Saturday 21 June 2014

Story for Kid's : राजा पेक्षा दगड बरा


राज्यस्थान मधलं अजलमेर. खूप खूप वर्षापूर्वी तिथ रणजितसिंग नावाचा एक राजा राज्य करीत होता. एक दिवस नेहमीप्रमाणे तो त्याचा सारा लवाजमा घेवून शिकारीला गेला. सकाळपासून जंगल पालथं घालून सगळे थकले होते. शिकार हाती लागली नव्हतीच पण दुपार झाली होती. दमून भागून सारे एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले. दुपारचं भोजनही उरकून घ्यावं असा विचार केला. इतक्यात


सु सु करती कुठून तरी एक दगड आला. राजाचा कपाळावर लागला. भळभळून रक्त वाहू लागलं. सैनिकांची धावा धाव झाली. काहीजण राजाकडे झेपावले. राजवैद्य सोबत होतेच. त्यांनी काही जणांना एक औषधी झाडपाला आणायला पाठवले. काहीजण ज्या दिशेने दगड आला होता तिकडे गेले. ज्या दिशेने दगड आला होता त्या दिशेला गेलेल्या सैनिकांनी थोड्याच वेळात एका म्हातारीला पकडून आणले. राजासमोर उभे केले.
" महाराज, याच म्हातारीने फेकलेला दगड लागलाय तुम्हाला. हिला काय शिक्षा करायची ते सांगा. ” म्हणत सैनिक राजाच्या आज्ञेची वाट पाहू लागले.

राजाने म्हातारीकडे पाहिलं. गोरी कांती……..सुरकुतलेली काया………पण प्रसन्न चेहरा. पण भीतीने ग्रासलेला.

राजा काही बोलायच्या आधीच म्हातारी म्हणाली, " महाराज माफी असावी. अनवधानाने गुन्हा घडलाय. भूक लागली होती. झाडावरची फळे पडण्यासाठी दगड मारला होता. तो चुकून तुम्हाला लागला.”

रणजीतसिंगांनी क्षणभर विचार केला. आणि सैनिकांकडे वळून म्हणाले, " या म्हातारीला महालावर न्या आणि शंभर मोहरा देऊन तिला सन्मानानं तिच्या घरी पाठवा.” सैनिक त्या म्हातारीला घेवून निघून गेले.

राजाच्या या न्यायाचं प्रधान मंत्र्यांना मोठं आश्चर्य वाटलं. धीर करून त्यांनी राजाला विचारलं, " महाराज, त्या म्हातारीला शिक्षा देण्याऐवजी आपण तिचा सन्मान का केलात ? ”

राजा हसून म्हणाला, ” प्रधानजी, ती म्हातारी झाडाला दगड मारते तेव्हा झाड तिला फळे देते आणि मी मात्र या जनतेचा राजा असूनही तिला शिक्षा करायची हे काही योग्य झालं नसतं. इतकंच काय म्हातारी असंही म्हणाली असती कि झाडाला मी जानुनून बुजून दगड मारला तरी झाड मला फळ देतं. आणि राजाला चुकून दगड लागला तरी राजा शिक्षा देतो. देवा राजा पेक्षा दगडच बरा.”

राजाच्या न्यायबुद्धीच प्रधान मंत्र्यांना मोठं कौतुक वाटलं. आपण अशा न्यायप्रिय राजाच्या पदरी चाकरी करतो आहोत या विचारानं अभिमानानं त्यांचा उर भरून आला.

तात्पर्य : 
न्याय देताना न्याय बुद्धी नेहमीच जागी ठेवली पाहिजे.

No comments:

Post a Comment