Monday 28 January 2019

कोण म्हणतं तीन राज्यात भाजप पराभूत झाली ?

rahul gandhi
तीन राज्यात भाजपचा पराभव झाला. मिझोराम मधून कांग्रेसची पिछेहाट झाली. के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने तिथे कुणाचीच डाळ शिजू दिली नाही. सर्वच राजकीय अभ्यासकांनी, पत्रकारांनी भाजपाची दमछाक झाल्याचे आणि काँग्रेसने मुसंडी मारल्याचे चित्र निर्माण केले. मुळातच भाजप सत्तेत येण्यापूर्वी भाजपाची तळी उचलून धरणाऱ्या कोणीही पुढे भाजपाची पाठराखण केली नाही. पाठराखण हा शब्द योजताना भाजपच्या चुका डोळ्याआड करायला हव्या होत्या या अर्थाने वापरलेला नाही. परंतु
भाजपच्या कोणत्याही सकारात्मक बाजू दाखविण्याऐवजी भाजपच्या नावाने नकार घंटा वाजविण्याचेच काम बहुतेकांनी केले. दृश्य माध्यमे तर बऱ्याचदा केवळ नकारात्मक गोष्टींचेच प्रसारण करताना दिसतात. आणि प्रत्येक घटनेला जातीयवादाची, अथवा सामाजिक असंतोषाची झालर लावण्याचा प्रयत्न करतात. आमचा बहुतांश समाज हा स्वतःच्या बुद्धीने विचार करत नाही. वर्तमानपत्रात काय छापून आले. बातम्यात काय सांगितले गेले आणि विरोधक काय बोलतात यावर मतदारांचे मत तयार होते. अशा रितीने प्रत्येकजण मोदींच्या आणि पर्यायाने भाजपच्या विरोधात वातावरण निर्मिती व्हायला हातभार लावतो आहे.

पण वास्तव असे आहे. निवडणुकीच्या आधी आणि प्रत्यक्ष निकाल लागेपर्यंत काँग्रेस आणि भाजपा दोघेही आम्हीच सत्तेत येणार असे छातीठोकपाने सांगत होते. तर छत्तीसगढ मध्ये भाजप नक्की सत्ता राखेल, मध्यप्रदेश बाबत त्रिशंकू स्थिती राहील आणि राज्यस्थामध्ये काँग्रेस मोठ्या मताधिक्याने सत्तेत येईल असे चित्र निवडणूकपूर्व निकालात दिसत होते. जनतेला मात्र केवळ राज्यस्थान भाजपच्या हातून निसटेल असे वाटत होते. प्रत्यक्षात तिन्ही राज्य भाजपाला सत्ता गमवावी लागली. परंतु छत्तीसगढचा अपवाद वगळता काँग्रेसला राज्यस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये निर्भेळ यश मिळालेलं नाही. काँग्रेस राज्यस्थानमध्ये बहुमताच्या रेषेला कसाबसा हात लावू शकली. मध्यप्रदेशात बहुमताच्या रेषेपासून काँग्रेसला बोटभर दूरच राहावं लागलं. तर छत्तीसगढ भाजपच्या हातून का निसटलं हे कुणालाही सांगता येत नाही. मतदानाचा टक्का पाहिला तर राज्यस्थान मध्ये केवळ ०.५  तर मध्यप्रदेश मध्ये अवघा ०. १ टक्के मते काँग्रेसने भाजपपेक्षा अधिक मिळवली आहेत.

आता राजस्थानात काम करा अथवा करू नका तिथे पाच वर्षांनी सत्ताधारी पक्षाची सत्ता जातेच आणि विरोधी पक्षाची सत्ता येते हा गेल्या ४०/४५ वर्षाचा इतिहास आहे. त्यामुळे तिथे भाजपाची सत्ता जाणार हि ललाटरेख होती. गुजरात, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ या तीन राज्यांनी भाजपाला गेली पंधरा वर्षे सत्ता दिली होती. नाही म्हटलं तर तिथे बदलाचे वारे वहाणे नैसर्गिक होते. अशा परिस्थिती गुजरातमधील सत्ता भाजपने टिकवली आणि राज्यस्थान , मध्यप्रदेशमधील सत्ता थोडक्यात गमावली. खरेतर या तीनही राज्यातील निवडणुकीच्या आधी तीन चार महिने पेट्रोलचे भाव ज्या प्रमाणात वाढले त्याचा खरा फटका भाजपला बसला आहे. या तिन्ही राज्यातील आणि अवघ्या आठ दहा महिन्यावर येऊन ठेपलेल्या निवडणूका लक्षात घेऊन केंद्राला येन न केन प्रकारे पेट्रोलच्या भाववाढीवर नियंत्रण ठेवता आले असते. पण ती मोदींची कार्यशैलीचा नव्हे.

जिकडं फायदा तिकडं धाव अशी आमच्या मतदारांची मानसिकता. कर्जमाफी देताय ना मग आम्ही तुमच्या मागे. हमीभाव देताय ना मग काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबत. आरक्षण देणार ना मग फिकीरच करू नका तुमचा झेंडा आमच्या खांद्यावर. राफेल मध्ये घोटाळा झाल्याचे रोज सांगण्यात आले. प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले पण पुराव्याचा एकही कागद कोणी जनतेला दाखवला नाही. त्यामुळेच इतका आटापिटा करूनही मोदी भ्रष्टाचारी आहेत असे चित्र निर्माण करण्यात विरोधकांना अपयश आले आहे.

हे सर्व घडत असताना देशातली सर्व माध्यमे राहुल गांधी यांच्या नावाचे चौघडे वाजविण्यात आघाडीवर होती. त्याचवेळी मोदींच्या नावाने शिमगा करण्यातही ते मागे राहत नव्हते. प्रत्येक ठिकाणी भाजपला बदनाम करण्याचा डाव आखला जात होता. मोदींनी चार वर्षात देशाचे वाटोळे केले. देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आणली असे चित्र निर्माण केले गेले. आणि तरीही काँग्रेसला एका राज्यातली हातात असणारी सत्ता गमवावी लागली. आणि दोन राज्यात कसाबसा बहुमताच्या रेषेला स्पर्श करता आला.

त्या सर्व पार्शवभूमीवर तीन पाच राज्यातल्या निवडणूक निकालांचे मूल्यमापन करायचे झाले तर काँग्रेस शिरजोर झाली आणि भाजप संपत आली असे मुळीच म्हणता येणार नाही. इतकेच कशाला यापुढे काँग्रेस कधीच उभारी घेणार नाही. तीन राज्यात जे निकाल लागले त्याला काँग्रेची गतप्राण होण्यापूर्वीची तडफड म्हणावी लागेल. काँग्रेसला एवढी तडफड करता आली ती सुद्धा गेली चार वर्षे मिडिया फुंकर मारते आहे म्हणून. 

No comments:

Post a Comment