Sunday 27 January 2019

साहित्यादीपच प्रतिष्ठान : आदर्शाचा मापदंड sahityadip foundation , pune

maymarathi.blogspot.com
साहित्यादीपचा कार्यक्रम अत्यंत सुंदर रीतीने पार पडला. माननीय सुधीरजी गाडगीळ हे कार्यक्रमाचे अध्यक्ष. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. तरीही खऱ्या अर्थाने मुलाखतकार म्हणूनच ते सर्वदूर परिचित आहेत. जेष्ठ कवी वि. सु.चव्हाण हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे. कार्यक्रमाचं वार्तांकन नाही करत मी. मला लिहायचं आहे ते
संयोजकांच्या उदात्त हेतू विषयी. खरंतर हास्य कवी माननीय बंडा जोशी यांना काव्यदीप पुरस्कार देऊन त्यांच्या काव्यगुणांचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा यथोचित गौरव करणं हा या कार्यक्रमाचा हेतू.

अनेक संस्था बऱ्याचदा वलय असलेल्या, मोठं नाव असलेल्या व्यक्तिमत्वांना पुरस्कार देतात. त्यामागे बऱ्याचदा स्वतःची प्रसिद्धी आणि पुरस्काराला महत्व प्राप्त करून देणं हाच हेतू असतो. परंतु साहित्यादीप असं करत नाही. साहित्यादीपचा काव्यदीप पुरस्कार मिळणं हाच एक फार मोठा बहुमान आहे. आजवर तो केवळ संदीप अवचट, संदीप खरे, उद्धव कानडे आणि म. भा  चव्हाण अशा श्रेष्ठ साहित्यिकांना मिळाला आहे. आणि आता तो बंडा जोशी यांच्यासारख्या बहुआयामी व्यक्तिमत्वाला मिळाल्यामुळे त्या पुरस्काराला आणखी वजन प्राप्त झालं आहे. सुधीर गाडगीळ यांच्या अध्यक्षीय भाषणात क्षणाक्षणाला हास्याचे फवारे उडत होते. मुलाखत घेणं हे सुधीरजींच्या किती रक्तात भिनलं आहे त्याची झलक त्या दिवशी पहायला मिळाली. अध्यक्षीय भाषणाच्या शेवटी त्यांनी चार पाच प्रश्न विचारत बंडा जोशी यांची फिरकी घेण्याचा प्रयत्न केलाच. वि. सु. चव्हाण यांनी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचे विचार मांडले. साहित्यादीपचे उपाध्यक्ष या नात्याने गझलकार अनिल कांबळे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ज्योत्स्नाताई चांदगुडे यांनीं प्रभावी प्रास्तविक केलं. 

बंडा जोशी यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत सत्काराला उत्तर दिलं. तेव्हा त्यांच्या अवघं सभागृह हास्यरसात बुडून गेलं. त्यानंतर निमंत्रितांच कवीसंमेलन रंगलं. त्यात माझ्यासह सुजित कदम, विजय सातपुते, भालचंद्र कोळपकर, अनिल दीक्षित, धनंजय तडवळकर अशा अनेकांनी रंग भरले.

मी ,' त्याने मिशा काळ्या केल्या म्हणून सांगा झालं काय ?
       त्याची मिशी त्याचा डाय तुमचं सांगा गेलं काय ? ' या ओळी बंडा जोशी यांच्या चरणी अर्पण केल्या.

अनिल दीक्षित याची , ' काय ते पत्रात लिवा ' हि अनेक राजकीय घडामोडींवर आधारित विनोदी कविता उपस्थितांना खळखळून हसवीत होती.

भालचंद्र कोळपकर यांची नटीशी लग्न करण्याचा बेत आखून मुंबईला गेलेल्या नायकाची कविताही अशी विनोदाने ओसंडून वहात होती.

धनंजय तडवळकर यांची ' सर्वकाही बायकोचं का ऐकायचं ठरवलं ' या संदर्भातली कविता खूपच भाव खाऊन गेली.

पण आम्हा सर्वांवर कडी केली ती गुरुतुल्य बंडा जोशी यांनीच. त्यांनी मुलाच्या बारशाला उपस्थित राहिलेल्या सिने कलाकारांच्या , आणि राजकीय पुढाऱ्यांच्या उपस्थितीचं वर्णन करणारा पाळणा सादर केला. आणि धमाल उडवून दिली.

मी कार्यक्रमाच्या आधी लिहिलेल्या पोस्ट त्या दिवशी पुन्हा प्रचिती आली. आदर्श कार्यक्रम कसा असावा याचा उत्तम उदाहरण म्हणजे साहित्यादीप. 

No comments:

Post a Comment