Sunday 26 October 2014

Shiv sena, BJP, MNS : शिवसेनेतली आनंदीबाई

राजकारणात तुम्हाला टिकून रहायचं असेल तर तुम्हाला तुमच्या पक्ष प्रमुखाचा उदो उदो करायलाच हवा. एकामागून एक पक्ष बदलत आलेले, कोणाचेही न झालेले आणि अखेरीस राजकारणातून बाहेर फेकले गेलेले माजी आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते हे विठ्ठल भक्त. नेमाने वारीत सहभागी होणारे. ते एकदा असं म्हणाले होते कि, " शरद पवार माझे
पांडुरंग आहेत. " पण सत्तेच्या चाव्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या हातुन सुटल्या आहेत असं पहाताच त्यांनी पांडुरंगाला सोडलं आणि भाजपाच्या वारीत दाखल झाले. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली.

कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करायचा असेल तर आपण मोदींवर सडकून टिका केली पाहिजे असे वाटुन उद्धव ठाकरेंनी मोदींना अफजलखान संबोधले. काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेत रहाणारच नाही. त्यामुळे त्यांच्यावर फारशी टिका करण्याची गरज नाही. असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळेच भाजपा हाच त्यांनी शिवसेनेचा एक नंबरचा शत्रू मानला. तसाच प्रचार केला. आता स्थानिक पक्ष म्हणुन जनता आपल्या पाठीशी उभी राहील असा त्यांना ठाम विश्वास होता. त्यामुळेच उद्धव ठाकरे भाजपावर बेसुमार टीका करत राहिले. आणि अवघ्या ६३ जागां पदरात घेऊन बसले.


मुळात आपल्या पक्ष प्रमुखाला हवं तसं बोललं कि आपलं पक्षातला स्थान अधिक बळकट होतं अशी प्रथा आहे. त्यामुळे नारायण राणे, शरद पवार , यांच्या मागोमाग संजय राउत यांच्यासारखा माणुसही मोदींवर बेबंद टिका करू लागला. इतका कि , " आम्ही भाजपाच्या नेत्यांना भांडी घासायला लावू . " असं बोलण्या इतपत संजय राउत यांची मजल गेली. " मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. आम्हाला कोणाची गरज नाही. शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापन करेल."  हि विधानं तर एखादया मुलाने पाढे पाठ करताना घोकंपट्टी करावी अशा रितीने वारंवार उच्चारली. 

उद्धव ठाकरे स्वतःचे निर्णय इतरांच्या सांगण्यावरून घेतात. एक उदाहरण देतो. लोकसभा निवडणुकीत गजानन बाबर हे विद्यमान खासदार. कोणाच्याही आध्यात मध्यात नसणारे. निवडुन येण्याची पुर्ण क्षमता असणारे. निष्ठावान. पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे कान कुणीतरी भरले आणि बाबारांच तिकीट कापण्यात आलं. आणि तिकीट दिलं कुणाला तर श्रीरंग बारणे या पूर्वाश्रमीच्या काँग्रेसमधुन शिवसेनेत आलेल्या, आमदारकीला एकदा पराभूत झालेल्या आणि त्या समयी नगरसेवक असलेल्या गृहस्थाला. मोडी लाटेत त्याचे हात पिवळे झाले हा भाग निराळा. 

२०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीतही तेच. सिमाताई सावले या शिवसेनेच्या निष्ठावान आणि विजयाची खऱ्या दावेदार असलेल्या उमेदवार. मागील तीन वेळा नगरसेवक म्हणुन विजयी झालेल्या. पण ऐनवेळी त्यांना डावलण्यात आलं. आणि तिकीट दिलं कुणाला तर विजयाची सूत्रान शक्यता नसलेल्या, त्याक्षणी केवळ नगरसेवक असलेल्या आणि महिनाभरआधी काँग्रेस मधुन शिवसेनेत दाखल झालेल्या फितुराला. गौतम चाबुकस्वार या माणसाला. अशानं पक्ष मोठा होत नाही. मोडकळीस येतो. आणि हि बुद्धी उद्धव ठाकरेंची नसते. एखादया आनंदीबाईची असते. 

शरद पवार मात्र याला अपवाद आहेत. ते ऐकतात जनाच. करतात मनाचं. स्वतःच स्वतःचे निर्णय घेतात. होतील त्या परिणामाला सामोरे जातात. कारण त्यांच्यात तो आत्मविश्वास आहे. पण उद्धव ठाकरेंकडे ती परिपक्वता कधीच नव्हती आणि कधी येणारही नाही. त्यामुळेच त्यांच्याभोवती असणाऱ्या आनंदीबाईंचं फावतं आहे.   

