Thursday 17 January 2019

नवं पुस्तक : शिवारातलं चांदणं : कवी प्रवीण देवरे

नवं पुस्तक : शिवरातलं चांदणं : कवी प्रवीण देवरे
 
प्रवीण देवरे यांचं शिवारातलं चांदणं माझ्या अंगणात पोहचलं त्याला दहा बारा दिवस होऊन गेले. पण त्या चांदण्यात मनसोक्त न्हाऊन निघावं असं वाटत असतानाही ते चांदणं ओंजळीत घ्यायला पुरेसा वेळ मिळत नव्हता. वरवर काव्यसंग्रह वाचून मी लिहू शकलो असतो पण तो माझा स्वभाव नाही. आज कोणी माझ्याकडे आलं तर सरांच्या काव्यसंग्रहात जागोजागी
पेन्सिलने केलेल्या खुणा कोणाच्याही नजरेस पडतील. गेल्या पंधरा दिवसात तीन दिवस या संग्रहातील काव्य चांदण्यात न्हाऊन निघण्याचा आनंद मी अनुभवतो आहे.

दूरदेशीच्या पाखरा हा देवरे सरांचा काव्यसंग्रह साधारण फेब्रु महिन्यात माझ्याकडे आला होता. तेव्हा त्या संग्रहाविषयी माझं  मनोगत मी सरांना कळवलं. कुठे सुधारणा हव्यात ते सांगितलं. त्यासाठी इथे चारचौघात लिहिण्याऐवजी मी सरांना मेल केली. आणि परवा सरांना फोन केला तेव्हा त्यांनी ' हा काव्यसंग्रह करताना तुमच्या सूचना खूप उपयोगी पडल्या' असे सांगितले.

आणि ते सगळं काही या काव्यसंग्रहात दिसून आलं. दूरदेशीच्या पाखरा या सरांच्या पहिल्या काव्यसंग्रहात दिसणाऱ्या नवखेपणाच्या खुणा शिवारातलं चांदणं या काव्यसंग्रहात अत्यंत पुसट झाल्या आहेत. आणि त्यावंगी कविता आता स्वतःची ओळख निर्माण करू पहाते आहे असे दिसते. हि ओळख जशी वर्क नवकवी म्हणून आकार घेऊ पहात आहे तशीच एक निसर्ग कवी म्हणूनही आकार घेऊ पहात आहे. देवरे सर खरंतर भाकरीच्या शोधात मुंबईत आलेले. पण मुंबईच्या भुलभलैय्यात ते हरवले नाहीत. या मायावी नगरीचा मोहात ते सापडले नाहीत. अनेक वर्ष मुबंईत वास्तव्यास असूनही सरांच्या कवितेस मातीचा वास येतो याचा मनस्वी आनंद वाटतो. प्रत्येक कवितेची निसर्गाशी असलेली बांधिलकी पाहून सरांकडे निसर्गप्रेमाचा परीस असायला हवा अशी खात्री पटते. कविता लिहिताना सर हा निसर्ग प्रेमाचा परीस आपल्या कवितेवर फिरवत असावेत आणि सरांच्याही नकळत त्यांच्या कवितेत निसर्गप्रेमाच्या पाऊलखुणा उमटत असाव्यात.

शिवारातलं चांदणं या पहिल्या कवितेपासून या शहरात या शेवटच्या कवितेपर्यंत दोन चार अपवाद सोडले तर सरांच्या प्रत्येक कवितेत निसर्गाच्या पाऊलखुणा सापडतात. ' देशील का ' या कवितेत देवरेसर गावकुसाच्या शिवराला मला पोटापुरता चारा देशील का ? मोकळा श्वास देशील का ? बालपणीचा खेळाचा डाव देशील का ? चुलीवरची भाकर देशील का ? असे प्रश्न विचारतात. कारण शहरातलं माणूसपण हरवलेलं आहेच पण त्याचवेळी गावाचं गावपण टिकून आहे कि नाही अशी शंका सरांच्या मनात दाटून येत असावी.

दूरदेशीच्या पाखरा या काव्यसंग्रहाच्या तुलनेत शिवारातलं चांदणं या काव्यसंग्रहातील कविता बरीच लयबद्ध आहे. सरांनी या कवितेत अष्टाक्षरी, हायकू, सुधाकरी ( खरेतर अभंगरचना. सुधाकरी हे नाव कोण्या सुधाकराने आणि का दिलं माहित नाही. ) अशा कवितेच्या विविध अंगांना यशस्वी स्पर्श केला आहे.

देवरे सरांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस मनापासून शुभेच्छा.

1 comment:

  1. Valuable information. Lucky me I found your web site accidentally, and
    I'm shocked why this coincidence did not came about in advance!
    I bookmarked it.

    ReplyDelete