जागरण गोंधळ. हिंदू संस्कृतीनुसार हि खंडोबाची पूजा. खंडोबाचा दरबाराच असतो हा. प्रत्यक्ष देवाचा. या दरबारात वाघ्या, मुरुळी असतात. टिमकीची तिडतीड असते. तुणतुण्याची तुणतुण असते. संभळाचं घुमणं असतं. आणि त्या सगळ्या तालावर मुरळीच थिरकणं असतं. हे सगळं रात्रभर सुरु असतं. इंद्राच्या दरबारात नाचणारी मेनकाच वाटत असते ती मुरळी. हे सारं छान वाटत असतं. पण त्यात मध्येच तमाशा सुरु होतो. अगदीच तमाशा नव्हे पण तमाशातल्या वगात असते तशी चावट जुगलबंदी. ती नकोशी वाटते. त्यातल्या काही शाब्दिक चावटपणाची उदाहरणं खाली देणारच आहे.
परवा आमच्या मामाच्या मुलाचं लग्न झालं. रितीप्रमाणे देवदेव, पूजाअर्चा सारं पार पडलं. सरतेशेवटी जागरण गोंधळ घालायचं ठरलं होतं. बेलवंडी कोठारची जागरण गोंधळ पार्टी बोलावली होती. पाच सहा जणांचा ताफा. संजय बापूराव शिंदे हे त्या पार्टीचे प्रमुख. काही प्राथमिक पूजा पार पडल्या नंतर रात्री नऊ वाजता त्यांची जागरणासाठीची विधिवत मांडणी केली. दिवटी पेटली. टिमकी वाजू लागली. संभळ घुमू लागलं. त्याच्या तालावर मुरळी थिरकू लागली.
बऱ्याचश्या पार्ट्या अंगावरच्या कपड्यानिशी जागरण करतात. पण या पार्टीकडे वेगवेगळे पेहराव होते. छोटयाश्या मंचावर मोठं नाटय चालल्या सारखं वाटत होतं. अत्यंत माफक मानधन घेऊन कार्यक्रमाला आलेली हि मंडळी. पण मन लावून , जीव ओतून कार्यक्रम करीत होती. मी त्यांचा प्रचार करतोय असं नाही. जे चांगलं त्याला चांगलं म्हणावं आणि जगापुढे मांडाव या मताचा मी आहे. कुणी काय घ्यायचं आणि काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
मधे मधे थोडा ब्रेक असायचा. त्या वेळी मी संजय शिंदेंशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. माझ्या काही शंकांचं समाधान करून घेतलं. मला जे पटलं नाही तेही. माझ्या काही शंकांचं समाधान करून घेतलं. मला जे पटलं नाही तेही बोलून दाखवलं.
यात मला न पटण्यासारखा होता तो केवळ शाब्दिक चावटपणा. उदाहरणार्थ -
मावशी आणि गवळणींच्यात संवाद सुरु असतो.
एकजण : मावशे तुझा भाचा आलाय.
मावशी : माझा xचा तर माझ्याजवळच तो आणि कुठून यायचा ( इथं ' भा ' चा ' बो ' केला होता. ) ( बायाबापड्यांसह बघ्यांचा हशा.)
दुसरी : अगं xचा नाही मावशे तुझा भाचा आलाय. ( बघ्यांचा पुन्हा हशा.)
मावशी : बस जरा. दोनचार भाकरी करून घेते.
( दोघी बसतात. मावशी भाकरी थापण्याचा तव्यावर टाकण्याचा अभिनय करते.)
मावशी : अगं फुक कि जरा.
( दुसरी पचकन कोपऱ्यात थुंकते. मावशी तिच्या कानाखाली जाळ काढते.) ( बघ्यांचा हशा.)
दुसरी : मावशे का गं मारलस ?
मावशी : मारू नको तर काय पूजा करू तुझी. तुला जाळ फुकाया सांगितला तर तू थुकाया लागलीस माझ्या घरात.
दुसरी : आयकण्यात चूक झाली मावशे.
थोडावेळ जातो.
पुन्हा दुसरी : मावशे आत सार.
मावशी : अगं माझ्याकडं हाय काय तुझ्यात साराया. ( बायाबापड्यांसह बघ्यांचा हशा.)
( सरी मावशीच्या कानाखाली जाळ काढते.)
मावशी : अगं तुझ्यात साराया माझ्याकडं काही नाही म्हणून लगीच माराया लागलीस व्हय.
त्यावर दुसरी कडाकडा बोटं मोडते आणि म्हणते, " अगं गवऱ्या गेल्या तुझ्या नदीला. मी तुला चुलीतला जाळ आत साराया सांगते आणि तुझ्या मनात काहीबी येतं व्ह्य गं ? "
मावशी : मंग तुला चुलीतला जाळ म्हणाया काय झालं व्हतं ?
मी शिंदेंना म्हणालो, " हे इतके फालतू आणि घाणरडे विनोद देवासमोर कशाला ? "
शिंदेंनी जे उत्तर दिलं ते विचार करायला लावणारं होतं. ते म्हणाले, " हा पाचगळपणा केला नाही तर आता दिसाहेत ती दहा वीस माणसंही जागी दिसायची नाहीत. आहो एखादया सुपारीला आमच्या मुरळीच दुखत असलं तर आम्ही एखादी वय झालेली काम चलावू मुरळी आणतो. तवा एखाद म्हातारं येवून कानात सांगतय जरातरी तरणी मुरळी आणायची राव. "
माणसांना हेच पायजेल साहेब. त्यास्नी जे हवं ते द्यायाचं आणि तरीबी आब्रूणी राहायचं. बाकी काय बी करता येत नाही बघा साहेब.
मी काय बोलणार. विंगेतून बोलणं सोपं असतं. अशी मी मनाची समजूत घातली आणि गप्प बसलो.
Tumcha lekh awadla.
ReplyDeletemi pn khedyatlach ahe.tyamule ase anubhav mi khup javlun pahilet........
wait etkach watate ki junya pidhiche vichar an sanskar halu halu lop pavat chalalet.
निलजी, आपल्या अभिप्रायाबद्दल आभार. माझ्या खुप जुन्या लेखाला शोधुन प्रतिक्रिया दिलीत. यावरून आपली वैचारिक प्रगल्भता अत्यंत उच्च दर्जाची असल्याचे दिसते. आपण माझ्या ब्लॉगला नियमित भेट दयाल आपले योग्य अभिप्राय नोंदवल हि अपेक्षा.
Delete