्यात त्यानं जी हुलकावणी दिली होती त्यामुळे भरवसा वाटत नव्हता.

हवेत चतुर घिरट्या घालत होते. कुणी त्यांना पाणघोडे सुद्धा म्हणतात. त्यांची संख्या बरीच होती. " हे किडे आले कि त्यांच्या मागुन पाऊस येतो असं म्हणत्यात. " माझा गडी सांगत होता. मला आशा वाटत नव्हती. पण खरंच इतरवेळेस कधीही न दिसणारे पाणघोडे आज का दिसत होते ? इतके दिवस ते कुठे होते ? असे अनेक प्रश्न मला पडले होते.    
      
गड्याची बायको त्याच्या भाकरी घेऊन आली. बांधावर आमच्या बाजूला बसली. बारं कडेला आलं होतं. बारं पलटी करून जेवायला बसावं असा विचार केला. पावसाचे दोनचार शिंतोडे आले. गड्याची बायको म्हणाली' " पाऊस तरी बघा कसा येतोय जीव गेल्यासारखा. " चार सहा मिनिटात पावसाला थोडा जोर आला. " कितीक पडणार आहे. थांबेल पाच दहा मिनिटात. " असं म्हणत आम्ही लिंबाच्या आडोशाला गेलो.

पण त्याचा आजचा मुड काही वेगळाच होता. पंधरा वीस मिनिटे झाले तरी पाऊस काही थांबेना. लिंबाखाली उभे असुनही आम्ही पूर्ण भिजलो. पाऊस थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नव्हती. " असेही भिजलोत आणि तसेही भिजणार. " चला घरी."  म्हणत आम्ही गाड्या काढल्या. अंतर अवघं पाच मिनिटाचं पण घरी पोहचेपर्यंत माझा भिजून लगदा झाला होता.

मी दारात उभा राहून डोळे भरून पाऊस पहात होतो. त्याचा निनाद कानात भरून घेत होतो. सगळं आभाळच खाली घसरल्यासारखं समोर पांढरी चादर दिसत होती. त्याचा जोर वाढतच होता. पावसानं तब्बल दोन तास मनमुराद बरसण्याचा आनंद घेतला. आणि खेळुन खेळुन दमलेल्या पोरासारखा झोपी गेला. शांत झाला.

मी गावात गेलो. काही तणनाशकं घेतली. दोन तीन तास टाईमपास करून घराकडे निघालो. घरी पोहचेपर्यंत वाटेत दोन ओढे लागतात. पहिला ओढा ओलांडला. घरासमोरच्या ओढयाशी आलो तर तिथे महापुर. तुम्ही विश्वास नाही ठेवणार. तीन तासापूर्वी तिथुन जाताना तिथं घोटभर पाणी नव्हतं.

माझे चुलत भाऊ , पुतणे , भावजया , पोरंसोरं सारी ओढयाला आली होती. पाणी कधीही पहायला न मिळाल्यासारखं पूर पहात होती. दुसऱ्या दिवशी पूर बराचसा ओसरला. पण उकडत होतं. सकाळी नऊलाच उन्हाचा चटका बसत होता. आणि दुपारी बारा वाजता पुन्हा पावसानं हजेरी लावली. त्याचा पुन्हा तोच पहिल्या दिवशीचा डाव सुरु केला. तासभरच पडला. पण सैरावैरा पडला. पुन्हा ओढयाला पूर. मी पुण्याला परतलो. पण आडवळणाने. 

अखेर विठू बरसला होता.

म्हणुन आज हि कविता पोस्ट करतोय  -

या माऊली या , आभाळीचे मेघ व्हा
या माऊली या , पावसाचा नाद व्हा

तहानलेले जीव सारे ,
सुकलेली पिके
पाण्यासाठी दाहीदिशा
झाले झाले जीव मुके
कोरडया हो ओढयामधली , झुळझुळनारी रेघ व्हा
या माऊली या , आभाळीचे मेघ व्हा

भेगाळली माती आणि
आटल्या हो विहिरी
तळापाशी जाऊनी ही
रिकाम्याच घागरी
भेगाळल्या मातीमधले , अंकुरले बीज व्हा
या माऊली या , आभाळीचे मेघ व्हा 

पेरलेले देवा माझ्या ,
उगवूनी येईना
डोळ्यातले पाणी देवा
डोळ्यामध्ये माईना
डोळ्यामधल्या आशेची हो , देवा आमुच्या वीज व्हा
या माऊली या , आभाळीचे मेघ व्हा.





       
                                      

                     

2 comments:

  1. एकदम सुंदर कविता...आणि अगदी समर्पक फोटो. पाण्याचं कुठलंही छायाचित्र पाहायला मला फार आवडतं....नदी, समुद्र, धबधबा, ओहोळ....त्याचं कुठलंही रुप पाहताच तहान शमल्या सारखं वाटतं...तृप्त! तुमची पाण्याची गरज या पावसाने भागली का? इतरांची कशी परिस्थिती आहे?

    ReplyDelete
    Replies
    1. खरंतर, याआधीच्या लेखावरही तुमचा अभिप्राय अपेक्षित होता. पण तुमचा पिंड साहित्य समीक्षेचा असल्यामुळे आपण तिथे प्रतिक्रिया नोंदवली नसेल. परंतु आपल्या या प्रतिक्रियेचा मनापासून आनंद झाला. पाऊस आणि पाणी न आवडणारी व्यक्ती अरसिकच म्हणावी लागेल. माझ्याकडे यर त्या दिवसानंतर रोज पाऊस पडतोय. इतर ठिकाणची परिस्थिती सुद्धा सुधारते आहे. पण या पुढे आपण पाणी जपूनच वापरायला हवे.

      Delete