Tuesday, 29 January 2019

युवराज आणि ईव्हीएम मशीन rahul gandhi, evm

modi, rahul gandhi
उत्तरेकडील तीन वतनात घमासान युद्ध सुरू होते. ईशान्य आणि दक्षिणेची दोन वतने देखील या युद्धात सामील होती. पण रयतेचे लक्ष केवळ उत्तरेकडील लढाईवर केंद्रित झाले होते. एका बाजूला दिल्ली नरेश नेतृत्व करीत होते. तर पूर्वाश्रमीच्या राजघराण्याचे युवराज दुसऱ्या बाजूच्या सैन्यात चैतन्य भरत होते. दोघांनाही ईशान्य आणि दक्षिण वतनात सुरु असलेल्या युद्धात फारसा रस नव्हता. कारण तिकडे कितीही कुमक खर्ची घातली तरी तेथील यश आपल्या पदरी पडणार नाही याची जाणीव त्यांना होती. त्या लढाईत ते सहभागी होते पण काहीही केले तरी तेथील युद्ध त्या त्या वतनातील ठग जिंकणार हे दोघांनाही माहित होते.

पण
उत्तरेतील तीनही राज्यात दिल्ली नरेश आणि तरुण ( ? ) रक्ताचे युवराज आमनेसामने उभे राहून दंड थोपट होते. तीन चार महिने नुसतेच वाकयुद्ध सुरु होते. एकजण आरे म्हणाला कि दुसरा कारे म्हणायचा. कोणीच माघार घेत  नव्हतं. शड्डू ठोकले जात होते. अंदाज घेतला जात होता. आरोप प्रत्यारोप होत होते. शब्दांच्या ठिणग्या उडत होत्या. माणसांची मने पेटत होती. जिंकण्याचा दावा दोन्ही बाजू करीत होत्या. दोघांचाही आपापल्या सैन्य शिबंदीवर विश्वास होता.

या युद्धात ढाल तलवारींचा वापर करण्यास पूर्ण मनाई होती. दोन्ही बाजूच्या हातात एक दोरखंड होता. त्याच्या मध्यात निशाणी लावलेली होती. त्या निशाणीच्या खाली ईव्हीएम नावाची रेषा होती. त्या रेषेच्या एका बाजूला कमळाचे चित्र होते. तर दुसऱ्या बाजूला हाताच्या पंजाचे चित्र होते. प्रत्येकाला आपल्या बाजूला हवे तेवढे सैन्य लावायची मुभा होती. कुणी कमळाच्या बाजूला जात होतं तर कुणी पंजाच्या बाजूने भिडत होतं. त्या त्या बाजूला जोर लावणाऱ्या रयतेची नोंद ईव्हीएम नावाची रेषा करत होती. कमळाच्या बाजूला रयत गेली तर कमळांची संख्या वाढत होती. पंजाच्या बाजूला रयत गेली तर तिकडचा आकडा चढत होता. पण ईव्हीएम रेषेने काय नोंद केली हे कुणाला दिसत नव्हतं.

गेली तीन महिने प्रत्येकजण जोर लावून थकला होता. त्यांना विश्रांतीची गरज होती. नंतर कराव्या लागणाऱ्या जल्लोषासाठी अंगात ताकद यायला हवी होती.  ईव्हीएमने केलेल्या नोंदीचा आकडा आज फुटणार होता. कुणी नगारे बडवण्याच्या तयारीत होतं. कुणी शिंग तुताऱ्या फुंकण्याचा बेत आखला होता. कुणी गुलाल उधळायच्या बेतात होते. कुणी मिठाईची तबके हातात घेऊन उभे होते.

आणि आकडा फुटला. पंजाच्या बाजूने रयतेने अधिक जोर लावल्याचे जाहीर झाले. पंजाने नगारे बडवले. गुलाल उधळला. मिठाई वाटली. जमेल तसा नाच केला. युवराजांना हर्षवायू होण्याची वेळ आली. त्यांना भानावर आणायची गरज होती. म्हणून राजमाता युवराजांच्या कानाला लागल्या आणि म्हणाल्या , " युवराज आज आपला विजय झाला. म्हणजे आजवर ईव्हीएम रेषेच्या दोन्ही बाजूला कमळाचेच चिन्ह असल्याची जी आपण दवंडी पिटत होतो. ती खोटीच होती म्हणायची. "

युवराजांनी राजमातेकडे पाहिलं आणि एक डोळा बारीक करून तोंडावर बोट ठेवत गालातल्या गालात हसले.  

No comments:

Post a Comment