Thursday, 24 January 2019

का जाळावा अथवा पुरावा मृत देह ?

तिकडे यवतमाळ येथे साहित्याचा उत्सव सुरु होता आणि इकडे पुण्यात काही साहित्यिक मंडळींनी एक आगवेगळा सत्कार आयोजित केला होता. प्रमोद आडकरांचं निमंत्रण आलं होतं म्हणून कार्यक्रमाला हजर राहिलो. कार्यक्रमाचं नेमकं स्वरूप माहित नव्हतं.
अवयवदान हा विषय होता. नचिकेत जोशी यांना करम काव्यतेज पुरस्कार देण्यात येणार होता.नंतर निमंत्रितांच काव्यसंमेलन होतं. वेळेत पोहचलो. कार्यक्रम सुरु झाला. निवेदिकेनं कार्यक्रमाचं स्वरूप सांगितलं. प्रमुख पाहुणे स्थानापन्न झाले. काही सत्कार पार पडले. प्रज्ञा महाजन यांनी अवयवदान आणि देहदान करणं किती गरजेचं आहे ते सांगितलं. जगात याबाबतीत आपण किती पिछाडीवर आहोत याची जाणीव करून दिली. एक मृत व्यक्ती सात लोकांचे प्राण वाचवू शकते हे सांगितलं तेव्हा वाटलं असं असेल तर मृत्यूनंतर देह जाळून अथवा पुरून काय साध्य होणार ?

त्यानंतर कोमल पवार यांची मुलाखत होती. मुलाखतकार होते काव्य रसिक मंडळ या संस्थेचे संस्थापक भूषण कटककर आणि रंगत संगत प्रतिष्ठानचे ॲड. प्रमोद आडकर.मुलखात सुरु झाली आणि कोमल पवार या महिलेच्या आजारपणाचा हृदय हेलावून टाकणारा प्रवास आणि त्यांनी त्या आजारपणाशी दिलेला लढा उपस्थितांना थक्क करत गेला. प्रेरणा देत गेला. मृत्यूचा सुद्धा पराभव करता येतो हे जाणवलं. २०१५ ला कोमल पवार यांचा धीरज पवार यांच्याशी विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यात कोमल यांना श्वसनाचा त्रास सुरु झाला. धाप लागू लागली. चालणं अशक्य झालं. डॉक्टर झाले तपासण्या झाल्या आणि त्यांना अत्यंत दुर्मिळ असणारा प्रायमरी पल्मोनरी हायपरटेंशन ( primary pulmonary haypertension ) हा विकार असल्याचं निदान झालं. फुफुसाशी निगडित असणारा हा विकार. अत्यंत दुर्मिळ. त्यामुळे पुरेसं संशोधन झालेलं नव्हतं. औषध सुद्धा उपलब्ध नाहीत. उपायसुद्धा दृष्टीपथात नव्हते. पण कोमल यांचे पती धीरज पवार धीराचे. त्यांनी जंग जंग पछाडलं. अनेक डॉक्टरांचे उंबरठे झिजविले. हरतऱ्हेचे उपचार झाले. औषध झाली. पण दुखणं कमी होण्याऐवजी बळावत गेलं. इतकं कि कोमल यांना श्वास घेणं सुद्धा अवघड जाऊ लागलं. चालणं फिरणं बंद होतंच. पण घरातल्या घरातसुद्धा ऑक्सिजनचा सिलेंडर सोबत घेऊन वावरण्याची वेळ आली. दिवसाला १५ किलो ऑक्सिजन लागू लागला. आयष्याचे धागे कमकुवत होत होते. धीरज ऑफिसला गेलेले असायचे. परत  येऊन दार उघडायचे तर कोमल घरात कुठेतरी शुद्ध हरपून कोसळल्या असायच्या. मनात आत्महत्येचे विचार बळावत होते. धीरज घराबाहेर पडताना घरातले चाकू-सुऱ्या, आगपेटी, दोरी अशा आत्महत्येला सहाय्यभूत ठरणाऱ्या सर्व वस्तू सोबत घेऊन जायचे. कोमल यांना जीव नकोसा झाला होता. पण धीरज धीर सोडायला तयार नव्हते. त्यांना बेंगलोरचा रेफरन्स मिळाला. तिथे गेले. तपासण्या झाल्या. आणि फुफुसाचं प्रत्यारोपण करणं हा एकमेव उपाय असल्याचं सांगण्यात आलं. खर्च होता चाळीस लाख.

