Saturday 19 January 2019

माझ्या ओळखीचे गावं Why do not the children take care of their parents?

Marathi poem,
मुले दूर गेलेल्या, ज्यांच्या मुलांना आई वडिलांचा विसर पडलेला आहे अशा आईवडिलांची अगतिकता मी माझ्या एका कवितेत मांडली आहे. मुलं हीच प्रत्येक आई बाबांचा परीघ. पण मुलांच्या परिघात मात्र बऱ्याचदा आई बाबांना स्थान नसल्याचे दिसते.बऱ्याचदा घरात येणाऱ्या सुनाच याला करणीभूत असतात असंही ही ऐकायला मिळतं. काहीवेळा
म्हाताऱ्या आई वडिलांचा हेकट स्वभावही त्याला कारणीभूत असू शकतो. परंतु जसे आई वडिलांनी मुलांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर समजून घेतलेले असतं तसंच मुलांनीही आई वडिलांचा हेकेखोरपणा समजून घ्यायला हवा असं मला वाटतं. दोन मुलं, एक मुलगी असूनही एकाकी असणाऱ्या आई बाबांची शोकांतिका म्हणजे माझी ' माझ्या ओळखीचं गावं ' हि कविता. मी मध्ये पुण्यातल्या निवारा वृद्धाश्रमात माझ्या कवितांचे कार्यक्रम केले होते. त्यावेळी मुले असूनही वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आलेल्या आई बाबांच्या काही शोकांतिका मी त्यांच्याच तोंडून ऐकल्या होत्या. काही वर्षांपूर्वी मला रस्त्यात असेच एक गृहःथ भेटले होते. सत्तरी पंचाहत्तरीचे. एक चौकापुरती लिफ़्ट मागून ते चार सहा किमी माझ्यासोबत आले. उत्तम इंग्रजी बोलत होते. मुले चांगली स्थिरस्थावर. पण त्या आजोबांच्या खिशात छदाम नव्हता. मी शंभरची नोट त्यांना दिली. आणि माझा मार्ग वेगळा असल्यामुळे त्यांना ड्रॉप करून विचारमग्न अंतःकरणाने पुढे निघालो. हि कविता अशा अनेक विचारांनी प्रेरित आहे. लोकसभेच्या निवडणुका पार पडेपर्यंत कविता पोस्ट करायची नाही. राजकारण सोडून अवांतर काही लिहायचे नाही असे ठरवले होते. तरीही आज हि पोस्ट करायला तसंच कारण घडलं परवा १० इयर्स चॅलेंज असं काहीतरी फॅड आलं होतं. मागे ' माझी मुलगी माझा अभिमान' असंही फॅड आलं होतं. असं काही फॅड आलं कि तशा पोस्ट करण्याची चढाओढ लागते. पण मला त्या गोष्टींचं कधी आकर्षण वाटलं नाही. इथल्या सर्व मित्रांविषयी प्रेम आहे. आपुलकी आहे. तरीही इथे कौटुंबिक बाबींची देवाणघेवाण करण्यापेक्षा वैचारिक देवाणघेवाण करण्यात मला जास्त रस आहे. अनेकांच्या चांगल्या कविता, लेख वाचतो तेव्हा आनंद वाटतो.
परंतु १० इयर्स चॅलेंज हा संदर्भ घेऊन माझ्या चिरंजीवांनी पोस्ट केलेला एक फोटो मला फार आवडला. तो फोटो शेअर करण्याचा मोह मलाही आवरला नाही. कारण पहिल्या फोटोत आम्ही मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं दिसतं आहे तर दुसऱ्या फोटोत मुलं आमच्या पाठीशी उभी असल्याचं दिसतं आहे. आणखी एक योगायोगाची बाब म्हणजे दोन्ही फोटो वेगळ्या ठिकाणचे असूनही दोन्ही फोटोत पाठीशी कल्पवृक्ष आहेच. त्या कल्पवृक्षाचीच कृपा म्हणून आजवर सुखाचा संसार झाला आणि देवाच्या आशिर्वादाने यापुढे सुख पाठराखण करेल. आई बाबा हा विषय घेऊन मी बऱ्याच कविता लिहिल्या आहेत. परंतु मुलांचे कौतुक करणाऱ्या कविता लिहिणे माझ्याकडून झाले नाही. आपल्या मुलांवर, नातेवाईकांवर कविता करावी असे मला फारसे कधी वाटले नाही. कारण मुलांना असे कवितेत शब्दबद्ध करण्यापेक्षा त्यांना संस्कारबद्ध करण्यात मला जास्त रस आहे. त्यामुळेच आपल्या कवितेतून मुलांचं कौतुक करून ते इतरांसमोर मांडण्याची मला कधी गरज वाटली नाही. पहा कविता कशी वाटते -

माझ्या ओळखीचे गावं सांग कुठे हरवले ? आणि गेले ते गं छावे ज्यांना घास भरविले ? तू गं वेलं सुकलेली मी गं वेढलेले झाडं कुठे गेले पोसलेले दोन्ही आधाराचे माडं ? झाली जाणती पाखरं तेव्हा पंख पसरले आणि बघ डोईवर सये नभ घसरले. आता जपायच्या अशा सखे किती आठवणी एक पोर होती तिची तू गं केली पाठवणी. आता जगायचे पुढे कशासाठी ? कुणासाठी ? आणि मरायचे कसे कोण रडणार पाठी ? असे अभागी आपण पोटी असुनी लेकरे दुज्या फांदीवर कधी सांग बसली पाखरे ? कढ दाबायचे मनी येता पाणी डोळ्यातुनी मृत्यू यावा तुझा माझा आता सखे वादळुनी.

No comments:

Post a Comment