Friday, 6 June 2014

social media and sex : सोशल मिडिया आणि अश्लीलता - भाग १

आजकाल मुलं आठ दहा महिन्यांची झाली कि त्यांच्या हातात मोबाईल दिसू लागतो. बाबा ऑफिसात असतात. त्यांचा फोन येतो. " चला, बाबांशी बोला. ह्यालो म्हणा बाबांना. बाबांना म्हणावं जेवलात का ? " असं म्हणत आई आठ दहा महिन्याच्या बाळाच्या कानाशी मोबाईल धरते. आणि इथून मुलांची मोबाईलशी ओळख होते.


पुढे ती वाढतच जाते. आई काही कामात असते. ती मोबाईलवर गाणी लावते. मोबाईल लॉक करून मुलासमोर ठेवून देते. मुलंही त्या यंत्रातनं येणाऱ्या गाण्यात हरवून जातं. कारण गाणीच तशीच असतात.' चोली के पीछे क्या है ? चोली के निचे क्या है ? ' किंवा ' मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये '. मनाचे श्लोक , बालगीतं लावून द्यावीत असं त्या आईला कधीच वाटत नाही. आणि वाटूनही काही उपयोग नसतो. कारण आजकालच्या आयांच्या आणि बाबांच्याही मोबाईलमध्ये मुन्नी आणि शीला शिवाय दुसरं काही नसतंच. 


 ' चोली के पीछे क्या है ? चोली के निचे क्या है ? ' आणि ' मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये '. अशी गाणी ऐकत मुलं मोठी होतात. त्याशिवाय दुसरं गाणं लागलं कि रडू लागतात. आईसुद्धा ' " बाई कित्ती कळतं गं एवढूश्या जीवाला ? " म्हणत पुन्हा पुन्हा ' चोली के पीछे ' लावते. इतकंच काय ' बाई माझ्या सोन्याला तर चोली के पीछे क्या है ?  आणि  मुन्नी बदनाम हुई '  याशिवाय दुसरं गाणं लागलेलं अजिबात चालत नाही.' असं चारचौघीत मोठ्या अभिमानानं सांगते. आमच्याकडे सुद्धा तसंच आहे बाकीच्याही तिच्या सुरात सुर मिसळतात. 

हि गाणी ऐकतच ते मुलं रांगायच सोडून स्वतःच्या पायावर उभं राहू लागतात. त्याचं गाण्यांच्या तालावर आई बाबा मुलांना बोट धरून नाचायला शिकवतात. पाहुणे, मित्रं मैत्रिणी आल्या कि तेच गाणं, मुलांचा त्या गाण्यावर डान्स, सगळ्यांच्या नजरेतून ओसांडून वाहणारं कौतुक. गाणं संपत. मुलं
पुन्हा तेच गाणं लावायचा आग्रह धरतात. त्यांना पुन्हा त्याच गाण्यावर नाचायचं असतं. भोवतालच्या सगळ्यांकडून कौतुक करून घ्यायचं असतं. आई बाबा नाही म्हणतात. मुलं भोकाड पसरतात. आई बाबा शरण येतात. " पाहिलंत ना कसा आहे ? फार हट्टी झालाय लबाड. " म्हणत कौतुकानं पुन्हा गाणं लावून देतात. पुन्हा मुलाचा नाच, उपस्थितांच कौतुक.

असं नाचता नाचता मुलं मोठी होतात. आता मोबाईल आई बाबांच्या हाती कमी आणि मुलांच्या हाती जास्त दिसू लागतो. मोबाईलचं लॉक काढणं, गेम सुरु करणं, तासनतास गेम खेळणं हे सारं होतं. आई बाबांना अनेकदा कौतुक तर कधी कधी काळजी वाटू लागते. अभ्यास कमी आणि मोबाईल जास्त अशा दृष्ट चक्रात मुलं अडकतात. आपल्या मुलांवर हात उगारताना आई बाबांचा हात जड होतो. मुलांच्या डोळ्यातल्या पाण्यात आई बाबा विरघळून जातात. मुलं आई बाबांची कमी मोबाईलची अधिक होतात. पण हे अधिक घातक आहे याची जाणीव मुलांना तर नसतेच. पण ज्यांना जाणीव असायला हवी ते आई बाबांनाही नसते.

उलट " आमचा चिंटू दोन वर्षाचा. पण एवढूश्या वयातही त्याला मोबाईल मधलं सारं कळतं. " या कौतुकातच आई बाबा रममाण होतात. आणि मुलांच्या आयुष्याभोवातीचा मोबाईलचा फास आणखी आवळला जातो. हे थांबवायला हवं. दुसऱ्यासाठी नव्हे आपल्याच मुलांच्या भविष्यासाठी.

पण कसं ? हे आणि मोबाईलच्या इतर अनेक दुष्परिणामांविषयी वाचा पुढच्या भागात.

2 comments:

  1. असच एक चित्र माझ्या पाहण्यात आल होत, ज्यात लहान मुलगा भांडी घासतोय आणि आई फेसबुक वर आहे अस दाखवलं होतं.

    http://abhivyakti-india.blogspot.in/

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रियेबद्दल आभार.
      तुम्ही पाहिलेला फेसबुकवरचा फोटो हे समाजाचं अति विदारक चित्रं झालं. फेसबुक वरील असे अनेक फोटो फोटोट्रिकच्या साह्याने साकारलेले असतात. सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग ग्यास सिलेंडर घेऊन रस्त्यानं चाललेत हा फेसबुकवरचा मी पाहिलेला फोटो हा त्या ट्रिकचाच भाग. पण तुम्ही पाहिलेला फोटो खरा असेल तर फारच वाईट दिवस येऊ घातलेत असं म्हणायला हवं. कारण ज्यांनी मुलांना आवर घालायला हवा तेच सोशल मिडीयाच्या आणि मोबाईलच्या अधिन गेले तर सगळा अंधारच होईल.
      हे टाळायला हवं म्हणून माझं लेखन. आपण या मालिकेतल्या पोस्ट आपल्या अधिकाधिक मित्रांना फोरवर्ड कराव्यात हि अपेक्षा.

      Delete