Sunday 6 September 2015

प्रेम कसं करावं ?

अलीकडे तिच्यासाठी ' सामान ' अथवा ' माल ' हि उपाधी वापरली जाते ' तर त्या दोघांचं प्रेम कितीही निखळ असलं तरी त्याला ' लफडं ' संबोधलं जातं. त्याला आदर्शवादाचे वावडे असते आणि टपोरी वागण्यात धन्यता वाटत असते तर त्याला ती ' साधी भोळी ' नव्हे तर ' चिकणी चमेली '
हवी असते. ' Love at first site ' हे खरं

असलं आणि तेच प्रेम सर्व श्रेष्ठ असलं

तरी त्या ' पहिल्या दृष्टीक्षेपात ' आपण नेमकं काय पहातो हा प्रश्न फार मोठा असतो.

फास्टफूड इतकंच आता प्रेमही फास्ट झालं आहे. कोण , कधी , कशासाठी , कुणाच्या प्रेमात पडेल याचा काही भरवसा उरला नाही. ' मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही ' असं तो म्हणाला कि तिला आभाळ हाती आल्यासारखं वाटतं ' आणि तिनं एखादा ' कटाक्ष ' टाकला तरी त्याचं काळीज फाटतं. चांगल्या घरातल्या मुलीसुद्धा सिनेमातल्या हिरो - हिरोईनचा आदर्श घेत आई वडिलांच्या पंधरा - सोळा वर्षाच्या प्रेमाचा कचरा करत त्याचा हात धरून घर सोडतात. आणि आई बाप मात्र पंधरा सोळा वर्षातले सारे प्रसंग आठवत हंबरडा फोडतात. जे प्रेम आपल्या आयुष्यातल्या प्रत्येकाला आनंद देत नाही प्रेमच नव्हे असं माझं ठाम मत आहे.   
असं असं प्रेम करावं असं सांगून प्रेम करता येत नाही. तरीही कुसुमाग्रजांसारखा कवी -  
' प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,                                                                                     मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं ' 
असं सांगून जातो. आणि मीही ' प्रेम कसं करावं ? ' असं म्हणत प्रेम करण्याची तऱ्हा सांगण्याचा प्रयत्न करतो . 
' प्रेम कसं करावं ? ' या शीर्षकाची माझी एक कविता आहे. ती कविता नंतर कधीतरी पोस्ट करीन. पण माझा ' चेहऱ्यामधला चंद्र ' हा कविता संग्रह मी खरंतर ' प्रेम कसं करावं ? ' याच शीर्षकानं प्रकाशित करणार होतो. पण ते शीर्षक फारच व्यावसायिक , बोल्ड आणि टपोरी वाटलं आणि मग मी माझ्याच ' चेहऱ्यामधला चंद्र ' या कवितेचं शिर्षकच काव्यसंग्रहासाठी निवडलं. जेष्ठ दिवंगत कवी श्री. गंगाधर महाम्बरे यांच्या हस्ते त्या काव्य संग्रह प्रकाशन झालेलं.
माझ्या या काव्य संग्रहात एकूण ४५ प्रेम कविता आहेत. ' प्रेमाहूनी जगी या ', ' तिला घास भरवताना ' ह्या त्याच काव्य संग्रहातल्या कविता. याच काव्य संग्रहात मी ' प्रेम म्हणजे काय ? ', ' प्रेम कुणावर करावं ? ' आणि  ' प्रेम कसं करावं ? ' या मथळ्याखाली जवळ जवळ १५ - १६ पानांचं गद्य लेखन केलं आहे. 
तरुणांना प्रेम हि अनुभूती समजावून सांगावी, प्रेम या भावनेकडे त्यांना अधिक मनमोकळ्या दृष्टीकोनातून पहायला शिकवावं. हा हे सारं लिहिण्यामागचा हेतू. 
प्रेम हि काही साधीसुधी गोष्ट नाही. माझ्या एका कवितेत मी म्हटलं आहे -
' प्रेम म्हणजे खेळ नव्हे
प्रेम म्हणजे आग आहे
दोन जीवांच्या काळजाला
लागलेली आग आहे '
हि आग वाटून घेता आली तर आनंद. पण जेव्हा एकजण नुसताच जळत जातो दुसरा नुसताच पहात रहातो तेव्हा प्रेमा एवढं जीवघेणं दुसरं काही नाही असं वाटू लागतं.
प्रेम हि भावना खरच खूप श्रेष्ठ आहे म्हणून तर कृष्णा बरोबर रुक्मिणीचं नाव न येता राधेचं येतं. राधेचं नाव कृष्णाच्या आधी घेतलं जातं. आणि म्हणुनच आपण ,' राधे कृष्ण , राधे कृष्ण ' म्हणत रहातो. रुक्मिणीच्या कृष्णावरील प्रेमाविषयी कोणीच बोलत नाही पण मीरेच्या निष्ठेचा दाखला दिल्याशिवाय कृष्णाचा अवतार पूर्ण होत नाही. आहो, साधी कुब्जा पण ती सुद्धा कृष्णाच्या पावन स्पर्शाने मुक्ती मिळवते.     
एखाद्यावर किती प्रेम करावं किंवा एखादी व्यक्ती दुसऱ्यावर खूप प्रेम करत असेल तेव्हा त्या व्यक्तीची ( हे त्याला आणि तिला दोघांनाही लागू आहे ) भूमिका कशी असावी या विषयी मी माझ्या चार ओळीत सांगितलेलं आहे. त्या चार ओळी अशा -

प्रेम असं असावं..........घासातला घास देणारं..........श्वासातला श्वास देणारं...........स्वतःसाठी पानझडीचा शिशिर ऋतू मागून घेताना...........दुसऱ्याला फक्त फुलण्याचे ऋतू देणारं.

8 comments:

  1. स्नेहल तावडे18 September 2015 at 21:58

    इतक्या सुरेख लिखाणाला मी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देते आहे हे पाहून आश्चर्य वाटले. किती सुरेख लिहिताय सर तुम्ही!

    ReplyDelete
    Replies
    1. स्नेहलजी , वाचकांची प्रतिक्रिया मिळाली नाही म्हणजे लेख वाचकांना आवडला नाही असे नव्हे. अनेकदा वाचक लॉग इन करणे , प्रतिक्रिया लिहिणे या गोष्टींचा कंटाळा करतात.

      Delete
  2. Ashutosh shendge1 October 2015 at 20:08

    Kaka kharch khupp cchan lihita....abhiman watato tumcha

    ReplyDelete
    Replies
    1. आशुतोष पहिल्यांदाच तुझी प्रतिक्रिया मिळाली, आभार.

      Delete
  3. Replies
    1. विजयजी, मनापासून आभार.

      Delete