युती तुटण्यात संजय राउत यांचा मोठा हात असावा अशी दाट शंका मला येते आहे. कारण शिवसेना भाजपाला भारी पडेल. कदाचित स्वबळावर सत्ताही स्थापन करेल असा विश्वास अनेकांना होता. उद्धव ठाकरेंना कमी पण संजय राउत यांना जास्त होता. त्यामुळेच आपण दिलेला सल्ला खरा ठरला तर आपली पक्षातली उंची आणखी वाढेल असा त्यांचा कयास होता. सहाजिकच टिका करताना ते एक पाऊल  उद्धव ठाकरेंच्या पुढे टाकत होते. पण आज शांत आहेत. 

युती तुटताच मनसे आणि शिवसेना एकत्र येऊ शकली असती पण तिथंही कुणीतरी मोडता घातला. अशा रितीने प्रत्येक गोष्टीत बिब्बा घालणारी शिवसेनेतली हि आनंदीबाई कोण ? असा प्रश्न माध्यमात विचारला गेला. आणि माझ्या अंदाजानुसार मिलिंद नार्वेकर आणि त्यांच्याबरोबर संजय राउत यांनी हि आनंदीबाईची भूमिका पार पाडली असावी. माझे वाचक मित्र म्हणतील याला पुरावा काय ? पण पडद्यामागच्या कित्येक हालचालींना पुरावे देता येत नाहीत. अशा वेळी त्यात्या माणसांच्या देहबोलीवरून अंदाज बांधावे लागतात. आज शिवसेनेत संजय राउत यांचं स्थान फार वरचं आहे. सामनाचे ते संपादक आहेत. त्यामुळेच आपली जागा टिकवून ठेवायची असेल तर उद्धव ठाकरेंना हवं तसं बोलणं हि त्यांची गरज आहे. 

शिवसेना - मनसे एकत्र आली तर. उद्धव ठाकरे , आदित्य ठाकरे , राज ठाकरे यांच्या खालोखाल आपलं स्थान जाईल. शिवाय आज संजय राउत यांच्या एवढा घणाघाती टीका करणारा दुसरा नेता सेनेत नाही. उद्धव ठाकरेही फिके पडावेत एवढी त्यांची भाषा विखारी असते. पण शिवसेना - मनसे एकत्र आली तर राज ठाकरे यांच्या समोर आपली किंमत रहाणार नाही याची संजय राउत यांना पूर्ण जाणीव होती. आणि म्हणुनच त्यांनी शिवसेना मनसेच्या मनोमीलनात अडथळा आणला.

अशा एक नव्हे तर अनेक आनंदीबाई उद्धव ठाकरे यांच्या अवतीभोवती आहेत. त्यांना वेळीच आवर घातला नाही तर शिवसेनेचं भविष्य धोक्यात आहे.   


   
  



4 comments:

  1. Sarang Chapalgaonkar21 November 2014 at 14:12

    विजयजी परवा आपणाशी संवाद साधताना मी म्हणालो होतो की आपल्या लिखाणावर असंस्कृत प्रतिक्रिया देणार्यांकडे दुर्लक्ष करावे. प्रत्येक व्यक्तीची अभिव्यक्ती ही त्याच्यावर होणार्या संस्कारातुनच येते.

    ReplyDelete
  2. सारंगजी, आपले म्हणणे मी पुर्णपणे मनावर बिंबविले आहे. आणि ज्या देशातली जनता मोदींना अपशब्द वापरताना मागेपुढे पहात नाही. त्यांच्यापुढे मी किती छोटा ? असो आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.

    ReplyDelete
  3. आपले म्हणणे खरे आहे. मिलिंद नार्वेकर आणि संजय राउत यांच्या शिवाय खालच्या पातळीवर टीका करून शिव सेनेची प्रतिमा खराब करणारे प्रेम शुक्ला यांना देखील शिव सेनेने कायमचे सेवा निवृत्त करावे अशी नम्र विनंती !

    ReplyDelete
  4. चंद्रशेखरजी अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपली मते नेमकी आहेत. त्यामुळेच आपल्या सवडीनुसार आपण इतरही लेख वाचुन सूचना कराव्यात.

    ReplyDelete