मग सेव्ह कोमल चळवळ उभारण्यात आली. रियालिटी शोमधील मुलांच्या डान्स आणि गायनाचे शो आयोजित केले गेले. पैसे उभे राहिले. पण फुफुसाचं दान करणारी व्यक्ती उपलब्ध होत नव्हती. दिवस सरत होते आणि मृत्यू त्याचे फास अधिक घट्ट करीत होता. कोमल यांना जगण्याची उमेद उरली नव्हती. कोमल यांचं वजन ५४ वरून २२ किलो झालं होतं. संवेदना हरवल्या होत्या. उरला होता तो केवळ मरणासन्न डोळ्यांनी मृत्यूचा शोध घेणारा सांगाडा. तरीही धीरज कोमल यांना धीर देत होते. आणि फुफुस मिळाल. पण त्याच प्रत्यारोपण करूनही प्राण वाचतील याची शाश्वती १ टक्काही नव्हती. तरीही ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. १६ तास ऑपरेशन सुरु होतं. ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पडलं. आणि पुढल्या काही दिवसात कोमल स्वतः श्वास घेऊ लागल्या. आत्मविश्वासानं स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. पुन्हा पूर्वीसारख्या हसू खेळू लागल्या.

परंतु जगलो. मृत्यूच्या दाढेतून सुटलो. आता निव्वळ आयुष्याचा आनंद घेऊ या एवढा क्षणिक विचार कोमल आणि धीरज यांनी केला नाही. त्यांनी समाजाच्या ऋणातून उतराई व्हायचं ठरवलं. कोमल न्यू लाईफ फाउंडेशन हि संस्था सुरु केली. त्यातून असाध्य विकारांनी ग्रासलेल्या रुग्णांना मार्गदर्शन करण्याचं ठरवलं. अवयवदानाच महत्व समाजाला पटवून द्यावं या हेतूनं चळवळ राबवली.

मला भूषण कटककर आणि ॲड प्रमोद आडकर यांचं विशेष कौतुक वाटतं ते यासाठी कि नुसतंच कविता कविता खेळत बसण्यापेक्षा समाजाभिमुख काम कसं करावं याचा आदर्श त्यांनी घालून दिला होता. अर्थात कार्यक्रम एवढ्यावरचं थांबला नाही. कोमल पवार आणि धीरज पवार यांची मुलाखत पार पडल्यानंतर आरती देवगांवकर बोलायला उभ्या राहिल्या. किडनी सपोर्ट ग्रुप या संस्थेच्या त्या संस्थापक. गरजवंत आणि दाता यांच्यातला दुवा म्हणून काम करणं. दात्याचं मनोबल वाढवणं. त्यांना समजावणं हे खरंतर त्यांच्या संस्थेच्या कामाचं स्वरूप. आजारी माणसाला जेव्हा खरी गरज असते तेव्हा जवळची नाती कशी दुरावतात आणि अनपेक्षित नाती कशी आधार देतात यांचे अनेक किस्से त्यांनी सांगितले. तेव्हा नात्यावरचा विश्वास उडत असतानाच दृढही होत गेला.

त्यानंतर अवयदान नेत्रदान करण्याचं ठरविण्यात आलेल्या काही नागरिकांचा सत्कार करण्यात आला. अवयवदान केलेल्या पण काळाच्या पडद्याआड गेलेल्या पुण्यात्म्यांचा त्यांच्या आप्तांना सत्करीत करून कृत्य कृत्य करण्यात आलं. या कायर्कर्माला नाशिकहून सुनील देशपांडे उपस्थित राहिले होते. अवयवदानाचा प्रचार आणि प्रसार या हेतूने त्यांनी ३००० हजार किलोमीटरची पदयात्रा केलेली होती.

मग पार पडला गझलकार नचिकेत जोशी यांचा सत्कार. त्यांनी सत्काराला उत्तर देताना जे काही सांगितलं ते प्रत्येक कविसंमेलनात आपल्याला कविता वाचायला मिळावी यासाठी जीवाचा आटापिटा करणाऱ्या कवींच्या डोळ्यात अंजन घालायला पुरेसं होतं. त्या भावना कवितेत मांडताना ते म्हणतात -

एकटा आहे बरा मी कोणत्या चर्चेत नाही
रात्र माझी स्वप्न माझे झोप उसनी घेत नाही.

पण अनेक कवींना मी कविता कशी लिहितो यापेक्षा मला प्रसिद्धी कशी मिळेल याच चिंतेने झोप येत नाही.

शेवटच्या सत्रात अवयवदान या संदर्भात निवडक दहा बारा कवींचं संमेलन झालं. त्यात सुप्रिया जाधव, मृणालिनी कानिटकर, मिलिंद छत्रे, माधुरी गयावल आणि इतर पाच सहा कवींच्या कविता एकाहून एक सरस आणि अवयवदानाचं महत्व अधोरेखित करणाऱ्या होत्या. करमच्या संचालिका सुप्रिया जाधव यांनी कार्यक्रमाचा समारोप झाल्याचं जाहीर केलं. पण तो समारोप नव्हताच. ती सुरवात होती नव्या अवयवदानाच्या चळवळीची.  

2 comments:

  1. Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद जयवंतराव जी.

      Delete