Monday 5 October 2015

माझा ' काका ' झाला , त्याची गोष्ट

परवा गावाहून परतताना दौंडला ट्रेनला बसलो. जेमतेम तास दिडतासाचा प्रवास. पण या टप्प्यात खच्चून गर्दी असते. बुड टेकायला जागा मिळण्याची सुतराम शक्यता नसते. तर मग एकटया जिवाला हवा हवासा सहप्रवासी कुठून मिळणार ? पण
परवा आश्चर्य घडलं. हैद्राबादहून आलेली हैद्राबाद - पुणे एक्स्प्रेस एकदम मोकळी ढाकळी. प्लॅटफॉर्मवर सुद्धा फारशी गर्दी नव्हती. किती तरी दिवसांनी मोकळा श्वास घेत गाडीत चढलो. स्लिपरकोच मध्ये. खिडकी कडेची सिंगल सीट. रिकामी. बसलो तिथच. तर समोर एक नीटनेटकी ललना. अधेड उम्र. भरीव बांध्याची. उंचीपुरी. पस्तीस चाळीसची. गोरीपान. अंगाबरोबर चापून चोपून बसलेला ड्रेस. नखांना मोरपंखी रंगाची नेलपॉलिश. कानात लक्ष वेधून घेतील असे झुबे. पायात आखीव रेखीव चपला. हे सारं वर्तमान पत्राच्या आडून न्याहळलं बरं.
सकाळ प्रसन्न असतेच. पण आम्हाला दुपारसुद्धा प्रसन्न, आल्हादायक वाटली.

दोघेही समोरासमोर बसलेलो. एकदोन वेळा तिच्या पायांना माझा चुकून स्पर्शसुद्धा झाला. खरंच चुकून बरं का ! मी अनोळखी स्त्रियांशी बोलणं टाळतोच. कारण तुमच्या संभाषणाचा हेतू कितीही प्रामाणिक असला तरी त्यांना नको तो वास येतोच. आणि मग स्वतःला सावरून घेत, काहीही न बोलता त्या तुम्हाला तुमची जागा दाखवतात.

कोणत्याही गप्पा छप्पा नसताना दीड तास कसा गेला कळाले सुद्धा नाही. पुणे स्टेशन जवळ आलं तसं तिनं चेहऱ्यावर हसु आणलं. आणि माझ्या दिशेने झुकत विचारलं, " काका , स्वारगेटला कसं जायचं ? "

" मस्त ' काका ' झाला यांचा " या विचाराने क्षणभर तुम्हीही आनंदी झाला असाल. पण थांबा. मला या असल्या गोष्टी सवयीच्या झाल्या आहेत. कदाचित तुम्हालाही याचा अनुभव आला असेल. काय आहे. आपण कित्ती लहान, अजाणते, कुकुलं बाळ आहोत आणि समोरची व्यक्ती किती थोराड आहे हे दाखवून देण्यासाठी अलिकडे अनेकजण आपल्या बरोबरीच्या व्यक्तीला सुद्धा काका , मामा अशा सर्वनामाने संबोधतात. यात स्त्रियाच असतात असे नव्हे. अनेकदा तुमच्यापेक्षा चार सहा वर्षाने मोठे असणारे पुरुषसुद्धा तुमचा काका करतात. काही स्त्रिया भाऊ , दादा म्हणतात त्यात तुमच्या विषयी आदराची भावना कमी आणि अविश्वासाची भावना जास्त असते.

असो. या सगळ्याची सवय असल्यामुळे मी तिचं ' काका ' हे संबोधन मनाला फारसं लावून घेतलं नाही. " चला न मलाही स्वारगेटलाच जायचं आहे. " असं म्हणत सोबत गाडीतून उतरलो. अगदीच खांद्याला खांदा लाऊन नाही पण अनोळखी नसल्यासारखे सोबतीने चालू लागलो.

कोण ? कुठली ? अशी जुजबी चौकशी झाली. ती मुळची मुंबईची. दौंड हे तिचं सासर. पुण्यात बहीण असते तिची. तिच्याकडे जाऊन पुढे मुंबईला जायचं होतं तिला. तिचे जीजू पुण्यात रिक्षा चालवतात. ते स्वारगेट स्टॅन्डला तिला घ्यायला येणार होते. मी तिला स्वारगेटच्या स्टॅन्डवर सोडलं. ती तिच्या जीजुच्या रिक्षाची वाट पहात थांबली. मी पाच नंबर बसच्या दिशेने वळणार तोच ती म्हणाली, " सॉरी सर , मघाशी मी तुम्हाला चुकून काका म्हणाली. "  

हे असं , " आली होती, गेली होती ," म्हणणारी तरुणी ऐंशी टक्के मुंबईकरच असणार बरं का ?  पुणेकर तरुणी आले होते, गेले होते असेच म्हणते.

" सॉरी वन्स अगेन. अॅन्ड बाय . " असं म्हणत तिनं हात पुढे केला. ' सारी भगवंताची करणी……….'  म्हणत आम्हीही तिचा मऊ मुलायम स्पर्श आपलासा करून घेतला. आणि ओझरत्या नजरेने तिच्याकडे पहात उभ्या असलेल्या पाच नंबरच्या दिशेने निघालो.

बसमध्ये चढतो ना चढतो तोच आमचा पुन्हा एकदा काका झाला. कसा ते नंतर कधीतरी.                                                  

4 comments:

  1. Replies
    1. आभार गानु सर. परंतु हा नुसताच अनुभव नसुन स्त्री पुरुषांच्या व्यक्तिमत्वाच्या एका पैलूवर प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न केला आहे.

      Delete
  2. Replies
    1. रुपाली अभिप्रायाबद्दल आभार.

      Delete