असो. यावर मी कितीही चर्चा केली तरी यातून काही निष्पन्न होणार नाही. कारण त्यातल्या ‘ बाईच्या धंद्याची ‘ गोष्ट अधिक महत्वाची आहे.
खरंतर हि घटना घडून काही महिने होऊन गेलेत. हा लेख लिहून तसाच पडून होता. वर्तमान पत्रं जनसामान्यांच्या बाजूनं त्यांच्या मनात आलं तर छापतात. तेही त्यांच्या बातमीदारान लिहिलेलं हवं. तुम्ही मी नव्हे. पण परवाची घटना घडली अन महिनोंमहिने तसाच धूळ खात पडून राहिलेला लेख शेवटी मी माझ्या ब्लॉगवर टाकायचं ठरवलं.
महिन्याभरापूर्वी परवा एका पोलिस महिलेनं दुचाकीवरील एका अल्पवयीन मुलीच्या दोन चार तोंडात भडकावल्याच वाचलं. आणि हा लेख वाचकांसमोर मांडायचं ठरवलं. अशा कितीतरी घटना रोज घडत असतात. पोलिसांकडून नागरिकांना चांगली वागणूक मिळत नाही. गुन्हेगाराला आणि सामान्य नागरिकाला आमचं खातं एकाच तराजूनं तोलणार असेल तर आमचं काही खरं नाही.
सर्वसाधारणपणे आपल्या व्यवसायाला कोणीही सभ्य माणूस ‘ धंदा ‘ म्हणत नाही. अगदी खऱ्या अर्थाने ती व्यक्ती धंदा करीत असली तरी ती, ' मी व्यवसाय करतो.' असंच सांगते. आणि एखादी महिला तर चुकुनही तिच्या नोकरीला, व्यवसायाला ' धंदा ' म्हणणार नाही. अशाच आपल्या नोकरीला धंदा संबोधणाऱ्या एका महिलेची हि गोष्ट.
झालं काय ! माझ्या मुलाची दहावीची परीक्षा. त्याचा पहिला पेपर. त्याला परीक्षेला बसवून मी शहरात गेलेलो. शहरातली कामं संपवून पुन्हा त्याचा पेपर संपण्याच्या वेळी त्याला घ्यायला जायचं हा माझा बेत.
मी जंगली महाराज रोडन मॉर्डन कॅफेच्या दिशेने निघालेलो. मॉर्डन कॅफेच्या चौकातून डाव्या हाताला वळण घेऊन मला आकाशवाणी केंद्रात जायचं होतं. खरंतर कोणत्याही चौकात डाव्या बाजूचे वळण घेताना लाल सिग्नल असण्याचं काही कारण नाही. पण आमच्या वहातुक नियंत्रक खात्याला नियमात अशा काही खुट्या मारून ठेवायची सवयच आहे. त्यातही माझ्या पुढच्या काही गाड्या डाव वळण घेऊन पुढे निघलेल्या. सहाजिकच तिथला लाल सिग्नल माझ्या नजरेतून सुटला. मी डाव वळण घेऊन पुढे निघालो. आणि पुढे दबा धरून बसलेल्या पारध्यांच्या ( वाहतूक पोलिसांच्या ) जाळ्यात मी सापडलो.
सहा सात जणांची फौज तिथ उभी होती. मला अडवलं. गाडीची चावी काढून घेतली. ज्या हवालदाराने माझ्या गाडीची चावी काढून घेतली त्याचाजवळ सौम्य भाषेत मी माझी बाजू मांडू लागलो.
त्या हवालदाराच वर्णन. वय वर्ष पंचविशीच्या आसपास. अंगावरती ‘ टाइड कि सफेदी.’ च्या जाहिरातीत दिसावा असा पांढरा शुभ्र गणवेष. गळ्यात नजरेत भरावा इतक्या जाडीचा सोन्याचा गोफ. हातात सोन्याचं कड.
हे सारं पाहिल्यावर मला प्रश्न पडला, ' या एवढ्याश्या वयात या माणसाने एवढी माया कशा कमावली ? ' ( असा प्रश्न मला पडला असला तरी त्याच्या वरिष्ठांना कसा पडला नाही ? कुणास ठाऊक . किवा त्याच्या अंगावरचं धन हि त्याच्या बापजाद्यांची कमाई असेल तर त्याला अशा नोकरीची गरज काय ? )
असो यावर मी कितीही चर्चा केली तरी यातून काही निष्पन्न होणार नाही. कारण त्यातल्या ‘ बाईच्या धंद्याची ‘ गोष्ट अधिक महत्वाची आहे.
त्या हवालदाराला माझी सौम्य भाषा समजत नव्हती. ‘ काट्याने काटा काढता येतो ‘ या न्यायाने मी माझ्या पोलीस खात्यातल्या ओळखीचा दाखला देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो हवालदार म्हणाला, " म्याडमला भेटा." तेव्हा त्या टोळक्यातल्या त्या बाईकडे माझे लक्ष गेले. बाई तशी भरगच्च बांध्याची. मी भरगच्च म्हणतोय सुडौल नाही . केस म्हणजे बॉयकट. अंगावर पोलिसखात्याच गणवेष. हुद्दही मोठा. पी .एस. आय.
तिच्याकडे पाहून मला बर वाटलं. कारण स्त्रीया कनवाळू असतात. आणि बाईंना माझी कणव येऊन त्या मला सहज सोडून देतील असं मला वाटत होतं. मी मोठ्या अपेक्षेने त्यांच्याकडे गेलो. माझी शोकांतिका सांगितली. पण बाई फिस्कारून माझ्या अंगावर आल्या.
" सातशे रुपये भरा."
" सातशे रुपये नाही म्याडम. पीयुसी. पण नाही म्याडम त्याच्याकडे." हाताखालच्या हुजरयाने आणखी तेल ओतले.
" आणखी हजार रुपये वाढले सतराशे रुपये भरा ."
( ' लोकांच्या खिशात पैशाचे झाड आहे ' असं या पोलिसखात्याला वाटतं का ? लायसन नाही ४०० रुपये, सिग्नल तोडला ३०० रुपये, नो पार्किंगमध्ये गाडी लावली १५० रुपये, पी. यु. सी. नाही १००० रुपये, या दंडाच्या रकमा कोणी ठरवल्या ? )
त्या हुजरयाचा राग मनातल्या मनात गिळून अधिक काकुळतीला येऊन मी बाईंना म्हणालो, ” म्याडम, अहो एवढा दंड सर्वसामान्यांना परवडणार आहे का ? अहो माझे काका आपल्याच खात्यात आहेत बोलता का त्यांच्याशी ?”
" मला कोणाशी बोलायचं नाही."
" नाही म्याडम, पण सतराशे फारच होतात हो. "
" काही कमी होणार नाही, माझा धंदाच आहे तो. मी जेवढे सांगितले तेवढेच घेते.
" म्याडम काय बोलताय तुम्ही ? ' धंदा '…………. मला वाटलं होतं हा व्यवसाय आहे तुमचा.", धंदा या शब्दावर अधिक जोर देत मी म्हणालो.
तशा बाई अधिक चवताळल्या. माझ्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून म्हणाल्या," तू जा आता इथून, नाही तर मार खाशील."
" मार खाशील ?………… अंगाला तर हात लावून दाखव माझ्या." इतका वेळ सभ्यतेन बोलणारा मी शेवटी एकेरीवर उतरलो. आणि घाणीत दगड टाकला कि आपल्या अंगावरच घाण उडते याचा प्रत्यय मला आला.
" ये याची गाडी त्याब्यात घे." असं तिनं तियाच्या हुजरयाला फर्मावलं. आणि मग माझ्याकडे वळून म्हणाली," आता तुला गाडी कशी मिळते तेच पाहते मी."
" ठीक आहे ! मीही एक छदामही ना देता गाडी घेऊन जाईन हे तुही लक्षात ठेव.” असं म्हणून मी तिथून निघालो. सकाळच्या माझ्या वार्ताहार मित्राला फोन केला पण तो जागेवर नव्हता.
शेवटी माझ्या काकांनी माझी गाडी सोडवून घेतली. आनंद नाही वाटला. वाईटच वाटलं .
पण अधिकार माणसाला किती क्रूर बनवतो याच वाईट वाटलं. शिक्षणाने व्यक्तिमत्व फुलतं, माणसात सौजन्य येत…… पण हे कसलं सौजन्य ?
पोलिसखात्याविषयी चांगला अनुभव हजारातून एखाद्याला येतो. बाकी साऱ्यांचे अनुभव हे असेच. याला आळा कोण घालणार ?
पोलिस खात हे आम्ही आमच्या संरक्षणासाठी निर्माण केलेलं. पण ते आता आपल्याला अधिकच जाचक ठरतंय. आपण पाळलेला नाग आपल्यालाच दंश करतोय. याला वेळीच ठेचायला हवं. पण कसं ? त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं गारुड किंवा पुंगी ज्यांच्याकडे आहे ते सरकारही तो नाग आपल्या तालावर नाचतोय एवढ्यावरच खूष आहे.
आपलं पोलिसखात….…..आपले नगरसेवक…………आपले मंत्री………..आपले खासदार………आपली लोकशाही हे सारं आपण आपल्यासाठी निर्माण केलं. पण ते आता आपल्यालाच अधिक जाचक ठरू पहातंय. काय करायचं ? नाही, असं खचून चालणार नाही. आता आपण सामान्य माणसानंच कंबर कसायला हवी.
No comments:
Post a Comment